सतीश घाटगे : कोल्हापूर
महाराष्ट्र केसरी कुस्ती दंगलीत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने कुस्तीतील निर्णयावरुन पंचाची कॉलर धरली. त्यांना लाथ मारली. पवित्र कुस्ती आखाड्यात गुंडगिरीचा नमुना दाखवला. राक्षेच्या या कृत्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कुस्ती पंढरी कोल्हापूर नगरीतील हिंदकेसरी दीनानाथ सिंह, विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता राम सारंग यांच्यासह संघटक, कुस्तीप्रेमींनी राक्षेच्या कृतीचा निषेध केला. पंचांकडे दाद मागण्यासाठी अनेक मार्ग असतात. देवासमान पंचांना मारहाण करुन कुस्ती क्षेत्राला चुकीचा पायंडा पाडल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या.(Maharashtra kesari)
अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती दंगलीत गादी गटातील अंतिम लढत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली. सलामी झडताच अवघ्या काही सेकंदात मोहोळने शिवराजला आस्मान दाखवताच पंचांनी पृथ्वीराजला विजयी घोषीत केले. या निर्णयाविरोधात शिवराजने पंचांकडे दाद मागितली. निर्णयाने चिडलेल्या शिवराजने पंचाची कॉलर धरली. त्यांना लाथ मारली.
देवासमान पंचांना लाथ मारणे चुकीचे : हिंदकेसरी दीनानाथ सिंह
हिंदकेसरी दिनानाथ सिंह यांनी पंचांना लाथ मारल्याच्या घटनेचा तीव्र निषेध केला. अनेकवेळा पंचांचा निर्णय अमान्य असतो, पण पंचांकडे वेगवेगळ्या पद्धतीने दाद मागता येऊ शकते याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, “कोल्हापुरात आमच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या कुस्तीचे संस्कार झाले आहेत. वस्ताद आम्हाला पायताण मारीन असे म्हणायचे त्यांच्याकडे वर बघायची आमची हिंमत नसायची.” शाहू खासबाग मैदानात गामा, मारुती माने, गणपत आंदळकर, सादिक, हरिश्चंद्र बिराजदार, सतपात, दादू चौगुले, युवराज पाटील यांच्या कुस्त्या झाल्या, पण प्रत्येकवेळी पंचांचा निर्णय अंतिम ठरला, अशी आठवणही त्यांनी सांगितली. निर्णय पटला नाही तर मैदानात आम्ही लाल रंगाचा रुमाल टाकायचो. त्यावर पंचमंडळी पुन्हा चर्चा करुन निर्णय देत असत. पराभूत मल्लाला निर्णय मान्य झाला नाही तर तो शांतपणे मैदान सोडायचा. पण शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारुन चुकीचा पायंडा पाडला. (Maharashtra kesari)
पंच हा देवासमान असतो. त्यांचे निर्णय पक्षपाती नसतात. हल्ली व्हिडिओसारख्या चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत असेही ते म्हणाले. दीनानाथ सिंह म्हणाले, शिवराज राक्षेने पंचांकडे दाद मागताना मॅटवरच ठिय्या मारला असता तर पंचांना व्हिडिओवर निर्णय घेण्यास भाग पडले असते, पण त्याने पंचांना लाथ मारुन ती चांगली संधी गमावली. (Maharashtra kesari)
पंचांकडे दाद मागायला हवी होती : हिंदकेसरी विनोद चौगले
विनोद चौगले म्हणाले, “डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेनेच नव्हे तर स्पर्धेतील सर्व मल्लांनी कठोर मेहनत घेतली आहे. महाराष्ट्र केसरीची गदा पटकावणे प्रत्येकाचे स्वप्न असते. पंचांनी शिवराजला पराभूत घोषित केल्यावर त्याने पंचांकडे दाद मागायला हवी होती. त्याने पंचांची कॉलर धरुन आणि लाथ मारुन चुकीचे पाऊल उचलले.” पंचांचा निर्णय हा अंतिम असतो. पण एकाद्या मल्लाची अन्याय झाल्याची भावना झाली असेल तर त्याला न्याय देण्यासाठी पंचांनी अत्याधुनिक साधनांचा वापर करुन निर्णय द्यायला पाहिजे, असे मतही विनोद चौगुले यांनी व्यक्त केले. (Maharashtra kesari)
