स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते सादर केल्यानंतर तो वादात सापडला आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून शिवेसनेच्या नेत्यांकडून कामरा याला अटक करण्याची मागणी केली जात आहे. यादरम्यान कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीनाचा अर्ज मंजूर केला. कामरा याला ७ एप्रिलपर्यंत दिलासा मिळाला आहे. कारण त्याच्या वकिलांनी महाराष्ट्रातील न्यायालयांमध्ये जाण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे केली होती. कुणाल कामरा याला त्याने त्याच्या शो दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर मुंबई पोलिसांनी दोन समन्स बजावले होते. (Kunal Kamra Controversy)
बदनामी झाली ती विडंबनावरील प्रतिक्रियेमुळे
एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की, कुणाल कामराच्या गाण्यामुळे झाली नसेल तेवढी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अप्रतिष्ठा त्यावर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे झाली आहे. एकट्या शिंदे यांची अप्रतिष्ठा झालेली नाही. महाराष्ट्र सरकारची अप्रतिष्ठा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अप्रतिष्ठा झाली. शिवसेनेची अप्रतिष्ठा झाली. आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार गालातल्या गालात हसत सगळी मजा घेत आहेत. कारण विरोधात असताना त्यांनीच शिंदे यांच्यासाठी गद्दार, खोकेवाले असे शब्द वापरले होते. कुणाल कामरा म्हणतो मी त्याचाच आधार घेतला. अजितदादा म्हणतात, मी त्यावेळी विरोधात होतो त्यामुळे तेव्हा बरोबर होतो. आता नाही. दादांचा हा विनोद ऐकून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही हसू आवरत नाही. पण त्यांना हसता येत नाही. (Kunal Kamra Controversy)
पंतप्रधानांसह अनेकांवर टीका
कुणाल कामरानं एकट्या शिंदेंवरच टीका केली आहे का, तर नाही. सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान, मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अशा सगळ्यांना आपल्या पट्ट्यात घेतलं आहे. राजकीय विनोद करणा-या विनोदवीरांना ते करावंच लागतं. जे सत्तेत असतात तेच त्यांचं टार्गेट असतं. टार्गेट केलेल्यांपैकी एकट्या एकनाथ शिंदे यांच्याकडूनच प्रतिक्रिया दिली, हे इथं नोंद घ्यायला पाहिजे. (Kunal Kamra Controversy)
मुख्यमंत्र्यांची दुटप्पी भूमिका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा प्रत्येक महत्त्वाच्या आपल्या मर्यादा दाखवून देतात. शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याबद्दल गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री काही बोलत नाहीत. उलट कुणाल कामरालाच खडे बोल सुनावतात. आघाडीतल्या सहकारी पक्षाचे नेते म्हणून त्यांची भूमिका योग्य असेल. पण मुख्यमंत्री म्हणून योग्य ठरत नाही. पुन्हा त्यांच्या आधीच्या भूमिकांमधला विरोधाभासही समोर येतो. कंगना राणावतच्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे फडणवीस, शिंदे यांच्यावेळी नेमकी उलटी भूमिका घेतात. (Kunal Kamra Controversy)
कुणाल कामराला फोन करून धमकी देणारे शिवसेनेचे आक्रमक कार्यकर्ते स्वतःचे हसे करून घेतात.
हे सगळं कमी होतं म्हणून की काय, मंत्री शंभूराज देसाई नव्यानं मैदानात उतरले. त्यांनी पोलिसांना आदेशच दिलाय. कुणाल कामराला अटक करून टायरमध्ये घालून थर्ड डिग्री द्या.
अर्थात निष्ठा दाखवण्याची संधी मिळालेला प्रत्येकजण संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करतोय. लोकभावना काय आहे, याची कुणालाच खबर नाही. आपल्याला सगळा महाराष्ट्र हसतोय हेही यांच्या गावी नाही.
