कोल्हापूर : प्रतिनिधी : मित्राचा खून करणाऱ्या तिघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. तांबे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अमिर उर्फ कांचा अब्बल मुल्ला (वय.२७), सुनील बाळू खोत (४८), सिद्धराम उर्फ सिद्धार्थ शांताप्पा म्हेतर उर्फ म्हेतरी (३० सर्व रा. लिंबू चौक, तरंगे मळा, इचलकरंजी, जि.कोल्हापूर) अशी आरोपींची नावे आहेत. संतोष तडाके याचा खून झाला होता. या गुन्ह्यात चार आरोपी होते. आरोपी संजय शरद शेडगे हा आरोपी मयत झाल्याने तिघांविरोधात खटल्याची सुनावणी झाली. या खटल्यात मंजूषा पाटील यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले. (Manoli murder)
या खटल्याची माहिती अशी की, शाहूवाडी तालुक्यातील मानोली येथील कोकण दर्शन पॉईंटवर २१ सप्टेंबर २०१९ रोजी खुनाची घटना घडली होती. यामध्ये संजय मोहन तडाखे यांचा खून झाला. संजय शेडगे आणि संतोष तडाके हे दोघे नात्याने मावस भाऊ होते. संतोष तडाके हा संजय शेडगे यांच्या घरातील लोकांना आणि नातेवाईकांना सातत्याने त्रास देत होता. संतोष तडाके याचा काटा काढण्यासाठी संजय शेडगे याने त्याचे मित्र अमिर मुल्ला, सुनील खोत, सिध्दराम म्हेतरी यांची मदत घेतली. विशालसह चौघा आरोपींनी विशाळगडला पार्टी करण्यासाठी बोलावून घेतले. त्यानंतर साक्षीदार राकेश युवराज जाधव याच्या मोटारीने विशाळगडकडे निघाले. मलकापूर जाताना त्यांनी मद्य आणि खाण्यासाठी चायनीज राईस घेतला. त्यानंतर सर्वजण आंबा, मानोली मार्ग कोकण दर्शन पॉईंट येथे आले. संतोष तडाकेला मद्य प्राशन करायला लावले. त्यानंतर सिद्राम म्हेत्रीने तडाकेच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तर संजय शेडगेने चाकून गळा कापून खून केला. चौघांनी त्याचा मृतदेह कोकण दर्शन पॉईंटच्या दरीत फेकून दिला. तसेच कोयता, चाकूही दरीत फेकले. शेजारील ओढ्यात हातपाय देऊन संतोष तडाकेचा मोबाईल जंगलातील झाडीत फेकून दिला. त्यानंतर ते परत कारने इचलकरंजीकडे निघाले. जाताना रक्ताळेलेले कपडे वारुळ जवळील कडवी नदीतील वाहत्या पाण्यात फेकून दिले. (Manoli murder)
गाईडने दिली पोलिस पाटलांना माहिती
आंबा परिसरातील गाईड दिनेशा आनंदा कांबळे याने कोकण दर्शन पॉईंटच्या पेव्हिंग ब्लॉक्सवर रक्त सांडलेले पाहिले. त्याने त्या संदर्भात व्हिडिओ मित्र प्रमोद माळी यांना पाठवला. माळी याने हा व्हिडिओ पोलिस पाटील दत्तात्रय गोमाडे यांना पाठवला. त्यानंतर त्यांनी शाहूवाडी पोलिसांना माहिती कळवली. पोलिसांनी कोकण पॉईंट परिसरातील दरीत शोध घेतला असता संतोष तडाके याचा मृतदेह मिळाला. त्यानंतर पोलिस पाटील गोमाडे यांनी शाहूपुरी पोलिसांकडे फिर्याद दिली. शाहूवाडी पोलिस ठाण्याचे तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी गुन्हाचा तपास करुन चौघां आरोपींना अटक केली. या गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले. (Manoli murder)
सतरा साक्षीदार तपासले
सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी सतरा साक्षीदार तपासले. या गुन्ह्यात पोलिसांकडून चौकशी सुरू असताना आरोपी संजय शेडगे हा मयत झाला. त्यामुळे तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला. या गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हते. पण मयत आणि आरोपींना सर्वात शेवटी एकत्र पाहिलेला पुरावा, आरोपींनी गुन्हा केलेला पुरावा, गुन्ह्यात जप्त केलेली हत्यारे व वस्तूंचा पंचनामा, घटनस्थळ पंचनामा महत्वाचा ठरला. या खटल्यात अमिर पन्हाळकर, रंगराम भोसले, संजय कांबळे, आरती पाडळकर, तुषार नलवडे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. साक्षीदारांच्या साक्षी आणि सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी केलेला युक्तीवाद , उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे ग्राह्य धरुन न्यायालयाने तिन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि वीस हजार रुपयांचा दंड ठोठावला. (Manoli murder)
हेही वाचा :
दिशा सालियन मृत्यूची निष्पक्ष चौकशी करा