कोल्हापूर : प्रतिनिधी : तब्बल चाळीस वर्षाच्या लढ्यानंतर मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच १८ ऑगस्टपासून कोल्हापुरात सुरू होणार आहे. भावसिंगजी रोडवरील जुन्या न्यायालयाच्या आवारातील राधाबाई बिल्डिंगमध्ये सर्किट बेंच सुरू होणार असून तेथील नुतनीकरण कामाची खासदार शाहू छत्रपती यांनी आज शनिवारी पाहणी केली. (Kolhapur Circuit Bench Building)
कोल्हापूर जिल्ह्याला न्यायालयीन कामाचा गौरवशाली इतिहास लाभला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात अनेक नवीन न्यायालये आणि उपन्यायालय स्थापन केली. कोल्हापूर संस्थानात न्यायालयीन सुधारणा लागू करत सामाजिक न्यायावर जोर दिला आणि कोणत्याही जाती-धर्मातील व्यक्तीला कोणताही भेदभाव न करता न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले. न्यायमूर्ती गोविंद रानडे हे कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचे पहिले न्यायाधीश होते. स्वातंत्र्यानंतर जिल्हा न्यायालय आणि कोल्हापूरच्या उच्च न्यायालय इमारतीत जिल्हा कोर्ट सुरू झाले. कसबा बावडा येथे नव्याने जिल्हा न्याय संकुल बांधल्यानंतर जुन्या न्यायालय इमारतीत कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज सुरू होते. (Kolhapur Circuit Bench Building)
मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचसाठी हेरिटेज इमारतीची आवश्यकता असल्याने जुन्या जिल्ह्या न्यायालयातील राधाबाई बिल्डिंगमध्ये सर्किट बेंच सुरू होणार आहे. त्यासाठी नुतीनकरण काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज खासदार शाहू छत्रपती यांनी नुतनीकरण कामाची पाहणी केली. त्यांच्यासोबत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अड व्ही.आर. पाटील, सचिव मनोज पाटील, ज्येष्ट वकील महादेवराव आडगुळे, शिवाजीराव राणे, अजित मोहिते, प्रशांत शिंदे, आर.एल. चव्हाण, इंद्रजीत चव्हाण, अर्चना कुलकर्णी ही वकील मंडळी उपस्थित होती. (Kolhapur Circuit Bench Building)