संयमाने दाद मागितली पाहिजे : महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर
पंचानी चुकीचा निर्णय दिला तरी पैलवानांनी अन्याय पचवून न्याय मागितला पाहिजे. पंचावर हात उगारणे ही चुकीची पद्धत आहे, असे मत महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, “डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या शिवराज राक्षेकडून चुकीचे कृत्य झाले आहे. कुस्ती स्पर्धेत पंचांचा निर्णय अमान्य असेल तर दाद मागता येते. तीन पंच आणि मुख्य पंचांकडे दाद मागता येते. व्हिडिओचा वापर करुन पंचांना निर्णयही बदला येतो, पण कालच्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत या गोष्टी घडल्या नाहीत.” काही वेळा पंच जाणूनबुजून पक्षपाती निर्णय घेत असल्याचा संशय मल्ल व्यक्त करतात. पण मल्लांनी संयमाने त्याबाबत दाद मागितली पाहिजे. शिवराज राक्षे मैदानात ठाण मांडून बसला असता तर पंचांकडून फेरविचार झाला असता, पण त्याने मारहाणीचा प्रकार केल्याने त्याचीच बदनामी झाली. पंचांना मारहाणीच्या घटना घडल्या तर भविष्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती बंद पडण्याची भीती जोशीलकर यांनी व्यक्त केली.
संयोजकांनी हस्तक्षेप करायला हवा होता : प्रशिक्षक राम सारंग
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेची पंचांना मारहाण करण्याची कृती आक्षेपार्ह होती. निर्णयाविरोधात दाद मिळवण्यासाठी त्याच्याकडे अनेक मार्ग होते. त्याचा वापर त्याने करायला हवा होता, असे मत राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग यांनी व्यक्त केले. शिवराज आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी मुख्य पंच आणि आखाडा प्रमुखाकडे दाद मागायला हवी होती. व्हिडिओ रिप्लेचा निर्णय पाहून कुस्तीमध्ये निर्णय बदलता येतात. त्याचा अवलंब केला नाही याकडेही सारंग यांनी लक्ष वेधले. कुस्ती वादग्रस्त झाल्यावर स्पर्धेच्या मुख्य संयोजकांनी हस्तक्षेप करुन आक्षेप घेणाऱ्या मल्लाला न्याय देण्याचा प्रयत्न करायला हवा होता. राक्षेने पंचांना मारहाण केली हे चुकीचे होते. असे झाले तर कुस्तीसाठी पंचच मिळणार नाहीत. कुस्ती संपून जाईल. कालच्या घटनेत पंच आणि मल्लांनी दोघांनी सामंजस्यांची भूमिका घेतली असती तर चांगले घडले असते, असेही ते म्हणाले. (Maharashtra kesari)
युवा पैलवान कोणता आदर्श घेणार? : ज्युनिअर दादू चौगुले
शिवराज राक्षेच्या कृतीचे समर्थन करता येणार नाही, असे मत मोतिबाग तालमीचे व्यवस्थापक ज्युनिअर दादू चौगुले यांनी व्यक्त केले. कुस्ती मैदानात पंचांचा निर्णय अंतिम असतो. पंचांचा निर्णय मान्य करायचा असतो. निर्णय अमान्य असेल तर मुख्य पंचाकडे आणि संयोजकांकडे दादही मागता येते. पण असे न करता थेट पंचावर हल्ला करण्याच्या कृतीचे कुणीही समर्थन करणार नाही. शिवराज राक्षेच्या कृतीने कुस्तीमध्ये करिअर करणाऱ्या मल्लासमोर कोणता आदर्श ठेवला जाणार? शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी मल्ल आहे. त्याचे अनेक चाहते आहेत. पंचांचा निर्णय अमान्य झाला तर त्यांना मारहाण करा हा चुकीचा संदेश युवा मल्लांना जाऊ शकतो, याकडेही चौगुले यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा :