Home » Blog » राजकीय व्यवहार विसंगतीवर राज्यशास्त्रीय मंथन व्हावे: डॉ. पी.डी. देवरे

राजकीय व्यवहार विसंगतीवर राज्यशास्त्रीय मंथन व्हावे: डॉ. पी.डी. देवरे

by प्रतिनिधी
0 comments
Lecture by Political Thinker Dr. P. D. Devare

कोल्हापूर : प्रतिनिधी :  राज्यशास्त्रातील सिद्धांत आणि प्रत्यक्ष राजकीय व्यवहार यामध्ये वाढत चाललेली विसंगती समजून घेणे आणि त्यावर नव्या पद्धतीने विचारमंथन करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विचारवंत डॉ. पी. डी. देवरे यांनी आज येथे केले. ‘राज्यशास्त्रातील नवीन प्रवाहांचे चर्चाविश्व’ या विषयावर शिवाजी विद्यापीठात आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये बीजभाषक म्हणून बोलताना देवरे यांनी बदलत्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत विचारप्रवाहांची नवी मांडणी करण्याची गरज अधोरेखित केली.

शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र अधिविभाग, नेहरू अभ्यास केंद्र आणि शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यशास्त्र परिषदेचे ३१ वे अधिवेशन आणि दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्राचार्य व्ही.एम. पाटील उद्घाटन समारंभाचे तर डॉ. भारती पाटील बीजभाषण सत्राच्या अध्यक्षस्थानी होत्या.

प्रत्यक्ष राजकारण आणि समाजव्यवहारात तफावत

डॉ. देवरे म्हणाले, विद्यापीठांमध्ये राज्यशास्त्राचे सिद्धांत, संकल्पना आणि विचारधारा शिकविल्या जातात; मात्र प्रत्यक्ष राजकारण आणि समाजव्यवहार यामध्ये मोठी तफावत दिसून येते. ही तफावत समजून घेऊन विद्यार्थ्यांना आणि समाजाला वास्तव परिस्थिती समजावून सांगणे ही राज्यशास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांची जबाबदारी आहे. विचारसरणींच्या इतिहासात कोणताही विचार कायमस्वरूपी संपत नाही; उलट एका विचारातून दुसरा विचार जन्म घेतो. हेगेलने मांडलेली ‘थिसिस-अँटीथिसिस-सिंथेसिस’ ही प्रक्रिया समाजातील वैचारिक परिवर्तन सातत्याने घडवत राहते, असे त्यांनी नमूद केले. (Lecture by Political Thinker Dr. P. D. Devare)

डॉ. देवरे म्हणाले, व्यवस्था आणि विचार यांच्यातील संघर्षातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर नव्या पद्धतीने विचार करणे ही आजच्या राज्यशास्त्रज्ञांची जबाबदारी असून लोकशाहीची वाटचाल समजून घेताना तिच्यातील विसंगती आणि नव्याने उद्भवणारे प्रश्न यावर बौद्धिक नेतृत्वाने मोकळेपणाने चर्चा करणे आवश्यक आहे. समाजातील वैचारिक वारसा जपून त्याला नव्या संदर्भात पुढे नेण्यासाठी प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी सक्रिय भूमिका घ्यावी, अन्यथा लोकशाहीची वैचारिक पायाभरणी कमकुवत होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या त्रिसूत्रीच्या बळावरच विकास शक्य

उद्घाटनपर मनोगतात बोलताना अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख म्हणाले, विकसित भारताचे स्वप्न घेऊन वाटचाल करीत असताना त्या विकासाला मानवी चेहरा देण्याची आपली जबाबदारी आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या त्रिसूत्रीच्या बळावरच हा विकास शक्य आहे. त्यासाठी राज्यशास्त्रीय आणि अर्थशास्त्रीय धोरणांचा मिलाफ आवश्यक आहे.

डॉ. भारती पाटील म्हणाल्या, राजकारणाचा सार्वत्रिक आणि सर्वस्तरीय ऱ्हास, नैतिक पतन या पार्श्वभूमीवर राज्यशास्त्रीय संकल्पना मुळातून समजून घेणे आणि त्यांचे सातत्याने अधोरेखन करणे आवश्यक आहे. आदर्श राज्यनिर्मितीसाठी अर्थकारण समजून घेतल्याखेरीज राजकारण समजून घेता येणार नाही. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रचंड माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे शिक्षकांनी आता माहिती देणारे न होता विद्यार्थ्यांसोबत संवादात्मक होऊन त्यांचे ज्ञानवर्धन होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. (Lecture by Political Thinker Dr. P. D. Devare)

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. व्ही.एम पाटील म्हणाले, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा राज्यशास्त्रीय विचारप्रणाली आणि प्रवाह यांच्यावर मोठा प्रभाव पडला आहे. त्या प्रभावांचा आणि प्रवाहांचा वेध घेण्याच्या दृष्टीने सदरचे चर्चासत्र उपयुक्त भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र भणगे यांनी लिहीलेल्या ‘भूराजकारण, तंत्रज्ञान आणि भविष्यातील जागतिक व्यवस्था’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

डॉ. भणगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नेहा वाडेकर यांनी परिचय करून दिला. डॉ. दत्ता सावंत यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सुखदेव उंदरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. टी.एम. पाटील, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. श्रीराम पवार, डॉ. शिवाजी पाटील, डॉ. बाळासाहेब भोसले, डॉ. बी.बी. पाटील, सिकंदर जमादार यांच्यासह परिषदेचे सदस्य, राज्यशास्त्राचे अध्यापक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Lecture by Political Thinker Dr. P. D. Devare)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00