Home » Blog » Harry Brook : हॅरी ब्रुकची दुसऱ्यांदा ‘आयपीएल’मधून माघार

Harry Brook : हॅरी ब्रुकची दुसऱ्यांदा ‘आयपीएल’मधून माघार

दोन वर्षांच्या बंदीची शक्यता; इग्लंडच्या कर्णधारपदाची तयारी?

by प्रतिनिधी
0 comments
Harry Brook

नवी दिल्ली : इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुकने सलग दुसऱ्या वर्षी इंडियन प्रीमियर लीगमधून (आयपीएल) माघार घेत असल्याचे सोमवारी जाहीर केले. त्याच्या या माघारीमुळे त्याच्यावर दोन वर्षे आयपीएल खेळण्यासाठी बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. (Harry Brook)

मागील दोन मोसम सनरायझर्स हैदराबाद संघामध्ये असणाऱ्या ब्रुकला यंदाच्या मोसमासाठी दिल्ली कॅपिटल्सने ६.२५ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. सोमवारी ब्रुकने एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहून आयपीएलमधून माघार घेत असल्याचे सांगितले. “आगामी आयपीएलमध्ये न खेळण्याचा कठीण निर्णय मी घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि त्यांच्या समर्थकांची मी मनापासून क्षमा मागतो. माझे क्रिकेटवर प्रेम आहे. लहानपणापासून मी देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिले आणि या स्तरावर क्रिकेट खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. काही विश्वासू लोकांचे मार्गदर्शन घेतल्यानंतर मी गांभीर्याने या निर्णयाचा विचार केला आहे. इंग्लंड क्रिकेटसाठी हा महत्त्वाचा कालखंड आहे आणि इंग्लंडच्या आगामी मालिकांच्या तयारीसाठी पूर्णत: कटिबद्ध राहण्याची माझी इच्छा आहे. माझा हा निर्णय सर्वांना समजून घेता येणार नाही, परंतु जे योग्य आहे, असे मला वाटते, ते मला केले पाहिजे. देशासाठी खेळण्यास नेहमीच माझे प्राधान्य असेल,” असे ब्रुकने या पोस्टमध्ये म्हटले आहे. (Harry Brook)

ब्रुकचा हा निर्णय इंग्लंड क्रिकेट बोर्डातर्फे (ईसीबी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कळवण्यात आला होता. त्यानंतर, बीसीसीआयतर्फे दिल्ली कॅपिटल्सला याची माहिती देण्यात आली. या माघारीमुळे ब्रुकवर दोन वर्षांसाठी आयपीएल बंदी घातली जाण्याचीही शक्यता आहे. मागील वर्षीच्या आयपीएल लिलावापूर्वी संघांना पाठवलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये या नियमाचा उल्लेख करण्यात आला होता. लिलावासाठी उपलब्ध असणाऱ्या, परंतु करारबद्ध झाल्यानंतरही मोसमामध्ये न खेळणाऱ्या खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी घालण्यात येईल, असे या नियमांत म्हटले होते. केवळ दुखापतीमुळे न खेळू शकणाऱ्या खेळाडूंना या नियमातून अपवाद करण्यात आले आहे. मागील वर्षी ब्रुकने आजीचे आजारपण व निधनामुळे आयपीएलमधून माघार घेतली होती. (Harry Brook) दरम्यान, ब्रुकच्या पोस्टमुळे त्याच्याकडे इंग्लंडच्या वन-डे व टी-२० संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील इंग्लंडच्या निराशाजनक कामगिरीनंतर जोस बटलरची कर्णधारपदावरून उचलबांगडी होणार असल्याचे सांगितले जात आहे. २०२३ चा वन-डे वर्ल्ड कप आणि २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्येही इंग्लंडला विशेष छाप पाडता आली नव्हती. अशावेळी २६ वर्षीय ब्रुकचा विचार मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी कर्णधार म्हणून केला जाऊ शकतो. (Harry Brook) 

हेही वाचा :

भारत तिसऱ्यांदा ‘चॅम्पियन’

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00