सिडनी : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील पाचवा व अखेरचा सामना शनिवारी दुसऱ्या दिवशीच रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. शनिवारी, चहापानापर्यंत भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १८१ धावांत संपवून ४ धावांची नाममात्र आघाडी घेतली. त्यानंतर दिवसअखेरपर्यंत भारताने दुसऱ्या डावात ६ बाद १४१ धावा केल्या असून भारताची आघाडी १४५ धावांपर्यंत पोहोचली आहे. सिडनीची खेळपट्टी आणि दोन्ही संघांतील गोलंदाजांची कामगिरी पाहता तिसऱ्या दिवशीच या कसोटीचा निकाल अपेक्षित आहे. (India-Australia)
शनिवारी दिवसभरात एकूण १५ विकेट पडल्या. पहिल्या दिवशी भारताचा डाव १८५ धावांत आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने १ बाद ९ धावा केल्या होत्या. शनिवारी चौथ्याच षटकात बुमराहने मार्नस लॅबुशेनला माघारी पाठवले. बाराव्या षटकात महंमद सिराजने तीन चेंडूंच्या अंतराने कॉन्स्टस आणि हेडला बाद करत ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद ३९ अशी केली. त्यानंतर, अनुभवी स्टिव्ह स्मिथ आणि नवोदित ब्यू वेबस्टर यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. उपाहारापूर्वी प्रसिध कृष्णाने स्मिथला बाद करून ही जोडी फोडली. स्मिथने ५७ चेंडूंमध्ये ४ चौकार व एका षटकारासह ३३ धावा केल्या. (India-Australia)
उपाहारानंतर वेबस्टरने ॲलेक्स केरीच्या साथीने प्रतिकार सुरू ठेवला. दरम्यान, भारताचा कर्णधार बुमराहने पाठदुखीमुळे उपाहारानंतर केवळ एक षटक टाकून मैदान सोडले. त्यानंतर, प्रसिध, नीतिश कुमार रेड्डी आणि सिराज यांनी उर्वरित विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. वेबस्टरने कसोटी पदार्पणात अर्धशतक झळकावताना १०५ चेंडूंमध्ये ५ चौकारांसह ५७ धावांची खेळी केली. भारताकडून सिराज व प्रसिधने प्रत्येकी ३, तर बुमराह व रेड्डीने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. (India-Australia)
अखेरच्या सत्रात फलंदाजीस आलेल्या भारताला जैस्वाल आणि राहुल यांनी ७.३ षटकांत ४२ धावांची वेगवान सलामी दिली. त्यानंतर मात्र पुढच्या आठ षटकांत भारताच्या ४ विकेट पडल्या. रिषभ पंतने ही पडझड थांबवत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर प्रतिआक्रमण चढवले. पहिल्याच चेंडूवर बोलंडला षटकार खेचत त्याने आपल्या खेळीची सुरुवात केली. त्याने अवघ्या २९ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. अखेर पंतला बाद करण्यात कमिन्सला यश आले. पंतने ३३ चेंडूंमध्ये ६ चौकार ४ षटकारांसह ६१ धावांची स्फोटक खेळी केली. त्यानंतर, रेड्डी दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. खेळ थांबला, तेव्हा रवींद्र जडेजा ८, तर वॉशिंग्टन सुंदर ६ धावांवर खेळत होता. ऑस्ट्रेलियाकडून बोलंडने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. (India Test)
धावफलक
- भारत – पहिला डाव सर्वबाद १८५.
- ऑस्ट्रेलिया – पहिला डाव – (१ बाद ९ वरून पुढे) सॅम कॉन्स्टस झे. जैस्वाल गो. सिराज २३, मार्नस लॅबुशेन झे. पंत गो. बुमराह २, स्टिव्ह स्मिथ झे. राहुल गो. प्रसिध ३३, ट्रॅव्हिस हेड झे. राहुल गो. सिराज ४, ब्यू वेबस्टर झे. जैस्वाल गो. प्रसिध ५७, ॲलेक्स कॅरी त्रि. गो. प्रसिध २१, पॅट कमिन्स झे. कोहली गो. नितीश १०, मिचेल स्टार्क झे. राहुल गो. नितीश १, नॅथन लायन नाबाद ७, स्कॉट बोलंड त्रि. गो. सिराज ९, अवांतर १२, एकूण ५१ षटकांत सर्वबाद १८१.
- बाद क्रम : १-९, २-१५, ३-३५, ४-३९, ५-९६, ६-१३७, ७-१६२, ८-१६४, ९-१६६, १०-१८१.
- गोलंदाजी : जसप्रीत बुमराह १०-१-३३-२, महंमद सिराज १६-२-५१-३, प्रसिध कृष्णा १५-३-४२-३, नितीश कुमार रेड्डी ७-०-३२-२, रवींद्र जडेजा ३-०-१२-०.
- भारत – दुसरा डाव – यशस्वी जैस्वाल त्रि. गो. बोलंड २२, लोकेश राहुल त्रि. गो. बोलंड १३, शुभमन गिल झे. कॅरी गो. वेबस्टर १३, विराट कोहली झे. स्मिथ गो. बोलंड ६, रिषभ पंत झे. कॅरी गो. कमिन्स ६१, रवींद्र जडेजा खेळत आहे ८, नितीश कुमार रेड्डी झे. कमिन्स गो. बोलंड ४, वॉशिंग्टन सुंदर खेळत आहे ६, अवांतर ८, एकूण ३२ षटकांत ६ बाद १४१.
- बाद क्रम : १-४२, २-४७, ३-५९, ४-७८, ५-१२४, ६-१२९.
- गोलंदाजी : मिचेल स्टार्क ४-०-३६-०, पॅट कमिन्स ११-४-३१-१, स्कॉट बोलंड १३-३-४२-४, ब्यू वेबस्टर ४-१-२४-१.
हेही वाचा :
भारताचे पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’