कोल्हापूर : प्रतिनिधी : अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळाने दिलबहार तालीम मंडळावर १-० अशा गोलफरकाने विजय मिळवला. झुंजार क्लबने बीजीएम स्पोर्टस् ला ३-० अशा फरकाने हरवले. कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन आयोजित केएसए अ गट वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धा शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. (Khandoba Talim)
खंडोबा तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यातील सामना चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी पूर्वार्धात गोल नोंदवण्याचे जोरदार प्रयत्न केले. पण गोलची कोंडी फुटू शकली नाही. त्यामुळे मध्यंतरास गोलफलक कोरा होता.
उत्तरार्धात आघाडी मिळवण्यासाठी दोन्ही संघांनी वेगवान चढाया केल्या. ६६ व्या मिनिटाला गोलची कोंडी फोडण्यात खंडोबा संघाला यश मिळाले. रोहन आडनाईकच्या पासवर पृथ्वीराज साळोखेने मैदानी गोल करत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. बरोबरी साधण्यासाठी दिलबहारने चढायाचा वेग वाढवला. पण खंडोबा संघाने भक्कम बचाव ठेवत दिलबहार संघास बरोबरी साधून दिली नाही. एक गोलची आघाडी कायम टिकवत खंडोबाने सामना जिंकून तीन गुणांची कमाई केली. (Khandoba Talim)
दुपारच्या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात झुंजार क्लबने बीजीएम स्पोर्टस् चा ३-० असा पराभव केला. ३५ व्या मिनिटाला झुंजारच्या शाहू भोईटेने गोल केला. हीच आघाडी मध्यंतरापर्यंत टिकली. उत्तरार्धात ६० व्या मिनिटाला स्वप्निल तेलवेकरने तर ७७ व्या मिनिटाला श्रवण शिंदेने गोल केले. तीन गोलची भक्कम आघाडी कायम ठेवत झुंजार क्लबने सामना जिंकला. (Khandoba Talim)
- शुक्रवारचे सामने
- उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ वि. वर्षा विश्वास तरुण मंडळ : दुपारी २.०० वा.
- बालगोपाल तालीम मंडळ वि. संध्यामठ तरुण मंडळ : दुपारी ४.०० वा.
हेही वाचा :
सितांशू कोटक भारताचे नवे फलंदाजी प्रशिक्षक