Home » Blog » Governor Meet :धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या

Governor Meet :धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या

सर्वपक्षीय शिष्टमंडळांचे राज्यपालांना साकडे

by प्रतिनिधी
0 comments
Governor Meet

मुंबई : जमीर काझी : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात मोर्चे आणि निषेध होत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय शिष्टमंडळाने  सोमवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन मंत्री मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपाल भवनात राज्यपालांची भेट घेतली.  संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावा. तसेच बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पुढाकार घेऊन शासनाला सूचना कराव्यात, अशा मागण्याही करण्यात आल्या. (Governor Meet)

शिष्टमंडळात माजी खासदार संभाजीराजे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार बजरंग सोनावणे, भाजपाचे आमदार  सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर आणि ज्योती मेटे यांचा समावेश होता.

राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीडमध्ये खंडणी, अपहरण आणि इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. सरपंच संतोष देशमुख प्रकरण हे बीडमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे उदाहरण आहे. पोलिसांच्या कथित निष्काळजीपणा आणि पक्षपातीपणामुळे बीड जिल्ह्यात अशांतता पसरली आहे. राज्यभरातील सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. (Governor Meet)

राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे म्हणाले की , हत्येच्या तपासात विलंब झाला आहे. हत्येचे प्रकरण जातपात आणि राजकारणाच्या पलीकडचे आहे. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या होऊनही योग्य न्याय मिळाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा घटना घडणार आहेत. त्यामुळे आम्ही राज्यपालांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. चौकशी होईपर्यंत  मंत्री मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे.’(Governor Meet)

अंबादास दानवे म्हणाले, ‘सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्यादेखील गंभीर आहे. सरकार मुंडे आणि कराडला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. एसआयटीमधील चौकशी अधिकारी आरोपींच्या जवळचे आहेत. सरकार ऐकत नाही म्हणून राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी सविस्तर मागणी ऐकली आहे.’

राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘वाल्मिक कराडला ३०२ मध्ये आरोपी करावे. गुन्हेगारीचे उदात्तीकरण करू नाही. आम्ही घटनात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत आहोत. बीडमध्ये यापूर्वीही गुन्हे घडले आहेत. त्या प्रकरणांची चौकशी व्हावी. तिसऱ्या फरार आरोपीला अटक व्हावी. बीड प्रकरणाला जातीय रंग देऊनये,’ असेही त्यांनी सांगितले.

  • शिष्टमंडळाच्या मागण्या
  • सरपंच संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे हे हस्तक्षेप करू शकतात. त्यामुळे त्यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा
  • कायदा आणि सुव्यवस्था असलेले राज्य आहे, अशी भावना बळकट करावी
  • मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याच्यावर बीएनएस १०३ (जुना आयपीसी ३०२) अन्वये तत्काळ हत्येचा गुन्हा दाखल करावा.
  • खटला जलदगती न्यायालयात चालवावा.
  • अधिकाऱ्यांची जबाबदारी सुनिश्चित करावी.
  • कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी.
  • बीड जिल्ह्यातील जनतेचा विश्वास, सुरक्षितता पूर्ववत करण्यासाठी तसेच खंडणी आणि गुंडगिरीला आळा घालण्यासाठी राज्यपालांनी पुढाकार घ्यावा.
हेही वाचा :
जबाबदारी बँकांचीच!
शेअर बाजारात ‘व्हायरस’!

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00