मुंबई : प्रतिनिधी : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने त्याच्या कार्यक्रमात कुणाचेही नाव घेतले नसताना तरीही ‘चोराच्या मनात चांदणे’ या म्हणीप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ती टीका स्वत:वर ओढवून घेऊन तोडफोड केली. हल्लेखोर सत्ताधारी पक्षातील आहेत. त्यांचा सरकार, संविधान, कायदा आणि गृहविभागावर विश्वास नाही का?, त्यांनी कायदा हातात का घेतला?. शिवसेना शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी घातलेला उच्छाद पाहून सत्ताधारी पक्षाला महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. (Harshwardhan)
स्टुडिओ स्वातंत्र्यसैनिकांचा
गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी कुणाल कामरा प्रकरणी झालेल्या तोडफोडीचा निषेध केला. ते म्हणाले, कुणाल कामराचा कार्यक्रम ज्या स्टुडिओत झाला तो त्यांचा नाही. त्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. भाजपचे मंत्री अशिष शेलार यांचा सत्काराचा कार्यक्रमही तिथेच झाला होता. हा स्टुडिओ एका स्वातंत्र्य सैनिकांचा असून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांनी विवाह केला नव्हता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी विवाह केला. नफाखोरी न करता हा स्टुडिओ कार्यक्रमासाठी उपलब्ध करुन दिला जातो, याकडेही सपकाळ यांनी लक्ष वेधले. (Harshwardhan)
पोलिसांची बघ्याची भूमिका
एका स्वातंत्र्य सैनिकाच्या संपत्तीवर शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला. हा प्रश्न फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नाही तर लोकांनी कसे जगावे याचाही आहे. या तोडफोडीत स्टुडिओचे २५ लाखाचे नुकसान झाले आहे. ते सरकारने भरुन द्यावे अशी मागणी सपकाळ यांनी केली. हा सर्व प्रकार सुरू असताना पोलिसांनी घेतलेली बघ्याची भूमिका अतिशय गंभीर आहे, अशी टीकाही त्यांनी केली. (Harshwardhan)
नितेश राणेंच्या घरावर बुलडोजर चालवणार का?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार असे म्हणाले आहेत. तशीच वसुली या घटनेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या दंगेखोरांकडून सरकार वसूल करणार का याचे उत्तर द्यावे अशी मागणी सपकाळ यांनी केली. नागपूर दंगलीतील आरोपी फहिम खानच्या घरावर सरकारने बुलडोझर चालवला आहे. सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी चिथावणीखोर भाषणे केली आहेत. मग फडणवीस नितेश राणेंच्या घरावर बुलडोजर चालवणार का? असा सवालही सपकाळ यांनी विचारला आहे. (Harshwardhan)
हेही वाचा :
बुलडोझर कारवाईवर यूपी सरकारला कोर्टाने फटकारले
नागपूर ‘बुलडोझर’ कारवाईला ‘स्टे’