अमूक एक व्यक्ती विचित्रपणे का वागते? असा प्रश्न पडला की, आपले उत्तर तयार असते, बिघडलेला मानसिक तोल. म्हणजेच, मानसिक रोग. इंग्लिशमध्ये मेंटल डिसऑर्डर. परंतु हेच यावरचे योग्य आणि समर्पक उत्तर आहे? विज्ञान तर काहीतरी वेगळे सांगते, सुचवतेय…
(पूर्वार्ध)
कोणी माणूस एकच शब्द, एकच वाक्य एकसारखे बोलत, खरेतर बडबडत राहते…कोणी माणूस एकच कृती वारंवार करत राहते. हातवारे तर हातवारे. येरझारा तर येरझारा. विरुप चेहरा तर विरुप चेहरा…ते पाहून अनेकांना काहीतरी भानगड दिसतेय या माणसाच्या मेंदूत, काहीतरी मानसिक रोग जडलेला दिसतोय असे सहज वाटून जाते. पण तेवढेच…
मानसोपचाराच्या प्रांतात टिक्स (TICS) अशी संज्ञा असलेला चेतासंस्थेशी निगडित एक आजार आहे. हा आजार जडलेला माणूस एकसारखा वेगवेगळे आवाज काढतो, हाता-पायांच्या-शरीराच्या हालचाली करत राहतो. जेसिका ह्युस्टन नावाची तरुणी जेव्हा १२ वर्षांची होती, तेव्हापासून टिक्सने पछाडलेली होती. जशी वर्षे सरत गेली, तिचा आजार अधिकाधिक बळावत गेला. इतका की तिला एकाएकी फिट्स येऊ लागल्या. सर्वांग फिट्समुळे गळपटून जाऊ लागले. पण जेव्हा हा प्रकार असह्य झाला, तिने हॉस्पिटल गाठले. इंग्लंडमधल्या डरहॅम इथल्या हॉस्पिटलात ती उपचारांसाठी गेली तेव्हा, तिथल्या डॉक्टरांनी, काही मोठे घडलेले नाही, हे सगळे चिंताग्रस्तेतून ( अँग्झाइटी) आलेले आहे. ही एक मानसिक अवस्था आहे, बहुदा प्रमाणाबाहेर अधिकचा वेळ टिकटॉक अॅपवरचे व्हिडिओ पाहिल्याने ही नसती आफत ओढवलीय… असे म्हणून तिचा आजार झटकूनच टाकला.
जेसिकाच्या आईला डॉक्टरांनी दिलेला हा प्रतिसाद अवहेलना करणारा वाटला. परंतु त्यानंतर जेव्हा गांभीर्यपूर्वक जेसिकाच्या टेस्ट करण्यात आल्या, त्यातून तिला जो काही ऑटोइम्युन प्रकारातला विकार जडला होता, त्याचे मूळ “स्ट्रेप्टोकॉकस” नावाच्या जिवाणूजन्य संसर्गात असल्याचे ध्यानात आले. वैज्ञक विज्ञान त्याला म्हणते, पिडिआट्रिक ऑटोइम्युन न्यूरोसाइकिआट्रिक डिसऑर्डर रिलेटेड स्ट्रेप्टोकॉकस. याचा अर्थ काय, तर जेसिकाला जडलेला आजार हा केवळ मनाचा आजार नव्हता आणि केवळ मनावर तेवढे उपचार करण्याने तो बराही होण्यातला नव्हता.
कारण, वैज्ञक विज्ञानाला आजवर जे पुरावे सापडेत, त्यानुसार असे कितीतरी प्रकारचे संसर्ग असतात, जे शरीराला होतात आणि त्यातून ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर (ओसीडी), वर उल्लेख केला त्याप्रमाणे जेसिकाला जडलेला टिक्स, चिंताग्रस्तता, नैराश्य आणि अगदी मनोविकृती ( सायकॉसिस ) यांसारखे आजार जडतात. अर्थात, जिवाणू संसर्ग हा मानसिक रोगाला कारण ठरणारा एक छोटा घटक. यापलीकडे जाऊन हे एव्हाना स्पष्ट झालेले आहे की, शरीराची दाहकता वाढवणारे आजार, चयापचय संस्थेशी निगडित आजारही मानसिक रोगांना आमंत्रण देणारे ठरत आहेत.
उदाहरण द्यायचे झाले तर, असे खात्रीपूर्वक आणि पुराव्यानिशी सांगता येते की, जवळपास ९० टक्के दुभंग मनोवस्थेत जगणाऱ्या (बायपोलर डिसऑर्डर) रुग्णांना आयुष्यात सतत आजाराचा सामना करावा लागतो. जी मुले ओसीडीग्रस्त असतात, त्यातली जवळपास ४६ टक्के मुले या आजारातून कधीच बाहेर येत नाहीत. नैराश्याने ग्रस्त असलेले ५० ते ६० टक्के रुग्ण खूप वेगवेगळ्या प्रकारची औषधे दिल्यानंतर सावरतात. मुद्दा एवढाच आहे, मानसशास्त्र तज्ज्ञांचे या गुंतागुंतीकडे फारसे लक्ष गेलेले नाही. हीच खरेतर मानसोपचारातली मोठी अडचणही ठरली आहे.
