दुबई : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने आयसीसी महिला वन-डे फलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेतली आहे. तिचे ७२७ गुण झाले असून २०१९ नंतर प्रथमच ती या क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचली आहे. (Smriti Mandhana)
मागील महिन्यात श्रीलंकेमध्ये झालेल्या तिरंगी वन-डे स्पर्धेत स्मृतीने एक अर्धशतक व एक शतक झळकावले होते. त्याचा फायदा तिला क्रमवारीतील स्थान सुधारण्यासाठी झाला. इंग्लंडची नॅटली स्किव्हर-ब्रंट ७१९ गुणांसह दुसऱ्या, तर दक्षिण आफ्रिकेची लॉरा वॉल्वार्ट ही तिसऱ्या स्थानावर असली, तरी तिचेही ७१९ गुण आहेत. स्मृती वगळता भारताची एकही फलंदाज या क्रमवारीतील आघाडीच्या दहाजणींमध्ये नाही. स्मृतीखालोखाल भारताची जेमिमा रॉड्रिग्ज पंधराव्या, तर कर्णधार हरमनप्रीत कौर सोळाव्या स्थानावर आहे. (Smriti Mandhana)
महिला वन-डे गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताची फिरकीपटू दीप्ती शर्मा ६७२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दीप्तीशिवाय भारताच्या एकाही गोलंदाजास पहिल्या वीसजणींमध्येही स्थान मिळवता आलेले नाही. या क्रमवारीत इंग्लंडची सोफी एस्सेलस्टोन ७४७ गुणांसह पहिल्या, तर ऑस्ट्रेलियाची ॲश गार्डनर ७२४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. महिला अष्टपैलूंच्या क्रमवारीतही दीप्ती ३५३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या क्रमवारीत गार्डनर ४७० गुणांसह अव्वल स्थानावर आहे. (Smriti Mandhana)
महिला वन-डे सांघिक क्रमवारीमध्ये भारत १२१ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ १६७ गुणांसह पहिल्या, तर इंग्लंड १२८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय महिला संघ पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वन-डे मालिका खेळणार आहे.
हेही वाचा :
गंभीर इंग्लंडला परतणार