नेहरूंचा व्यंगचित्रकाराला फोन
एकनाथ शिंदे यांना राग येणे समजू शकतो. शिंदेच काय असा विनोद ठाकरेंवर झाला असता तरी वेगळी प्रतिक्रिया उमटली नसती. स्वतःवरचा विनोद सहन करायला फार मोठं मन लागतं. शंकर नावाच्या व्यंगचित्रकारानं पंडित नेहरूंना गाढवाची उपमा दिली होती. आता जर एखाद्या नेत्याला गाढवाची उपमा दिली तर त्याचे बगलबच्चे संबंधित व्यंगचित्रकाराची गाढवावरून धिंड काढतील. पण नेहरूंनी दुस-या दिवशी शंकर यांना फोन केला आणि विचारलं, तुम्हाला एका गाढवासोबत चहा घ्यायला आवडेल का? (Kunal Kamra Controversy)
एकनाथ शिंदे यांनी कुणाल कामराला फोन करून, तुम्हाला एका रिक्षावाल्यासोबत चहा घ्यायला आवडेल का, असं विचारलं असतं तर कुणाल कामरानंही त्यांच्यापुढं शरणागती पत्करली असती.
परंतु शिंदेंकडून अशी अपेक्षा अवाजवी ठरते. गद्दार हा शब्द त्यांच्या जिव्हारी लागतो. आतापर्यंत अनेकदा ते दिसून आले आहे. कुणाल कामरानेही विडंबन गीतात तो वापरला. खरेतर शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली नसती, तर चोवीस तासात या गाण्यानं उडालेला धुरळा खाली बसला असता.
अटकपूर्व जामिनामुळे दिलासा
कुणाल कामरानं अटकपूर्व जामिनासाठी मद्रास उच्च न्यायालयात केलेला अर्ज न्यायमूर्ती सुंदर मोहन यांच्या खंडपीठाने मंजूर केला. अर्ज मंजूर करताना त्यांनी म्हटले आहे की, कुणाल कामरा यांनी प्राथमिकदृष्ट्या मद्रास उच्च न्यायालयाला खात्री पटवून दिली की तो संरक्षणासाठी महाराष्ट्रातील न्यायालयांमध्ये जाऊ शकत नाहीत. या प्रकरणात कोठडीत चौकशी करण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातील मंत्री आणि पक्षाचे कार्यकर्ते धमक्या देत असल्याने कामरा जामीनासाठी येथील न्यायालयांमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील न्यायालयांमध्ये अंतरिम अटकपूर्व जामीन नंतर मागितला जाईल.
या सुनावणीवेळी कामराच्या वकिलांने उच्च न्यायालयाला सांगितले की, त्याला (कुणाल कामरा) ५०० हून अधिक धमक्यांचे फोन आले आहेत. “ते म्हणतात की ते ‘शिवसेना स्टाईलने त्याला धडा शिकवतील’. ‘शिवसेना स्टाईल’ म्हणजे काय हे सर्वांना माहिती आहे… हॉटेलमध्ये तोडफोड करणाऱ्यांवर कोणतीही गंभीर कारवाई झाली नाही. आपण नेहमीच सांगत आलो आहे की माझा संविधानावर विश्वास आहे,” असे कामराच्या वकिलांनी कोर्टात सांगितले. (Kunal Kamra Controversy)
एकूण कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. शिवसेनेला कायदेशीर लढाईत रस नसावा. कुणाल कामराला पोलिसांकरवी ठाण्यात बोलवायचं आणि त्याचवेळी शिवसैनिकांनी त्यांना काळं वगैरे फासायचं. म्हणजे शिवसेना स्टाईल. एवढाच त्यांचा उद्देश असावा. पोलिस त्यांचेच असल्यामुळे ते सक्रीय सहकार्य करतीलही. परंतु तूर्तास हा ड्रामा होऊ शकणार नाही. कारण सात एप्रिलपर्यंत कुणाल कामराला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
..