Home » Blog » स्वर्ग आणि नरक

स्वर्ग आणि नरक

स्वर्ग आणि नरक

by प्रतिनिधी
0 comments
Mahavira file photo

-मुकेश माचकर

भगवान महावीर, राजर्षी प्रसन्नचंद्र आणि राजा श्रेणिक यांची ही कथा. तिचं स्थळ, काळ आणि काही संदर्भ वेगवेगळ्या स्रोतांमध्ये वेगवेगळे आहेत. पण भावार्थ एक आहे.

प्रसन्नचंद्र हा पोतनपूरचा राजा महावीरांचा शिष्य बनला होता आणि एका पायावर उभा राहून आग ओकणाऱ्या सूर्याकडे एकटक पाहण्याची कठोर ध्यानसाधना तो करायचा.

मगधचा राजा श्रेणिक महावीरांच्या दर्शनाला आला. वाटेत त्याला सूर्याकडे एकटक पाहणाऱ्या, दगडी मूर्तीसारख्या शांत आणि तेजस्वी भासणाऱ्या प्रसन्नचंद्राचं दर्शन झालं. ती तपस्या पाहून तो खूप प्रभावित झाला.

भगवान महावीरांपाशी आल्यावर त्याने विचारलं, भगवन्, मी आता प्रसन्नचंद्राला पाहिलं. त्याची ती एकाग्रतेने ध्यानमग्न अशी मूर्ती पाहिल्यावर माझ्या मनात विचार आला की या क्षणी जर मृत्यूने त्याला गाठलं, तर त्याला मोक्षप्राप्तीच होईल. तुमचं काय मत आहे?

महावीर म्हणाले, तो नरकात गेला असता.

श्रेणिक चमकला. महावीरांना आपलं बोलणं समजलं नाही की काय, असं वाटून त्याने पुन्हा विचारलं, भगवान, प्रसन्नचंद्राला आताच्या क्षणी मृत्यूने गाठलं तर तो नरकात जाईल?

महावीर म्हणाले, नाही. तो स्वर्गात जाईल.

श्रेणिक चक्रावला. महावीरांना म्हणाला, हे काय कोडं आहे? मघाशी तो नरकात गेला असता, आता स्वर्गात जाईल. तो तिथे स्थिर उभा आहे, अत्यंत अवघड तपश्चर्या करतो आहे. त्याच्या मघाच्या आणि आताच्या मुद्रेत काहीही फरक नाही. मग त्याच्या मृत्यूच्या फलितात एवढा फरक कसा?

भगवान महावीर म्हणाले, मघाशी तू त्याच्यासमोरून आलास, त्यावेळी त्याच्या मनात वेगळे विचार सुरू होते. त्याने ज्या राज्याचा त्याग केला आहे, त्यावर शत्रू चाल करून येतोय आणि बाल युवराजाला सिंहासनावर बसवून त्याने ज्या दोन अमात्यांच्या हाती कारभार सोपवला होता, ते युवराजाचा काटा काढून राज्य बळकावायला पाहताहेत, अशी बातमी त्याच्यापर्यंत आली होती. त्याने त्याचं चित्त उद्विग्न झालं होतं. शत्रूला रणांगणात पराजित करण्याचा आणि अमात्यांचा शिरच्छेद करण्याचा विचार त्याच्या मनात दाटला होता. मनोमन त्याने तलवार उचलली होती, त्याने दोन्ही अमात्यांची मनोमन हत्या केली होती, तेव्हा तू त्याच्यासमोरून येत होतास. त्याने प्रत्यक्षात हत्या केली नाही, म्हणजे फक्त अपराध घडला नाही. हत्येचं पाप मात्र मनोमन झालंच. त्याने तो नरकातच पोहोचला असता.

पण मग नंतर असं काय घडलं, ज्याने त्याच्यासाठी स्वर्गाची दारं खुली झाली असती? श्रेणिकने विचारलं.

महावीर म्हणाले, मनोमन लढाईसाठी सज्ज होत असताना प्रसन्नचंद्राने आपला जिरेटोप ठीक करण्यासाठी डोक्याकडे हात नेला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपलं डोकं तर तुळतुळीत तासलेलं आहे… आपण आता राजा नाही, संन्यासी आहोत. ज्या राज्यावर संकट येतंय, ते राज्य किंवा ज्या युवराजावर प्राणसंकट घोंघावतंय, तो आपला मुलगा या सगळ्यांचा आपण त्याग केला आहे. आता आपल्या हातात ना तलवार आहे, ना डोक्यावर जिरेटोप आहे, ना आपण राजा आहोत, ना गृहस्थ. असं असताना आपण मनोमन ध्यानधारणेपासून विचलित झालो, हे चूक झालं. मनातले सगळे विचार निपटून पुन्हा तो ध्यानधारणेत समग्रतेने उतरला होता, तेव्हा तू मला दुसरा प्रश्न विचारलास. 

तेव्हा प्रसन्नचंद्र स्वर्गाचाच धनी होता.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00