कोल्हापूर : प्रतिनिधी : येथील ज्येष्ठ पत्रकार दिलावरखान आयुबखान मुन्शी पालकर तथा नाना पालकर (वय ७८) यांचे सोमवारी (दि. २७ जानेवारी) उपचारादरम्यान निधन झाले. शनिवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यात त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला होता. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.(Nana palkar death)
स्वातंत्र्य चळवळीतील सत्याग्रही मुन्शी आर. आर. पालकर यांचे नाना हे पुत्र. मुन्शी पालकर येरवड्याच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर थेट कोल्हापुरात आले. संस्थान काळातील कोल्हापूरच्या टाऊन हॉलजवळील प्रवेश कमानीजवळ तंबू मारून पिटीशन अँड बॉण्ड रायटर म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. त्याकाळी गोरगरीब ग्रामीण जनतेला मदतीचा हात देत अल्पावधीतच झाडाखालचे वकील म्हणून ख्याती मिळवली. सोडपत्राच्या जाहिराती देण्यात मुन्शी आर. आर. पालकर यांचा हातखंडा होता.(Nana palkar death)
त्यांचे दुसरे पुत्र म्हणजे दिलावरखान उर्फ नाना पालकर. पदवीनंतर त्यांनी प्रारंभीच्या काळात धोपेश्वरकर यांच्या जयेंद्र पब्लिसिटीमध्ये आऊट डोअर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले. पुढे नानांच्या वडिलांनी साप्ताहिक तडजोड नावाचे नियतकालिक सुरू केले. त्या माध्यमातून नाना पालकर यांची पत्रकारिता सुरू झाली. १९६५ पासून फ्री लान्स पत्रकार म्हणून कोल्हापुरातील पुढारी, सत्यवादी, साप्ताहिक पोलीस टाइम्स, लोकसेवक, समाज या वृत्तपत्रात त्यांनी लेखन केले. १९९० पासून ‘दैनिक नवाकाळ’ चे कोल्हापूर प्रतिनिधी म्हणून ते काम करीत होते. (Nana palkar death)
पन्नास वर्षाहून अधिक काळ त्यांनी पत्रकारिता केली. पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना अनेक संस्थांच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. पत्रकारांच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रेस क्लब ऑफ इंडियाचे ते बराच काळ सदस्य होते. महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीचे त्यांनी विभागीय अध्यक्षपद भूषवले होते. इंग्लंड आणि अमेरिका येथे त्यांचे काही काळ वास्तव्य होते. याशिवाय जेदाह, मक्का मदिना येथे त्यांनी धार्मिक पर्यटनही केले होते. (Nana palkar death)
हेही वाचा :
चळवळीतील परिघाबाहेरच्या स्त्रियांचा शोध गरजेचा
आयजीसह सात पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा