जमीर काझी : मुंबई : “भाजप आणि त्यांची मातृसंस्था आरएसएस तिरंगा यात्रेच्या नावाखाली फक्त फोटोसेशन करतात. पण देशभक्ती हा कॅमेऱ्यांसाठी वर्षातून एकदा घालायचा पोशाख नाही. त्यांच्या या तिरंगा यात्रेमुळे आरएसएसने ५२ वर्षे तिरंगा न फडकविण्याचा इतिहास पुसला जाणार नाही, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी गुरुवारी केला. (Mahesh Tapase criticizes BJP and RSS)
राष्ट्रप्रेमी युवा दलाच्या कार्यकर्त्यांनी आरएसएस कार्यायावर तिरंगा फडकावला
आरएसएस-भाजप च्या तिरंगा रॅलीच्या दिखाव्यांवर तीव्र टीका करीत इतिहासातील नोंदी वेगळीच वस्तुस्थिती सांगत असताना हे लोक नियोजित पद्धतीने “राष्ट्रवादाचे” खोटे प्रदर्शन करीत असल्याचा आरोप महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, “आरएसएसने नागपूर येथील मुख्यालयावर सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय ध्वज दोनदा फडकवला. १५ ऑगस्ट १९४७ आणि २६ जानेवारी १९५० रोजी. त्यानंतर तब्बल ५२ वर्षे त्यांच्या मुख्यालयावर तिरंगा फडकला नाही. २००१ मध्ये राष्ट्रप्रेमी युवा दलाच्या तीन तरुण कार्यकर्त्यांनी तो जबरदस्तीने फडकवला. त्यांच्याविरुद्ध संघाने पोलिसांत तक्रार केली होती. न्यायालयीन प्रकरण आणि जनतेसमोरील नामुष्कीनंतरच संघाने स्वतःहून ध्वज फडकवण्यास सुरुवात केली.” याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (Mahesh Tapase criticizes BJP and RSS.)
ऑर्गनायझरकडून तिरंग्याची निंदानालस्ती करणारा लेख
महेश तपासे म्हणाले , संघाचेचे द्वितीय सरसंघचालक म. स. गोळवलकर यांनी स्वतः स्वातंत्र्यलढ्याला केवळ ‘भौगोलिक राष्ट्रवाद’ म्हणून नाकारले होते आणि त्यातून देशाच्या, त्यांच्या मते, ‘खऱ्या हिंदू राष्ट्रत्वाला’ बाधा पोहोचते असे म्हटले होते. त्यांच्या संघटनेचे मुखपत्र ऑर्गनायझरनेही १५ ऑगस्ट १९४७ च्या सुमारास आमच्या स्वातंत्र्यसैनिकांनी रक्त सांडून मिळवलेल्या तिरंग्याची निंदानालस्ती करणारा लेख प्रसिद्ध केला होता.”
हिंदू कधीच तिरंग्याचा आदर करणार नाहीत
भारताच्या संविधान सभेने तिरंग्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकार केल्याच्या स्वातंत्र्यपूर्व संध्येला, संघाने चे इंग्रजी मुखपत्र ऑर्गनायझरने १४ ऑगस्ट १९४७ च्या अंकात या निवडीची खालील शब्दांत निंदा केली होती:“नशिबाच्या लाथेने सत्तेवर आलेले लोक आपल्या हातात तिरंगा देऊ शकतात. पण हिंदू त्याचा कधीही आदर करणार नाहीत, वा तो आपलासा मानणार नाहीत. तीन हा अंकच अशुभ आहे आणि तीन रंगांचा ध्वज निश्चितच अतिशय वाईट मानसिक परिणाम निर्माण करेल व देशासाठी हानिकारक ठरेल. आता मोहन भागवत त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या जेन झी सोबतच्या संवादात याबाबतही बोलतील का?” असा प्रश्न महेश तपासे यांनी उपस्थित केला.
स्वातंत्र्य चळवळीतील आरएसएसची अनुपस्थिती
महेश तपासे म्हणाले, “१९२५ मध्ये संघाची स्थापना झाल्यापासून ते १९४७ पर्यंत संघटना म्हणून एकाही स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला नाही की सविनय कायदेभंग चळवळीत, तसेच १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखे नेते ब्रिटिशांच्या तुरुंगात असताना संघ काय करीत होती?” असा सवाल त्यांनी केला.
भाजप-आरएसएसची तिरंगा मोहिमांबाबतची सध्याची उत्सुकता हा इतिहास पुनर्लिखित करण्याचा प्रयत्न असल्याचे तपासे म्हणाले.“स्वातंत्र्यलढ्यापासून दूर राहून शंभर वर्षांनंतर त्या चळवळीवर प्रेम असल्याचा दावा करता येत नाही. तिरंगा हा त्यासाठी लढलेल्या, त्याग केलेल्या आणि प्राण अर्पण केलेल्या प्रत्येक भारतीयाचा आहे, असे त्यांनी सांगितले. (Mahesh Tapase criticizes BJP and RSS)