कोल्हापूर : प्रतिनिधी : संयुक्त जुना बुधवार पेठेने पहिलेवहिले विजेतेपद पटकावले. त्यांनी खंडोबा तालीम मंडळला ३-१ अशा गोलफरकाने पराभूत करून अटल चषक पटकाविला. वेगवान खेळ करणाऱ्या जुना बुधवारने पूर्वार्धातच २३ मिनिटातच ३-० गोलची आघाडी घेतली होती. उत्तरार्धात खंडोबाने एक गोल केला होता. ‘खंडोबा’ला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या जुना बुधवार पेठला १ लाख रुपये व चषक तर उपविजेत्या खंडोबाला ७५ हजार रुपये व चषक बक्षीस देण्यात आले. (Juna Budhvar win title)
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ भाजप आणि तटाकडील तालीम मंडळ आयोजित ‘अटल चषक – २०२५’ फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना छत्रपती शाहू स्टेडियमवर झाला. सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होती. चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेतील खंडोबा आणि जुना बुधवार हेच दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने आल्याने विजेतेपद कोण पटकावणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. सामना सुरू होताच जुना बुधवारने चढाईचे आक्रमक धोरण अवलंबले. याचा फायदा उठवत त्यांनी आठव्या मिनिटाला पहिला गोल फलकावर झळकवला. डी मध्ये उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत. रविराज भोसलेने गोल केला. या गोलनंतर सनवीर सिंगने १७ व्या मिनिटास गोल नोंदवून जुना बुधवार संघाला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. २३व्या मिनिटाला झालेल्या चढाईत खंडोबाच्या गोलक्षेत्रात मिळालेल्या संधीचा फायदा रिंकू सेठने उठवत हेडव्दारा गोल नोंदवून आघाडी ३-० अशी वाढवली. तीन गोलने पिछाडीवर राहिलेल्या खंडोबाने सावध पवित्रा घेत चढाया केल्या. त्यामध्ये अवधूत पाटोळेने सलग दोन गोलच्या संधी वाया घालवल्या. कुणाल दळवीने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टला धडकल्याने गोलची संधी हुकली. एकापाठोपाठ एक संधी वाया जात असताना जादा वेळेत खंडोबाच्या रोहन आडनाईकने संघाला यश मिळवून दिले. हेडव्दारे गोल नोंदवून रोहनने आघाडी कमी केली. (Juna Budhvar win title)

पूर्वार्धात ३-१ ची भक्कम आघाडी घेतलेल्या जुना बुधवारने उत्तरार्धात बचावत्मक खेळावर भर दिला. त्याचा फायदा घेत खंडोबाने खोलवर चाली रचल्या. पृथ्वीराज साळोखे, संकेत मेढे, अथर्व पाटील, अमीन खझीर, कुणाल दळवी यांनी गोलक्षेत्रापर्यंत चढाया केल्या पण त्यांना गोलमध्ये रुपांतर करण्यात यश आले नाही. त्यांच्या संकेत वेसनेकरने गोलक्षेत्रातून सलग दोन संधी दवडल्या. रोहन आडनाईकने मारलेल्या फ्रीकिकवर गोलरक्षक शुभम घराळेने तितक्याच तत्परतेने चेंडू परतावून लावत गोलचे संकट टाळले. जुना बुधवारच्या रिंकू सेठ, रविराज भोसले, विष्णू मणिकंदम, सनवीर सिंग यांनी केलेल्या चढायांना यश आले नाही. दरम्यान, नियमबाह्य खेळाबद्दल संकेत जरगला दोनदा यलो कार्ड मिळाल्याने मुख्यपंचानी रेडकार्ड दाखवले. अखेर उर्वरित वेळेत ३-१गोलची आघाडी राखून जुना बुधवारने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. यंदाच्या हंगामात त्यांनी पहिलेच विजेतेपद पटकावले. (Juna Budhvar win title)

बक्षीस वितरण राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर , खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, राहुल चिकोडे, गणेश देसाई, अशोक देसाई, राजेंद्र जाधव, विश्वजीत साळोखे उपस्थित होते. दरम्यान, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहूमान जुना बुधवारच्या हर्षा जरग याला मिळाला. तसेच बेस्ट गोलकीपर – आकाश मेस्त्री, बेस्ट फॉरवर्ड – अमीन खझीर, बेस्ट हाफ – पृथ्वीराज साळोखे (सर्व खंडोबा तालीम), बेस्ट डिफेन्स – साहिल खोत (जुना बुधवार) यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. (Juna Budhvar win title)
हेही वाचा :