Home » Blog » Panori Murder : गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना वृध्देचा केला खून

Panori Murder : गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना वृध्देचा केला खून

by प्रतिनिधी
0 comments
Panori Murder

कोल्हापूर : प्रतिनिधी : गावात एकटीच राहणाऱ्या वृद्धेचे दागिने लुटण्यासाठी त्यांनी अनंत चतुर्दशीदिवशी निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणूकीचा दिवस निवडला. वृद्धेचा खून करुन दागिने लुटले. तिचा मृतदेह गोबर गॅसच्या टाकीत टाकला. पण डोक्यावरील झालेल्या गंभीर जखम लक्षात घेऊन पोलिसांनी खुनाचा तपास केला आणि गावातील दोन तरुणांच्या हातात बेड्या ठोकून खुनाचा छडा लावला. (Panori Murder)

कोल्हापूर जिल्ह्यातील पनोरी गावातील एकट्या राहणाऱ्या श्रीमंती हरी रेवडेकर (वय ७३) या रविवारी ७ सप्टेंबर रोजी घरात दिसून आल्या नाहीत. आजुबाजुच्या शेजाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह घराजवळील गोबर गॅसच्या टाकीत मिळून आला. मृतदेह बाहेर काढला असता डोक्यावर मारहाणीची जखम दिसून आली. त्यानंतर राधानगरी पोलिस ठाण्यात त्यांचा दत्तक पुत्र अमित हरी रेवडकर यांनी फिर्याद दिली. श्रीमंत रेवडेकर यांचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी गोबर गॅसमध्ये टाकून दिल्याचे पोलिसांच्या तपासात दिसून आले. (Panori Murder)

राधानगरी पोलिसांबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने समांतर तपास सुरू केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने गुन्हा घडला त्या भागाची तपासणी केली. खुनाचा प्रकार रात्री दहा ते रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडल्याचे स्पष्ट झाले. त्याच दिवशी गावात अनंत चतर्दशी दिवशी ‘ग्रामीण युवा शक्ती संघटना’ आणि ‘पनोरीचा राजा’ या दोन गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक होती. गावातील बहुतांशी नागरिक मिरवणूक पाहण्यासाठी गेले होते. त्या काळात खून झाल्याची घटना झाली असावी असा पोलिसांनी कयास बांधून तपास सुरू केला. (Panori Murder)

पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करुन मिरवणूकीत कोण सहभागी झाले नव्हते याचा आढावा घेतला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अभिजीत मारुती पाटील (वय ३४) आणि कपिल भगवान पातले (३४) या गावातील दोघे मिरवणूकीतून बाहेर गेले होते. तसेच खुनाची घटना घडली त्यावेळी आजुबाजूच्या परिसरात फिरत होते. पोलिसांनी त्याची माहिती काढली असता दोघे आर्थिक अडचणीत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी वृद्धेचा खून केल्याची कबुली दिली.

अनंत चतुदर्शी दिवस निवडला

पोलिसांनी चौकशी केली असता अभिजीत पाटील आणि कपिल पातले हे दोघे बालपणीचे मित्र असून सध्या दोघेही आर्थिक अडचणीत असल्याने त्या दोघांना पैशाची नितांत गरज होती. श्रीमंती रेवडेकर या घरात असून त्यांच्या अंगावर दागिने असल्याची त्यांना माहिती होती. त्यामुळे त्यांनाच लुटण्याचा त्यांनी कट रचला. त्यासाठी त्यांनी अनंत चतुदर्शी चा दिवस निवडला. गावांमध्ये बहुतांशी नागरिक मिरवणूक पाहण्यासाठी जात असल्याने आणि श्रीमंती एकट्याच घरी असल्याची संधी साधून त्यांनी शनिवारी रात्री घरात प्रवेश केला. दोघांनी श्रीमंत यांच्या तोंडात बोळा कोंबला. दागिने लुटत असताना त्यांनी प्रतिकार केल्याने त्यांनी डोक्यात जड वस्तूने मारहाण करुन खून केला. दागिने लुटल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह साडीत गुंडाळून विजय शंकर बरगे यांच्या घरामागील गोबरगॅसमध्ये टाकून दिल्याची कबुली दोघांनी दिली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आणि राधानगरी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस निरीक्षक संतोष गोरे पुढील तपास करत आहेत. (Panori Murder)

यांनी केला तपास

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, राधानगरीचे पोलिस निरीक्षक संतोष गोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ, पोलिस हवालदार सुरेश पाटील, रुपेश माने, राम कोळी, विनोद कांबळे, रोहित मर्दाने, संजय देसाई, अमित सर्जे, राजू कांबळे, विजय इंगळे, राजेंद्र वरांडेकर, हंबिरराव अतिग्रे, प्रदीप पाटील, राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक पोवार मॅडम, भोसले, हवालदार पिंटू खामकर, शेळके, सुदर्शन पाटील, रघू पोवार हे अधिकारी आणि कर्मचारी तपासात होते.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00