कोल्हापूर : प्रतिनिधी : वादळी वारा आणि धुवाँधार पावसाने कोल्हापूर शहराला पावसाने झोडपले. शहरात वादळी वाऱ्याने ५० ते ५५ हून अधिक झाडे पडली. शहरातील सखल भागात पाणी तुंबल्याने महानगरपालिकेची नाले सफाईचा दावा उघड्यावर पडला. शहरातील काही घरांमध्ये पाणी घुसले. रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहनधारकांची त्रेधा तिरपीट उडाली. (Heavy rain)
गेले आठवडाभर जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाच्या सरी जिल्ह्यात कोसळत आहेत. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. कोल्हापूर शहरात गेले दोन दिवस सकाळी आणि रात्री पाऊस पडत आहे. आज मंगळवारी दुपारी साडेचार वाजता आभाळ अंधारुन आले आणि सोसाट्याचा जोरदार वारा सुरू झाला. वाऱ्याचा वेग इतका मोठ्या होता झाडांच्या फाद्या, फ्लेक्स फलक तुटून गेले. अनेक ठिकाणी झाडांच्या फांदा तुटल्या. अनेक ठिकाणी झाडे मुळासकट उन्मळून पडली. (Heavy rain)
ताराराणी फायर स्टेशनशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की, शहरात ५० ते ५५ झाडे पडली आहेत पण कोणतीही जिवितहानी झालेली नाही. देवकर पाणंद, रुईकर कॉलनी, वाय.पी. पोवार नगर, महालक्ष्मी नगर, मंगेशकर नगर, सरनाईक वसाहत, भक्ती पूजा नगर या परिसरात मोठे वृक्ष कोसळले. वायपी पोवार नगर आणि वायपी पोवार चौकात तीन मोठी झाडे पडली आहेत. महानगरपालिका अग्निशमन दलाच्या सहा स्टेशनमधील कर्मचारी झाडे हटवण्यासाठी कार्यरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरात अनेक विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्याने काही घरात पाणी घुसले आहे. महाद्वार रोडवरील काही घरात पाणी घुसल्याने नागरिक त्रस्त झाले होते. या रस्त्यांवरील बहुतांशी गटर्स दुकानदारांनी फरशा आणि स्लॅब टाकून बंद केल्याने पाण्याचा निचरा होण्यात अडचणी येत असल्याने नागरिकांच्या घरी पाणी घुसत आहे. परीख पुलावर गुडघ्यापेक्षा जास्त उंचीवरुन पाणी तुंबले होते. अर्धा ते पाऊस तास पाऊस पडल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. काही काळ पाऊस थांबला आणि पुन्हा सुरू झाला. पावसाची रिपरिप रात्री सुरू असल्याने कामावरुन घरी निघालेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांना भिजत घरी जावे लागले. (Heavy rain)