मनाचे रोग
गंमत अशी आहे, मानसोपचारशास्त्राचे क्षेत्र ऐतिहासिकदृष्ट्या निद्रिस्त कारणांचा शोध घेण्याऐवजी लक्षणांचे वर्गीकरण आणि वर्णन करण्याभोवतीच घुटमळत राहिले आहे. मात्र, अशाने रोगाचे निदान करण्यात मानसशास्त्राचे सातत्य राहिले हा महत्त्वाचा भाग आहेच, पण दुसऱ्या बाजूला मानसशास्त्राने विकारातले भेद ध्यानात न घेता, त्यांच्या मुळांशी न जाता, रुग्णांना एकाच गटात ढकलून दिले आहे. त्यामुळे नैराश्य आणि चिंताग्रस्तता असलेल्या रुग्णांच्या लक्षणांचा वेगळा तक्ताच तयार होत नाही. उपचारांची वेगळी दिशाही ठरत नाही.
उपचारांदरम्यानची ही उणीव ध्यानात घेता २०१३ मध्ये अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थ संस्थेने लक्षणाधारित वर्गवारी टाळून आजाराच्या घडणाऱ्या प्रक्रियेवर मेंदूच्या प्रतिसादाचे मूलभूत स्वरुपाचे संशोधन करण्याचे ठरवले आणि त्यात २० बिलियन डॉलर इतर मोठी रक्कमही गुंतवली. आशा अशी होती, त्यातून वर्तनाशी थेट संबंध असलेल्या मानवी शरीरातल्या गुणसूत्रांचा ( बायोमार्कर-जैवचिन्हक) शोध लागावा. पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. कारण, ज्या गुणसूत्रांचा शोध घेतला गेला, ती गुणसूत्रे नाममात्र प्रभाव टाकणारी आहेत, असे वैज्ञानिकांच्या लक्षात आले. या फसलेल्या प्रयोगाचे वर्णन अॅलन फ्रान्सेस या वैज्ञानिक अशा प्रकाराने केले-“ए फॅसिनेटिंग इंटलेक्चुअल अॅडव्हेंचर, बट ए कम्प्लिट क्लिनिकल फ्लॉप”- म्हणजे बुद्धीला थरार पण प्रयोगशाळेत आपटबार.
पण एक प्रयोग फसला म्हणून विज्ञान हातावर हात ठेऊन थोडेच बसते. उलट दुप्पट जोमाने कामाला लागते. तसे इथेही विज्ञानाचे “बढे चलो” सुरु राहिले. हे खरेच होते की, बिघडलेले-बहकलेले वाह्यात जिन्स म्हणजेच शरीरातली गुणसूत्रे हेच यावरचे एकमेव उत्तर नसले तरीही, यासंदर्भाने जर्मनीतल्या फ्रिबर्ग इथल्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या सायकिआट्री आणि सायकोथेरपी विभागाच्या प्रमुख असलेल्या डॉ. लुडगर इल्स्ट यांनी, स्क्रित्झोफ्रेनिया, अटेंशन डिफिसिट म्हणजेच एकाग्रभंगता, चिंताग्रस्तता, आत्मकेंद्रितता, अतिक्रियाशीलता आदी मानसिक विकार हे क्रोमोसोम २२ गुणसूत्रात झालेल्या बिघाडातून म्हणजेच छोटासा भाग गमावण्यातून संभवतात हे सिद्ध केले. यातून बऱ्याच मानसिक आजारांवर ते शरीराचे आजार आहेत, म्हणूनच या अनुषंगाने उपचार करणे तितकेच आवश्यक आहे, अशी समज-उमज वाढली.
२००७ मध्ये तो महत्त्वाचा टप्पा आला. युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वेनियामध्ये झालेल्या संशोधनात असे आढळून आले की, ज्या १०० रुग्णांमध्ये मनोविकाराची लक्षणे वाढत होती किंवा जे बौद्धिक आकलनात कमकुवत होते, त्यांना प्रत्यक्षात ऑटोइम्युन डिसिज (स्वप्रतिरक्षारोग) झालेला आहे. त्यांच्या शरीरात चेतापेशींमधल्या कळीची भूमिका बजावणाऱ्या ग्राहींविरोधात प्रतिपिंडे तयार झाली होती. याच घडामोडींमुळे रुग्णांच्या मेंदूला सूज येऊन आक्रमकपणा, वेडसरपणा, भ्रमिष्टपणा वाढीस लागला होता. यातल्या ५ ते १० टक्के रुग्णांमध्ये मेंदूवर हल्ला करणारी प्रतिपिंडे आढळून आली होती. या रोगाचे नाव होते, “अँटि रिसेप्टर एन्सिफिलिटिस”. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बहुसंख्य रुग्णांमध्ये प्रतिपिंडे नष्ट करून वा प्रतिरक्षा उपचारपद्धतकेंद्री औषधे वा स्टिरॉइड्स वापरून हा आजार बरा करता येण्याजोगा होता. काही तुरळक रुग्णांमध्ये अगदी लहान वयातच प्रतिरक्षासंस्थेतल्या बिघाडामुळे मानसिक रोग जडण्याची शक्यता असते. असाच आजार लेखाच्या प्रारंभी उल्लेख आलेल्या जेसिका ह्युस्टन या तरुणीबाबत घडलेला होता. आणि हाच आजार अनेकदा प्रौढ वयाच्या माणसांनाही झाल्याचेही समोर येत आहे. ६४ वर्षे वयाचे या आजाराने त्रस्त असलेले एक गृहस्थ कितीतरी तास आपल्या बागेतले गवत कापण्याचे काम करत असल्याची एक केस यासंदर्भाने नोंदली गेली. संशोधकांना असे आढळून आले की, माणसाच्या मेंदूतले जे मज्जातंतू असतात, त्यावर प्रतिपिंडांनी हल्ला केल्याने अशी अवस्था येते.
(द इकॉनॉमिस्टमध्ये प्रकाशित झालेल्या लेखाचा हा साभार स्वैर अनुवाद आहे.)