Home » Blog » New Zealand : न्यूझीलंडने केला शेवट गोड

New Zealand : न्यूझीलंडने केला शेवट गोड

अखेरच्या कसोटीत इंग्लंडवर ४२३ धावांनी मात

by प्रतिनिधी
0 comments
New Zealand

हॅमिल्टन : न्यूझीलंडने मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात मंगळवारी इंग्लंडवर ४२३ धावांनी मात करत शेवट गोड केला. विजयासाठी ६५८ धावांचे खडतर आव्हान असताना इंग्लंडचा दुसरा डाव २३४ धावांत संपुष्टात आला. तथापि, इंग्लंडने सुरुवातीच्या दोन कसोटींमधील विजयासह ही मालिका २-१ अशी जिंकली. (Newzealand Victory)

चौथ्या दिवसअखेर इंग्लंडची अवस्था २ बाद १८ अशी झाली होती. पाचव्या दिवशी जेकब बेथेल आणि जो रूट यांनी पहिल्या सत्रामध्ये शतकी भागीदारी रचून कडवा प्रतिकार केला. हे दोघे बाद झाल्यानंतर मात्र इंग्लंडच्या अन्य फलंदाजांचा फार काळ टिकाव लागला नाही. बेथेलने ९६ चेंडूंमध्ये १३ चौकार व एका षटकारासह ७६, तर रूटने ६४ चेंडूंमध्ये १० चौकारांसह ५४ धावा केल्या. या खेळीसह रूटने न्यूझीलंडच्या भूमीवर एक हजार कसोटी धावांचा टप्पाही ओलांडला. त्याने न्यूझीलंडमध्ये १००६ कसोटी धावा केल्या असून या देशात हजार धावा पूर्ण करणारा तो पहिलाच परदेशी कसोटीपटू ठरला. त्याचप्रमाणे, न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्येही त्याने अग्रस्थान पटकावले. त्याने न्यूझीलंडविरुद्ध ४० डावांमध्ये १९२५ धावा करून पाकिस्तानच्या जावेद मियाँदादला (२९ डावांत १९१९ धावा) मागे टाकले. (New Zealand Victory)

न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने ४, तर मॅट हेन्री आणि टिम साउदी यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. न्यूझीलंडचा हा कसोटी क्रिकेटमधील धावांच्या तुलनेत संयुक्तरीत्या सर्वांत मोठा विजय ठरला. यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध त्यांनी २०१८ मध्ये ४२३ धावांनी विजय नोंदवला होता. सामन्यात एकूण ७ विकेट व पहिल्या डावात अर्धशतक ठोकणारा सँटनर सामनावीर ठरला. मालिकेत दोन शतके व एका अर्धशतकासह ३५० धावा करणाऱ्या इंग्लंडच्या हॅरी ब्रुकला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. (New Zealand Victory)

साउदीचा भावपूर्ण निरोप

कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळणारा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउदीने हॅमिल्टनच्या सॅडन पार्क मैदानावर भावपूर्ण निरोप घेतला. “विजयासह निरोप घेणे चांगले आहे. न्यूझीलंड क्रिकेटकरिता योगदान देता आल्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. न्यूझीलंड संघाकडून खेळण्याचा कालखंड खूप विशेष होता. निरोप घेताना दु:ख होत असले, तरी कारकिर्दीबद्दल मी समाधानी आहे,” असे साउदी म्हणाला. यावेळी न्यूझीलंडचे महान गोलंदाज रिचर्ड हॅडली यांच्या हस्ते साउदीचा सत्कारही करण्यात आला. न्यूझीलंडतर्फे हेडली यांनी सर्वाधिक ४३१ कसोटी विकेट घेतल्या असून साउदी ३९१ विकेटसह दुसऱ्या स्थानी आहे.

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00