Home » Blog » Mokama : रक्तरंजित संघर्षामुळे मोकामा ची निवडणूक बिहारच्या केंद्रस्थानी

Mokama : रक्तरंजित संघर्षामुळे मोकामा ची निवडणूक बिहारच्या केंद्रस्थानी

by प्रतिनिधी
0 comments
Mokama

मोकामा विधानसभा मतदारसंघ हा बिहारमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. इथले एक बाहुबली दुलारचंद यादव यांच्या हत्येमुळे मोकामाबरोबरच बिहारचे राजकारणही तापले आहे. हत्येचा आरोप एनडीएचे उमेदवार (जेडीयु) अनंत सिंग यांच्यावर आहे. हत्येनंतरच्या दिवशीही दिमाखात प्रचार करणाऱ्या अनंत सिंग यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. आपल्याच आघाडीच्या उमेदवाराला अटक करून सत्ताधाऱ्यांनी टीकेची धार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीत भाजप आणि एनडीएने लालूप्रसाद यादव यांच्या काळातील जंगलराज हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठेवला आहे. मोकामाच्या घटनेमुळे एनडीएला जंगलराजच्या मुद्द्यावर बॅकफूटवर जावे लागले आहे.

विजय चोरमारे

मोकामामध्ये लढत तिरंगी आहे. संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अनंत सिंह, राष्ट्रीय जनता दलाच्या वीणा देवी आणि प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाचे पीयूष प्रियदर्शी. ज्यांची हत्या झाली ते दुलारचंद यादव हे पीयूष प्रियदर्शी यांचे समर्थक होते. दुलारचंद हे आधी राजदचे समर्थक होते आणि तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले पाहिजेत असे त्यांचे म्हणणे होते. पियूष प्रियदर्शी यांना राजदची उमेदवारी मिळावी यासाठी ते आग्रही होते. परंतु तेजस्वी यादव यांनी बाहुबली सूरजभान यांच्या पत्नी वीणा देवी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पीयूष प्रियदर्शी जनसुराज्य पक्षाकडे गेले आणि दुलारचंद यादव त्यांचे समर्थक बनले. (Mokama)

दुलारचंद यांचा प्रवास

तसा दुलारचंद यादव यांचा प्रवास बिहारमधल्या सत्तेच्या समीकरणांसोबत हेलकावत राहिला. १९९० मध्ये लालूप्रसाद यादव यांच्या कृपाछत्राखाली त्यांनी राजकारण सुरू केले. मोकामा मधून त्यांनी लोकदल (बी) आणि राजदकडून निवडणूक लढवली परंतु यश मिळाले नाही. नंतर काळाची गरज ओळखून त्यांनी नीतिश कुमार यांच्याशीही जमवून घेतले. २०१९ च्या निवडणुकीत ते जेडीयुच्या प्रचारात होते. २०२२ मध्ये अनंत सिंह तुरुंगात गेल्यावर त्यांची आमदारकी रद्द झाली. त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत अनंत सिंह यांच्या पत्नी नीलम देवी राजदकडून उभ्या होत्या, तेव्हा दुलारचंद यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. तेच अनंत सिंह यावेळी जेडीयुकडून उभे आहेत. बिहारमधले बाहुबली सोयीने पक्ष बदलतात. आणि सगळ्या पक्षांना बाहुबली हवे असतात हेच मोकामाच्या इतिहासावरून दिसते.

जातीची गणिते

मोकामामध्ये अनंत सिंग आणि वीणा देवी (सूरजभान यांच्या पत्नी) हे दोन्ही उमेदवार भूमिहार समाजाचे आहेत. पियूष प्रियदर्शी हे धानूक जातीचे आहेत. धानूक ही कुर्मी समाजाची पोटजात आहे. मोकामा मध्ये धानूक ७५ हजार, भूमिहार ५० हजार, यादव ४० हजार, पासवान २५ हजार, राजपूत १५ हजार, मुसलमान १२ हजार अशी मतदारसंख्या आहे. जेडीयु आणि राजद दोन्ही उमेदवार भूमिहार असले तरी भूमिहार मतांचे ध्रुवीकरण होऊन ती अनंत सिंह यांच्या पारड्यात जातील असे मानले जाते. त्याचप्रमाणे धानूक मते पीयूष प्रियदर्शी यांना मिळतील. आता यादव मते राजदला मिळतील की अनंत सिंह यांना हरवण्यासाठी पीयूष प्रियदर्शी यांच्याकडे वळतील याचे कुतूहल आहे. राजकीय अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार बदलत्या परिस्थितीत इथला सामना जेडीयु आणि जनसुराज्य यांच्यात होण्याची शक्यता आहे. राजदच्या उमेदवार मागे पडतील. इथे भुमिहार मतदार अनंत सिंह यांच्यामागे एकगठ्ठा असताना राजदने भूमिहार उमेदवार देऊन चूक केल्याचे मानले जाते. बदलत्या परिस्थितीत तर परिस्थिती अधिक अडचणीची बनली आहे.

