Home » Blog » कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनाचे ‘पुढारी’

कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनाचे ‘पुढारी’

कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनाचे 'पुढारी'

by प्रतिनिधी
0 comments
Dr. Pratapsinh Jadhav

– विजय चोरमारे

प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वामुळे पुढारी हे केवळ वृत्तपत्र राहिले नाही, तर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे पुढारपण पुढारीने केले. पत्रकारितेच्या माध्यमातून इथल्या असंख्य प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम त्यांनी पुढारीच्या माध्यमातून केले.  पुढारी माध्यम समूहाचे सर्वेसर्वा पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वावर दृष्टिक्षेप.

दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब जाधव हे मराठी पत्रकारितेतलं अजब रसायन आहे. त्यांचं छापलं जाणारं नाव प्रतापसिंह जाधव असं असलं तरी बाळासाहेब याच आपुलकीच्या आदरार्थी नावानं त्यांना संबोधलं जातं. मराठी माणूस किती उत्तम व्यवसाय करू शकतो आणि व्यवसायाला सामाजिक जाणिवेची जोड देऊ शकतो, याचं उदाहरण म्हणून बाळासाहेबांकडं पाहता येतं. काळाच्या प्रवाहात अनेक जिल्हा वृत्तपत्रं लुप्त झाली, काही केवळ न्यूज प्रिंटपुरती उरली. अशा काळात ‘पुढारी’ नुसता टिकलाच नाही तर अधिक वाढला आणि विस्तारलाही.

बाळासाहेब जाधव आणि पुढारी यांना परस्परांपासून वेगळं करता येत नाही. त्यामुळं त्यांच्याबद्दल लिहिताना आपसुक पुढारीबद्दल लिहावं लागतं आणि पुढारीसंदर्भात लिहिताना कै. ग. गो. जाधव आणि बाळासाहेब जाधव यांच्याबद्दल लिहिणं टाळता येत नाही. सकाळ, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स अशा साखळी वृत्तपत्रांच्या आवृत्त्या कोल्हापुरात सुरू झाल्या, त्यांच्याशी पुढारीने समर्थपणे स्पर्धा केली. अगदी सुरुवातीला १९८० च्या सुमारास ‘सकाळ’ कोल्हापुरात आला तेव्हा त्याला विरोध करण्याचा प्रयत्न ‘पुढारी’कडून झाला. परंतु ही चूक त्यांच्या वेळीच लक्षात आली आणि असा विरोध करण्याऐवजी गुणवत्तेच्या बळावर स्पर्धा करण्याचा निर्धार करून बाळासाहेब पुढं निघाले. आणि तेव्हापासून आजपर्यंत गुणवत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत कोणत्याही स्पर्धक वृत्तपत्राच्या तुलनेत पुढारीला एक पाऊल पुढं ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अगदी अलीकडचं उदाहरण आहे. कोल्हापुरात महाराष्ट्र टाइम्सची आवृत्ती सुरू व्हायची होती. त्या आवृत्तीचा संपादक म्हणून प्रकाशन समारंभाची निमंत्रण पत्रिका द्यायला त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी उत्तम आदरातिथ्य केलं. निवांत गप्पा मारल्या. बोलता बोलता महाराष्ट्र टाइम्सचं स्वरूप कसं असेल याची माहिती घेतली. दोन दिवसांनी अंक सुरू होणार होता, त्यामुळं गुप्तता पाळण्याजोगं काही नव्हतं. त्यामुळं सगळं सांगून  टाकलं. त्यातल्या एका गोष्टीची त्यांनी नोंद घेतली, ती म्हणजे महाराष्ट्र टाइम्सची सर्व पाने रंगीत असतील. नंतर कळालेली माहिती अशी की, आम्ही तिथून बाहेर पडल्या पडल्या बाळासाहेब कामाला लागले. आणि महाराष्ट्र टाइम्स सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत पुढारीचीही सर्व पाने रंगीत झाली. एखाद्या वृत्तपत्राच्या मालकानं किती अद्ययावत राहावं, याचे उदाहरण म्हणून मी याकडं पाहतो.

सकाळी सहा वाजल्यापासून रात्री आवृत्ती छापायला जाईपर्यंत एखादा मालक कामात (बातम्या, जाहिराती, वितरण) लक्ष घालतो तेव्हा कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास वाटणे स्वाभाविक आहे, परंतु पुढारी आजही मजबूतपणे उभा आहे ते केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या या अव्याहत सक्रियतेमुळे. कोल्हापुरात आलेल्या प्रत्येक नव्या वृत्तपत्राशी पुढारीला स्पर्धा करावी लागली. अनेकदा ही स्पर्धा टोकाला गेली. वैशिष्ट्य म्हणजे व्यावसायिक पातळीवर तीव्र स्पर्धा करतानाही बाळासाहेबांनी आणि अलीकडे योगेश जाधव यांनीही सर्व वृत्तपत्रांच्या मालकांशी, संपादकांशी सौहार्दाचे आणि मैत्रीपूर्ण संबंध टिकवून ठेवले. व्यावसायिक स्पर्धेचे सावट व्यक्तिगत संबंधांवर पडू दिले नाही. पुढारीतील कर्मचारी बाळासाहेबांच्या कडक स्वभावाच्या दंतकथा बाहेर सांगत असले तरी, प्रत्यक्ष भेटीत बाळासाहेबांच्या आतिथ्यशीलतेचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.

