नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात २०२४ मध्ये झालेल्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी अमेरिकेकडून देण्यात आलेल्या निधीबाबत केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल परराष्ट्र मंत्रालयाने घेतली आहे. भारताच्यादृष्टीने ट्रम्प यांनी केलेला दावा ही चिंताजनक बाब असल्याचे मंत्रालयाने म्हटले असून आमचे अधिकारी या निधीबाबतची सविस्तर माहिती घेत आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) स्पष्ट केले.(MEA on Trump)
मियामी येथे प्रायोरिटी समिटमध्ये बोलताना ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनाने भारताला दिलेल्या २१ दशलक्ष डॉलर्सच्या निधीवर तीव्र आक्षेप नोंदवला. तसेच त्यांनी हा निधी भारताच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याच्या उद्देशाने दिला होता. तसेच ‘दुसऱ्या कोणाला तरी निवडून आणण्याचा’ ते प्रयत्न करत होते, असा गंभीर आरोप केला होता. (MEA on Trump)
जैस्वाल म्हणाले, ‘‘आम्ही अमेरिकेच्या काही क्रियाकलाप आणि निधीबाबत अमेरिकेन प्रशासनाने दिलेली माहिती पाहिली आहे. या साहजिकच खूप त्रासदायक आहेत. यामुळे भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये परकीय हस्तक्षेपाबाबत चिंता निर्माण झाली आहे. संबंधित विभाग आणि एजन्सींनी या प्रकरणावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे या टप्प्यावर सार्वजनिक भाष्य करणे घाईचे ठरेल.’’
ट्रम्प काय म्हणाले होते?
मियामी येथे बोलताना ट्रम्प म्हणाले, “आम्हाला भारतातील मतदानावर २१ दशलक्ष डॉलर्स खर्च करण्याची गरज का आहे? माझा अंदाज आहे की ते दुसऱ्या कोणाला तरी निवडून आणण्याचा प्रयत्न करत होते. हे आम्हाला भारत सरकारला सांगायचे आहे… कारण रशियाने आपल्या देशात सुमारे दोन हजार डॉलर्स खर्च केल्याचे आपण ऐकतो, तेव्हा ही मोठी गोष्ट होती. त्यांनी दोन हजार डॉलर्स इंटरनेटवरील जाहिरातीवर खर्च केले.” (MEA on Trump)
भारत आणि भारताचे पंतप्रधानांबद्दल आदर व्यक्त करताना, ट्रम्प यांनी परदेशात मतदानासाठी लाखो खर्च करण्याच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ते म्हणाले, ‘‘मला भारताबद्दल खूप आदर आहे. मला पंतप्रधानांबद्दल खूप आदर आहे. ते दोनच दिवसांपूर्वी येथे येऊन गेले. पण आम्ही तेथील मतदार मतदान करावेत, यासाठी २१ दशलक्ष डॉलर्स लक्ष देत आहोत.’’ (MEA on Trump)
अमेरिकेच्या परकीय मदतीचा वापर परदेशात लोकशाही प्रक्रियांवर प्रभाव पाडण्यासाठी केला जावा का, असा प्रश्न आता टीकाकार आणि विश्लेषक करत आहेत. ट्रम्प यांच्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
हेही वाचा :
मोदी सरकारचे प्राधान्य पीआर स्टंटला, राष्ट्रीय सुरक्षेला नाही
सावरकरांची ऐतिहासिक उडी खरी की खोटी?