Home » Blog » MVA Slams: निव्वळ आश्वासनांचा अर्थसंकल्प

MVA Slams: निव्वळ आश्वासनांचा अर्थसंकल्प

भाषणाचा सुकाळ, निधीचा दुष्काळ; विरोधकांची टीका

by प्रतिनिधी
0 comments
MVA Slams

मुंबई : प्रतिनिधी : ज्यांच्या मतांवर महायुती सरकार सत्तेत आले त्याच लाडक्या बहिणी, शेतकरी, वंचित, आदीवासी यांचा महायुतीने विश्वासघात केला. हा अर्थसंकल्प निव्वळ आश्वासनांचा अर्थसंकल्प आहे. सामान्यांना दिलासा देणारी एकही तरतूद या अर्थसंकल्पात नसल्याची टीका विरोधी पक्षांनी केली. अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारी १० मार्च अर्थसंकल्प सादर केला. त्यावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली.( MVA Slams)

निवडणुकीआधी गुलाबी जॅकेट घालून फिरणारे आता गुलाबी जॅकेटही विसरले आणि लाडक्या बहिणींना विसरले, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

आज अर्थसंकल्प झाल्यावर महाविकास आघाडीने विधान भवनाच्या पायऱ्यांवर महायुती सरकार विरोधात आंदोलन केले. हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त घोषणांचा सुकाळ, निधीचा मात्र दुष्काळ आणि सरकारची जुमलेबाजी या अर्थसंकल्पातून दिसली, असा संताप वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. (MVA Slams)

बजेटमध्ये लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली नाही, लाडक्या बहिणींचा उल्लेखही भाषणात नाही. एकीकडे लाडकी बहीण योजनेत वेगवेगळे निकष लावून महिलांना अपात्र केले जात आहे. दुसरीकडे निधी वाढवून दिला नाही. यावरून तिजोरीत खडखडाट असल्याचे स्पष्ट आहे, असे सांगून वडेट्टीवार म्हणाले की, या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांशीही सरकारने गद्दारी केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असे आश्वासन महायुती सरकारने निवडणुकीत दिले होते. पण अर्थसंकल्पाच्या भाषणात बळीराजाच्या पदरी निराशा आली आहे. त्यामुळे महायुती सरकार क्या हुआ तेरा वादा? बँका आता शेतकऱ्यांना कर्ज देणार नाहीत. याला कोण जबाबदार, असा सवाल त्यांनी  उपस्थित केला. (MVA Slams)

या अर्थसंकल्पात मुंबई, पुणे येथील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाना भरघोस निधी देण्यात आला, उरलेला निधी नागपूर येथील प्रकल्पाना देण्यात आला. पण ग्रामीण भागातील योजना, प्रकल्पाकडे दुर्लक्ष करण्यात आले. शहरी भागातील प्रकल्प म्हणजे कंत्राटदारांसाठी हे बजेट आहे का? दलित, वंचित, आदिवासी सर्वसामान्यांचा विसर या सरकारला पडल्याची टीका नेत्यांनी केली.

निव्वळ आश्वासने : जयंत पाटील

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बजेटवर टीका केली. या बजेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सामान्य माणसांसाठीही यामध्ये कसलीही तरतूद नाही. या अर्थसंकल्पात निव्वळ आश्वासनांचाच म्हणावा लागेल, अशी टीका पाटील यांनी केली. (MVA Slams)

बोगस अर्थसंकल्प : उद्धव ठाकरे लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्यासह अन्य अनेक मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख यांनी प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “आज आचार्य अत्रे असते तर, गेल्या १० हजार वर्षात इतका बोगस अर्थसंकल्प झाला नसेल, असे म्हणाले असते. निवडणूक काळात त्यांनी वारेमाप जाहिराती केल्या. मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी,” अशी ही अवस्था आहे. निवडणूक प्रचार काळात महायुतीकडून वारेमाप जाहिराती करण्यात आल्या. अनेक आश्वासने देत मते मिळवली. त्यातील ईव्हीएम घोटाळा हा भाग वेगळा आहे. पण प्रचंड बहुमताच्या या सरकारने थापांमधून एकतरी आश्वासन पूर्ण केले का? लाडक्या बहिणींना २१०० रुपये दिले का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

हेही वाचा :

संगमेश्वरात छत्रपती संभाजीराजेंचे, आग्र्यात शिवछत्रपतींचे भव्य स्मारक उभारणार

सीएम बोलले, माझा आवडता अभिनेता ‘नरेंद्र मोदी’

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00