दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेतील सर्वांत बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना रविवारी, २३ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे. या सामन्यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आजवर या दोन संघांमध्ये रंगलेल्या सामन्यांचा हा धांडोळा.(India-Pak)
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान संघ पाचवेळा आमनेसामने आले असून यांपैकी तीन सामने पाकने, दोन सामने भारताने जिंकले आहेत. ही स्पर्धा १९९८ पासून ‘आयसीसी नॉकआउट’ या नावाने सुरू झाली असली, तरी पहिल्या तीन स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने आलेच नाहीत. २००४ मध्ये पहिल्यांदा या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना रंगला. तेव्हापासूनच्या पाच स्पर्धांमध्ये २००६ चा अपवाद वगळल्यास प्रत्येकवेळी भारत-पाक सामना रंगला आहे. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या संघांमध्ये साखळी फेरी आणि अंतिम फेरी असे दोन सामने रंगले. अंतिम सामन्यात पाकने भारताला पराभूत करून पहिलेवहिले चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद पटकावले होते.(India-Pak)
२००४, स्थळ – बर्मिंगहॅम, विजयी संघ – पाकिस्तान
या साखळी सामन्यात पाकिस्तानने भारतावर ३ विकेट आणि ४ चेंडू राखून मात केली. प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव २०० धावांवर आटोपला होता. भारताकडून राहुल द्रविडने सर्वाधिक ६७ धावा केल्या, तर पाकतर्फे शोएब अख्तरने ४ विकेट घेतल्या. भारताचे लक्ष्य पाकने ४९.२ षटकांत ७ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण करून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. महंमद युसूफने पाककडून नाबाद ८१ धावा केल्या.

२००९, स्थळ – सेंच्युरियन, विजयी संघ – पाकिस्तान
हा साखळी सामना पाकिस्तानने ५४ धावांनी जिंकला होता. शोएब मलिकचे शतक आणि महंमद युसूफच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद ३०२ धावांपर्यंत मजल मारली. शोएबने १२८ धावा, तर युसूफने ८७ धावा फटकावल्या. पाकच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव ४४.५ षटकांत २४८ धावांत संपुष्टात आला. भारताकडून राहुल द्रविडने ७६ आणि गौतम गंभीरने ५७ धावा करत कडवी झुंज दिली. मात्र, त्यांना अन्य फलंदाजांची साथ लाभली नाही.(India-Pak)
२०१३, स्थळ – बर्मिंगहॅम, विजयी संघ – भारत
पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात डकवर्थ लुइस नियमाच्या आधारे भारताने ८ विकेटनी विजय मिळवला. पाकिस्तानचा डाव ३९.४ षटकांत १६५ धावांत संपवल्यानंतर भारतासमोर विजयासाठी २२ षटकांत १०२ धावांचे अव्हान होते. शिखर धवनच्या ४८ धावांमुळे भारताने हे आव्हान १९.१ षटकांत २ विकेट गमावत पूर्ण केले. या सामन्यात २ विकेट घेणारा भारताचा भुवनेश्वर कुमार सामनावीर ठरला.
२०१७, स्थळ – बर्मिंगहॅम, विजयी संघ – भारत
साखळी फेरीतील हा सामना भारताने डकवर्थ लुइस नियमानुसार १२४ धावांनी जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ४८ षटकांत ३ बाद ३१९ धावा फटकावल्या. भारतातर्फे रोहित शर्मा (९१), शिखर धवन (६८), विराट कोहली (नाबाद ८१) आणि युवराज सिंग (५३) या चौघांनीही अर्धशतकी खेळी केली. विजयासाठी पाकिस्तानला ४१ षटकांत २८९ धावा करायच्या होत्या. तथापि, त्यांचा डाव ३३.४ षटकांत अवघ्या १६४ धावांत आटोपला.(India-Pak)
२०१७, स्थळ – दि ओव्हल, विजयी संघ – पाकिस्तान
या अंतिम सामन्यात भारताचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या सल्ल्याविरुद्ध जात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. विराटचा हा निर्णय भारताला महागात पडला आणि संघाच्या पराभवाचे प्रमुख कारणही ठरला. फखर झमनच्या शतकामुळे पाकने ४ बाद ३३८ धावांचे लक्ष्य उभारले. या लक्ष्यासमोर भारताचा डाव ३०.३ षटकांत अवघ्या १५८ धावांत संपला. भारतातर्फे हार्दिक पंड्याने एकाकी लढत देत ७६ धावा केल्या. पाकने १८० धावांच्या विजयासह विजेतेपदावर नाव कोरले.
हेही वाचा :
शमीचे सर्वांत वेगवान ‘द्विशतक’