मुंबई : पुढील महिन्यात रंगणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी शनिवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. चॅम्पियन ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरुद्ध खेळण्यात येणाऱ्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेसाठीही हाच संघ कायम राहणार आहे. वेगवान गोलंदाज महंमद सिराजला या संघातून वगळण्यात आले असून यशस्वी जैस्वालला प्रथमच वन-डे संघात जागा मिळाली आहे. (Indian Team)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी संघ जाहीर केला. यावेळी कर्णधार रोहित शर्माही उपस्थित होता. पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असणारा जसप्रीत बुमराह, तसेच दुखापतीतून सावरत असलेला फिरकीपटू कुलदीप यादव यांनाही संघात स्थान मिळाले आहे. ६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी बुमराह उपलब्ध नसेल. चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्यास त्याचा बदली खेळाडू म्हणून हर्षित राणाची निवड करण्यात आली आहे. (Indian Team)
या संघाचे उपकर्णधारपद शुभमन गिलला देण्यात आले आहे. रोहित आणि शुभमनबरोबरच तिसरा सलामीवीर म्हणून यशस्वीची निवड करण्यात आली. हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा हे अष्टपैलू खेळाडू संघात आहेत. यष्टिरक्षक म्हणून लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांना निवडण्यात आले आहे. कुलदीप आणि वॉशिंग्टन सुंदर हे संघातील फिरकीपटू असतील, तर बुमराह, महंमद शमी आणि अर्शदीप सिंग यांच्यावर वेगवान गोलंदाजीची मदार आहे. विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रभावी कामगिरी केल्यामुळे अर्शदीपला संघात स्थान देण्यात आले असून सिराजला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. (Indian Team)
सिराजप्रमाणेच टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवलाही वन-डे संघातील स्थान गमवावे लागले आहे. हा तात्पुरता संघ असून अंतिम संघ ११ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे सुपूर्द करण्यात येईल. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेस १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील भारताचा सलामीचा सामना २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध दुबई येथे होणार आहे. (Indian Team)
- भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, महंमद शमी आणि अर्शदीप सिंग.
India’s squad for the #ChampionsTrophy 2025 announced!
![]()
Drop in a message in the comments below
to cheer for #TeamIndia pic.twitter.com/eFyXkKSmcO
— BCCI (@BCCI) January 18, 2025
हेही वाचा :
…अन्यथा खेळाडूंना ‘आयपीएल’बंदी
विमेन्स प्रीमियर लीग १४ फेब्रुवारीपासून