मुंबई : विशेष प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात विडंबनात्मक गाणे सादर केल्याप्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात कॉमेडियन कुणाल कामरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरोपपत्र दाखल करेपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. आवश्यकता वाटल्यास चेन्नईमध्ये जाऊन त्यांचा जवाब नोंदवावा, असे निर्देश मुंबई पोलिसांना शुक्रवारी (२५ एप्रिल) दिले. परंतु याप्रकरणी त्याच्याविरूध्दचा गुन्हा कायम ठेवला असून, त्याचा तपास सुरू राहणार आहे. (Kamra case hearing)
याचिकेदरम्यान आरोपपत्र दाखल केले गेले, तर संबंधित न्यायालय (ट्रायल कोर्ट) या याचिकेदरम्यान कामराविरुद्ध कारवाई करणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
मुंबई उच्च न्यायालयाने १६ एप्रिल रोजी कामरांना निकाल येईपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने अटकेपासून १७ एप्रिलपर्यंत अंतरिम संरक्षण दिले होते. कामरांनी याचिकेत म्हटले होते की ते तमिळनाडूचा रहिवासी आहेत आणि शोनंतर त्यांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने ते महाराष्ट्रात येण्यास घाबरत आहेत. त्यावरून न्यायालयाने मुंबई पोलिसांना चेन्नईला जाऊन त्याची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. (Kamra case hearing)
मुंबईतील एका शोदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ म्हटल्याने कामरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले. ज्या ठिकाणी हा शो झाला होता, तिथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोडही केली होती. या शोदरम्यान कामरांनी ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील एका गाण्याची नक्कल करून त्यात शिंदेंना ‘गद्दार’ म्हटले होते. (Kamra case hearing)
“याप्रकरणी पोलिसांनी जी कलमे लावली आहेत, ती कायदाबाह्य आहेत. तक्रारदार मुरजी पटेल हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे हे प्रकरण ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’मध्ये मोडते. कुणाल कामरांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या विरोधात वक्तव्य केल्याचा पटेल यांचा आरोप हास्यास्पद आहे. शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून बाहेर पडली, असा त्याच्या गाण्यात उल्लेख होता. या प्रकरणात ज्यांची बदनामी झाल्याचा आरोप आहे, त्यांनी तक्रार केली नाही आणि ज्यांनी तक्रार केली आहे, त्यांची बदनामी झाल्याचे म्हटले नाही. त्यामुळे अशा प्रकारे गुन्हा दाखल करणे हा सत्तेचा गैरवापर आहे. अशा प्रकारचा गुन्हा दाखल करताना कोणताही तपास करण्यात आला नाही. या प्रकरणात प्राथमिक चौकशी देखील करण्यात आली नाही”, असा युक्तिवाद कामराच्या वकिलांनी केला होता.
हेही वाचा :
मोसादचा ‘तो’ अहवाल अन् रशियन प्रोपगंडा!
सावरकरांबद्दल अवमानास्पद टिप्पणी कराल तर…