बाळासाहेबांच्या नेतृत्वामुळे पुढारी हे केवळ वृत्तपत्र राहिले नाही, तर कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनाचे पुढारपण पुढारीने केले. अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले. कै. ग. गो. जाधव यांच्याकडून सत्यशोधकी विचारांचा वारसा ‘पुढारी’ला लाभला आहे. सत्तेच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नात तो सांधा निखळतो की काय अशी भीती वाटण्याजोगी परिस्थिती काहीवेळा निर्माण झाली. परंतु सत्तेच्या कितीही जवळ गेले तरी बाळासाहेबांनी आपली विरोधाची धार कधी बोथट होऊ दिली नाही. लोकहितापासून फारकत घेतली नाही.

पत्रकारितेच्या क्षेत्रातील साडेआठ दशकांची परंपरा असलेल्या पुढारी समूहाने वर्षभरापूर्वी इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये पाऊल टाकले आणि माध्यमांच्या सर्व क्षेत्रांत असणारा पुढारी हा एकमेव मराठी वृत्तसमूह बनला. कोल्हापूरमधून पुढारीची सुरुवात झाली. कैवारी, सेवकच्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर पुढारीचे संस्थापक-संपादक पद्मश्री ग. गो. जाधव यांनी १९३७ साली पुढारी साप्ताहिक सुरू केले आणि एक जानेवारी १९३९ रोजी त्याचे दैनिकात रुपांतर झाले. भास्करराव जाधव, प्रबोधनकार ठाकरे, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर आदींच्या सत्यशोधकी सहवासात त्यांची जडणघडण झाली आणि त्यातूनच त्यांनी पत्रकारितेचे असीधारा व्रत स्वीकारले. मराठी पत्रकारितेचे प्रांगण पुढारीच्या तेजस्वी पत्रकारितेने समृद्ध केले. कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर, कोकण, मुंबई, मराठवाडा, गोवा, उत्तर कर्नाटक अशा विविध भागांमध्ये पुढारीचा विस्तार झाला. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात तर वृत्तपत्र म्हणजे `पुढारी` असे मानण्याइतपत `पुढारी`चा जनमाणसावर पगडा राहिला.  माध्यम क्षेत्रातील ज्या प्रांतात `पुढारी`ने पाऊल टाकले तेथील पुढारीपण आपसूकच स्वतःकडे घेतले. बड्या साखळी वृत्तपत्रसमूहांचे आव्हान परतवून आपले अग्रस्थान टिकवले. 

पत्रकारितेला दिलेली सामाजिक बांधिलकीची जोड हे पुढारीचे वैशिष्ट्य आहे. बाळासाहेबांची सामाजिक दृष्टी त्यातून दिसून येते. अनेक राष्ट्रीय आपत्तींमध्ये पुढारीने केलेली मदत आणि सियाचीनसारख्या ठिकाणी सैनिकांसाठी उभारलेले हॉस्पिटल ही त्याची उदाहरणे आहेत. निराशेच्या अंधःकारात कुढत बसण्यापेक्षा झगमगत्या चांदण्यात न्हाऊन निघण्यात खरा आनंद असतो. अंधःकारात अडकलेल्या माणसांना प्रकाशाच्या दिशेने घेऊन जाण्याचे बाळासाहेबांचे सतत प्रयत्न असतात. वय वाढले तरी मनाचे तारुण्य त्यांनी टिकवून ठेवले आहे. त्याचमुळे टॉमॅटो एफएम किंवा पुढारी न्यूज वृत्तवाहिनी अशा नव्या माध्यमांची आव्हाने स्वीकारून त्यांनी अधिक व्यापक बनण्याचा प्रयत्न केला. काळासोबत राहिलो तरच निभाव लागेल, या भूमिकेतून त्यांनी सतत अद्ययावत राहण्याचा प्रयत्न केला. पुढारी समूहाचा एवढा मोठा डोलारा सांभाळताना दिवसभरातल्या सगळ्या घडामोडींवर त्यांचे लक्ष असते आणि दुस-या दिवसाच्या वृत्तपत्राचे पहिले पानही त्यांच्या मनात आकार घेत असते. 

प्रसारमाध्यमांनी सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडून ते प्रश्न राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवावेत आणि त्यासंदर्भात दबाव वाढवून त्यांची सोडवणूक करून घ्यावी, अशी त्यांची पत्रकारितेसंदर्भातील धारणा आहे. कोल्हापूरचे अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुद्रितमाध्यमांची परंपरा मोठी असली तरी इलेक्ट्रॉनिक माध्यमे तरुण आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा दर्शकही तुलनेने तरुण आहे. या तरुणांच्या आकांक्षांना पंख देण्याचे काम या नव्या माध्यमातून करण्याच्या उद्देशाने त्यांनी वृत्तवाहिनीच्या क्षेत्रात पाऊल टाकले.

कोल्हापूर आणि परिसरच नव्हे, तर महाराष्ट्रभरातील पत्रकारांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या आहेत. पुढारीच्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्याला आकार दिला, आधार दिला, गती दिली. महाराष्ट्रातील चांगल्या पत्रकारांना पुढारीशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला. ग. गो. जाधव व्याख्यानमालेच्या निमित्ताने देशभरातील नामांकित पत्रकारांना कोल्हापुरात आणून वैचारिक मेजवानी दिली. शिवाजी विद्यापीठात ग. गो. जाधव अध्यासन सुरू करून काळाचे आव्हान पेलणारी पत्रकारांची नवी पिढी घडवण्याबरोबरच पत्रकारितेतील संशोधनाला चालना देण्याचा प्रयत्न केला. 

बाळासाहेबांचा वाढदिवस हा केवळ पुढारी परिवारापुरता नव्हे, तर कोल्हापूरची पत्रसृष्टी आणि एकूण कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनातला महत्त्वाचा समारंभ असतो. वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांना मनःपूर्वक शुभेच्छा ! त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो आणि भविष्यातही त्यांच्याकडून लोकसेवा घडो ही सदिच्छा !!

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00