ढाका : बांगलादेशचा सर्वांत अनुभवी क्रिकेटपटू मुश्फिकूर रहीमने गुरुवारी ‘वन-डे’मधून निवृत्ती जाहीर केली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये बांगलादेशचे आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आल्यानंतर काही दिवसांमध्येच रहीमने वन-डे क्रिकेटला अलविदा केला आहे. (Rahim)
एकोणीस वर्षांखालील बांगलादेश संघांचे कर्णधारपद भूषवल्यानंतर मुश्फिकूरने २००६ मध्ये बांगलादेशच्या वरिष्ठ संघाद्वारे आंतरराष्ट्रीय वन-डे पदार्पण केले. जवळपास १९ वर्षांच्या वन-डे कारकिर्दीत मुश्फिकूरने २७४ सामन्यांमध्ये ३६.४२ च्या सरासरीने ७,७९५ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ९ शतके व ४९ अर्धशतकांचा समावेश आहे. बांगलादेशचा तो सर्वाधिक वन-डे खेळणारा क्रिकेटपटू आहे. त्याचप्रमाणे, आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये २५० सामन्यांचा टप्पा पार करणाऱ्या केवळ पाच यष्टिरक्षकांमध्ये त्याचा समावेश होतो. कुमार संगकारा (श्रीलंका), ॲडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया), मार्क बाउचर (दक्षिण आफ्रिका) आणि महेंद्रसिंह धोनी (भारत) हे या यादीतील अन्य यष्टिरक्षक आहेत. त्याने ३७ सामन्यांमध्ये बांगलादेशचे नेतृत्वही केले आहे. (Rahim)
मुश्फिकूरने फेसबुक पोस्ट लिहून निवृत्ती जाहीर केली. “मी या दिवसापासून वन-डे क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. कारकिर्दीतील सर्व गोष्टींसाठी ईश्वराचे आभार. जागतिक स्तरावर आपल्या संघाचे यश मर्यादित असले, तरी मी देशासाठी मैदानावर उतरल्यानंतर दरवेळी मी १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न केला. मागील काही आठवडे हे माझ्यासाठी आव्हानात्मक होतो आणि आता हेच माझे विधिलिखित असल्याची जाणीव मला झाली आहे. माझे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि क्रिकेटप्रेमींचा मी खूप आभारी आहे. त्यांच्यामुळेच मी १९ वर्षे क्रिकेट खेळू शकलो,” असे मुश्फिकूरने पोस्टमध्ये म्हटले आहे. (Rahim)
मागील काही काळापासून मुश्फिकूरने गमावलेला फॉर्म हा बांगलादेश संघासाठी चिंतेचा विषय आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशने खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये, मुश्फिकूरला भारताविरुद्ध शून्य, तर न्यूझीलंडविरुद्ध केवळ २ धावा करता आल्या होत्या. रहीमने २०२२ च्या वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय टी-२०मधून निवृत्ती जाहीर केली होती. आता तो केवळ आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट खेळणार आहे. (Rahim)
हेही वाचा :
टेबल टेनिसपटू शरथची निवृत्तीची घोषणा
स्टीव्ह स्मिथ वन-डेतून निवृत्त