मोकामा: गुन्हेगारीचे केंद्र

बिहारमधील मोकामा हे कधी काळी औद्योगिक केंद्र म्हणून ओळखले जात असे. ब्रिटिश काळात इथे रेल्वे यार्ड आणि कारखाने गजबजलेले होते. पण १९८०च्या दशकानंतर या परिसरात गुन्हेगारी वाढू लागली. गंगेच्या टाल क्षेत्रातील जमीनव्यवहार आणि त्याअनुषंगानं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या संघर्षातून अनेक गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या. याच काळात अनंत सिंहसारख्या दबंग नेत्याचा उदय झाला. एकेकाळी डाळ उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला हा प्रदेश हिंसाचारासाठी ओळखला जाऊ लागला. आजसुद्धा इथे वर्षभरात डझनभर गोळीबाराच्या घटना घडतात. कायद्यापेक्षा इथे टोळ्यांचे राज्य असल्याचे सांगितले जाते. (Mokama)

अनंत सिंह यांच्यावर अनेक खुनांसह ३८ गुन्हे

अनंत सिंह भूमिहार समाजातील आहेत. या परिसरातील सर्वात मोठे बाहुबली म्हणून ते ओळखले जातात. १९९०च्या दशकापासून ते मोकामाचे आमदार आहेत. त्यांनी जेडीयू आणि राजद या दोन्ही पक्षांकडून निवडणुका लढवल्या. त्यांच्या विरोधात ३८ गुन्हे दाखल आहेत. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि खंडणीसारखे गंभीर आरोप आहेत. २०१९ मध्ये त्यांच्या घरातून एके ४७ रायफल सापडली होती, त्यासाठी त्यांना दहा वर्षांची शिक्षा झाली. मात्र २०२४ मध्ये ते निर्दोष ठरले.

जुना शत्रू, नवा सत्तासंघर्ष

सूरजभान सिंह हे मोकामाचे दुसरे बाहुबली. २००० साली ते तुरुंगातूनच आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी अनंत सिंह यांचे भाऊ दिलीप सिंह यांना पराभूत केले होते. अलीकडेच ते राष्ट्रीय जनता दलात दाखल झाले. त्यांच्या पत्नी वीणादेवी या सध्या मोकामातून राजदच्या उमेदवार आहेत. अनंतकुमार यांच्याशी त्यांची लढत आहे. तिसरे उमेदवार आहेत प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाचे प्रियदर्शी पीयूष. प्रियदर्शी पीयूष यांनी टाटा इंस्टिट्यूट मधून एमएसडब्ल्यू केले आहे. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती परंतु त्यांचा फारसा प्रभाव पडला नव्हता. (Mokama)

दुलारचंद यादवची दहशत

मोकामाच्या टाल भागात १९८०च्या दशकापासून दुलारचंद यादवचा गट प्रभावी होता. ७६ वर्षीय दुलारचंद याच्यावर जमीन बळकावणे, खंडणी आणि गोळीबाराचे अनेक गुन्हे होते. २०१९  मध्ये त्याला अटक झाली होती. निवडणूक जाहीर झाल्यापासून दुलारचंद वारंवार जाहिरपणे अनंत सिंह यांना आव्हान देत असे. अनंत सिंह छोटे सरकार असेल तर पीयूष प्रियदर्शी बडे सरकार आहे, असे म्हणायचे. टाल भागात त्याची दहशत होत

गुन्हेगारी आणि वर्चस्वाची लढाई

मोकामात गँगवार १९८० च्या दशकात रुजली. अनंत सिंह आणि विवेका पहलवान यांच्या टोळ्यांमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू झाला — दोघेही लदमा गावचेच होते. या संघर्षात अनेकांचे बळी गेले. भूमिहार आणि राजपूत समाजातील जातीय संघर्षाने हिंसाचार शिगेला पोहोचला. यातूनच अनेक नव्या टोळ्या उभ्या राहिल्या. टोळ्यांचे राज्य सुरू झाले. जमीन व्यवहार, खंडणी आणि स्थानिक राजकीय वर्चस्व यातून हा संघर्ष वाढत गेला.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00