नवी दिल्ली : जग परस्परावलंबी आहे, ते एकमेकांशी जोडलेले आहे. सर्वांना सर्वांची गरज आहे, कोणीही एकटे काहीही करू शकत नाही. मला ज्या वेगवेगळ्या मंचांवर जावे लागते, तिथे प्रत्येकजण संघर्षाबद्दल चिंतेत असतो. त्यातून आम्हाला लवकरच मुक्तता मिळेल अशी अपेक्षा पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. (Modi podcast)
वाढत्या जागतिक संघर्षांच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांसारख्या संघटना अप्रस्तुत ठरल्या आहेत. त्यांच्यात कोणत्याही सुधारणा झालेल्या नाहीत, असे मतही मोदी यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अमेरिकन शास्त्रज्ञ लेक्स फ्रिडमन यांच्याशी एका पॉडकास्ट मुलाखतीदरम्यान हे मत व्यक्त केले.
“ज्या आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण झाल्या आहेत त्या जवळजवळ असंबद्ध झाल्या आहेत, त्यामध्ये कोणतीही सुधारणा नाही. संयुक्त राष्ट्रांसारख्या संस्था त्यांची भूमिका बजावू शकत नाहीत. जगातील जे लोक कायदे आणि नियमांची पर्वा करत नाहीत ते सर्व काही करत आहेत, त्यांना कोणीही रोखू शकत नाही,” असे ते म्हणाले. (Modi podcast)
मोदी यांनी यावेळी संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांवर टीका केली. मध्य पूर्वेत सुरू असलेली युद्धे आणि चीन-अमेरिका तणावाचा संदर्भ देत मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जागतिक तणावाची तीव्रता वाढत आहे. कोविड-१९ ने प्रत्येक राष्ट्राच्या मर्यादा उघड केल्या. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी एकतेची गरज अधोरेखित केली.
कोविडने जागेवर आणले…
ते म्हणाले, “कोविड-१९ ने आपल्या सर्वांच्या मर्यादा उघड केल्या आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने स्वतःला कितीही एक महान राष्ट्र, खूप प्रगतशील, वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत प्रगत समजत असलो तरी कोविड-१९ च्या काळात, आपल्या सर्वांना जागेवर आणले. हा असा मोठा धडा होता की जग त्यातून काहीतरी शिकेल. आपण एका नवीन जागतिक व्यवस्थेकडे वाटचाल करू, परंतु दुर्दैवाने, परिस्थिती अशी आहे की शांततेकडे वाटचाल करण्याऐवजी जग विखुरले, अनिश्चिततेचा काळ आला आणि युद्धाने ते अधिक अडचणीत आणले,” असे निरीक्षण पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नोंदवले. (Modi podcast)
संघर्षाकडून सहकार्याकडे जाण्याची गरज
संघर्षापासून आपल्याला आता सहकार्याकडे वळावे लागेल, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. विकासकेंद्री दृष्टिकोन पुढे जाण्याचा मार्ग म्हणून स्वीकारावा लागेल. विस्तारवाद परस्पर जोडलेल्या आणि परस्परावलंबी जगात काम करणार नाही, राष्ट्रांनी एकमेकांना पाठिंबा देण्याची गरज आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
गेल्या वर्षी, पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेला संबोधित करताना संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतून (UNGA) बदलाचे स्पष्ट आवाहन केले होते. त्यात सुधारणा ही प्रासंगिकतेची गुरुकिल्ली असल्याचे नमूद केले होते. त्यांनी असेही म्हटले होते की जागतिक कृतीचा जागतिक महत्त्वाकांक्षेशी सांधा जुळला पाहिजे. (Modi podcast)
अनेक दशकांपासून, भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) सदस्यत्व मिळण्यास पात्र आहे असा युक्तिवाद करत आहे. १९४५ मध्ये स्थापन झालेली १५ राष्ट्रांची परिषद २१ व्या शतकातील त्याच्या उद्देशासाठी योग्य नाही. त्यातून समकालीन भू-राजकीय वास्तवाचे प्रतिबिंब उमटत नाही, अशी भारताची भूमिका आहे. (Modi podcast)
सध्या, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाच स्थायी सदस्य आणि १० अस्थायी सदस्य देश आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेद्वारे दोन वर्षांच्या कालावधीसाठी ते निवडले जातात. रशिया, ब्रिटन, चीन, फ्रान्स आणि अमेरिका असे हे देश आहे. त्यांना व्हेटो करण्याचा अधिकार आहे.
हेही वाचा :
परदेश दौऱ्यांमध्ये कुटुंबीय हवेतच!
शिवाजी विद्यापीठ नामविस्ताराला तीव्र विराेध