मेलबर्न : ‘बॉक्सिंग डे’ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी नितीश कुमारने वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने भारताचा डाव सावरतानाच काही विक्रमांनाही गवसणी घातली. त्याने व भारताने नोंदवलेल्या काही विक्रम-पराक्रमांवर टाकलेली ही नजर. India Records
१०५ : नितीशकुमार रेड्डीने केलेली नाबाद १०५ धावांची खेळी ही मेलबर्नमध्ये ८ ते ११ क्रमांकावरील फलंदाजाने केलेली सर्वोच्च खेळी ठरली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या रेगी डफ यांचा तब्बल १२२ वर्षे जुना विक्रम मोडला. डफ यांनी १९०२ मध्ये दहाव्या क्रमांकावर फलंदाजीस येत १०४ धावा केल्या होत्या.
५ : ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकावणारा रेड्डी हा परदेशी संघातील ८ ते ११ क्रमांकावरील पाचवा फलंदाज ठरला. त्याचप्रमाणे या क्रमांकावरील भारतीय खेळाडूची ही ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च खेळीही ठरली. यापूर्वी, अनिल कुंबळेने २००८ मध्ये ॲडलेड कसोटीत केलेल्या ८७ धावा ही भारतातर्फे ८-११ स्थानावरील सर्वोच्च खेळी होती.
२ : ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावणारा नितीश हा ८ ते ११ क्रमांकावरील दुसरा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी, भारताच्या वृद्धिमान साहाने २०१७ मध्ये रांची कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११७ धावांची खेळी केली होती.
२ : नितीश-वॉशिंग्टन यांनी आठव्या विकेटसाठी केलेली १२७ धावांची भागीदारी रचली. ही भारतातर्फे ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील ८ ते ११ व्या विकेटसाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी आहे. २००८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामधील सिडनी कसोटीत सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंग यांनी ८ व्या विकेटसाठी केलेली १२९ धावांची भागीदारी ही या यादीत सर्वोच्च स्थानी आहे.
२१ वर्षे २१४ दिवस : मेलबर्न कसोटीच्या सुरुवातीस नितीश कुमार रेड्डीचे वय. ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकावणारा तो भारताचा तिसरा सर्वांत तरुण खेळाडू ठरला. यापूर्वी, सचिन (१८ वर्षे २५३ दिवस) आणि रिषभ पंत (२१ वर्षे ९१ दिवस) या खेळाडूंनी नितीशपेक्षा कमी वयामध्ये ऑस्ट्रेलियात शतक झळकावले आहे.
२ : कसोटी कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) साजरे करणारा नितीश हा भारताचा दुसरा फलंदाज ठरला. याआधी भारताच्या विनू मांकड यांनी १९४८ मध्ये एमसीजीवर कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते.
८ : नितीशने या मालिकेत आतापर्यंत ८ षटकार लगावले आहेत. यासह ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या परदेशी खेळाडूंमध्ये नितीश संयुक्तरीत्या अग्रस्थानी आहे. इंग्लंडच्या मायकेल वॉघनने २००२-०३ मध्ये, तर वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने २००९ मध्ये ऑस्ट्रेलियातील मालिकेत प्रत्येकी ८ षटकार मारले होते. या कसोटीतील एक डाव आणि मालिकेतील एक कसोटी अद्याप बाकी असल्याने नितीशकडे हा विक्रम मोडण्याची संधी आहे.
After his maiden Test century, Nitish Kumar Reddy is averaging a remarkable 71 in the ongoing Border Gavaskar Trophy series #AUSvINDhttps://t.co/CegoC3aX4f
— cricket.com.au (@cricketcomau) December 28, 2024
हेही वाचा :
भारताचा एकतर्फी मालिका विजय
पुन्हा चढला विराटचा पारा