बेळगाव : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठाच्या काडसिद्धेश्वर स्वामीनी कर्नाटकातील लिंगायत मठाधिशांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यावर बंदी घालावी अशी मागणी करत लिंगायत समाजाने केली आहे. लिंगायत समाजाने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. (Kadsiddheshwar)
कर्नाटक सरकारने नुकतेच बसव संस्कृती अभियान एक सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केले होते. यामध्ये कर्नाटकातील बहुतांश मठाचे मठाधीश सहभागी झाले होते. प्रत्येक जिल्ह्यात झालेल्या या अभियानात लिंगायत संघटना देखील यात सहभागी झाल्या होत्या.या अभियानात सहभागी झालेल्या मठाधिशांच्या बद्दल कणेरी मठाच्या स्वामीनी अवमानकारक वक्तव्य केले आहे. (Kadsiddheshwar)
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची मर्जी सांभाळण्यासाठी मठाधिशानी सगळे नाटक केले अशा शब्दात टीका केली आहे. कणेरी मठाच्या स्वामीनी केलेल्या टिप्पणीमुळे कर्नाटकातील समस्त लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना बेळगाव जिल्हा प्रवेशबंदी करावी अशी मागणी बेळगावच्या लिंगायत समाजाने जिल्हाधिकाऱ्यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. (Kadsiddheshwar)