Home » Blog » Fulewadi, PTM Win: ‘पाटाकडील’चा दणदणीत विजय

Fulewadi, PTM Win: ‘पाटाकडील’चा दणदणीत विजय

फुलेवाडी संघाची आगेकूच

by प्रतिनिधी
0 comments
Fulewadi PTM Win

कोल्हापूर : प्रतिनिधी : उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी (२२ मार्च) झालेल्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ अ संघाने रंकाळा तालीम मंडळाचा ११-० च्या फरकाने पराभव केला. सकाळच्या सामन्यात फुलेवाडी क्रीडा मंडळाने सडन डेथवर वेताळमाळ तालीम मंडळाचा १-० ने पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. उत्तरेश्वर तालीम मंडळाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर सामने सुरु आहेत. (Fulewadi, PTM Win)

सकाळी झालेल्या सामन्यात फुलेवाडी क्रीडा मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ या दोन संघांतील सामना चुरशीचा झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. वेताळमाळच्या राहुल पाटीलने २७ व्या मिनिटाला गोल करून संघाला १-० अशी आघाडी दिली. मध्यंतराच्यावेळी वेताळमाळ संघ १-० आघाडीवर होता. (Fulewadi, PTM Win)

उत्तरार्धात फुलेवाडीकडून आक्रमक खेळ करण्यात आला. ४७ व्या मिनिटाला सत्यम पाटीलने गोल नोंदवून सामन्याला बरोबरीत आणले. यानंतर, पूर्णवेळ बरोबरीत राहिल्यामुळे पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. टायब्रेकरमध्ये फुलेवाडीकडून अक्षय मंडलिक, अजय जाधव, मंगेश दिवसे, आदित्य तोरस्कर, आणि विनायक पाटील यांनी गोल केले.

वेताळमाळकडून श्रीकांत माने, प्रणव कणसे, संदीप पोवार, रणधीर जाधव, आणि रेहान मुजावर यांनी गोल केले. यामध्ये टायब्रेकरमध्ये ५-५ अशी बरोबरी झाल्यावर सडनडेथमध्ये वेताळमाळच्या राहुल पाटीलची संधी वाया गेली आणि फुलेवाडीच्या शुभम देसाईने अचूक गोल करत संघाला विजय मिळवून दिला. हा सामना फुलेवाडीने सडन डेथवर १-० असा जिंकला. (Fulewadi, PTM Win)

दुपारच्या सत्रातील पाटाकडील तालीम मंडळ अ आणि रंकाळा तालीम मंडळ यांच्यातील सामना पाटाकडीलने ११-० असा एकतर्फी जिंकला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच पाटाकडीलच्या खेळाडूंनी सामन्यावर आपले वर्चस्व ठेवले. ऋतुराज सूर्यवंशीच्या पासवर ओंकार मोरेने २० व्या मिनिटाला गोल केला. ओंकार मोरेच्या पासवर प्रथमेश हेरेकरने २३ व्या मिनिटाला, निवृत्ती पवनोजीने ३० व्या मिनिटाला आणि प्रथमेश हेरेकरने ३९ व्या मिनिटाला दुसरा गोल करत संघाची आघाडी ४-० अशी केली.

उत्तरार्धात रंकाळा तालीम मंडळाच्या खेळाडूंनी गोल करण्यासाठी पाटाकडीलच्या गोल क्षेत्रात चढाई केली, पण पाटाकडीलच्या बचावफळीने त्यांना गोल करायला संधी दिली नाही. ४३ व्या मिनिटाला प्रथमेश हेरेकरने तिसरा गोल केला. ४५ व्या मिनिटाला यशराज कांबळेने अंशीद मोहमद नबीच्या पासवर गोल करून सामन्यात ६-० अशी आघाडी मिळवून दिली. ४६ व्या मिनिटाला प्रथमेश हेरेकरने चौथा गोल केला, तर संघाची आघाडी ७-० केली. काही मिनिटांमध्ये अंशीद मोहमद नबीने ५२ व्या मिनिटाला, आणि संदेश कासारने ५३ व्या मिनिटाला गोल करत आघाडी ९-० केली. सामना संपायच्या काही मिनिटांपूर्वी विशाल नारायणपुरेने ७२ व्या, तर रोहित देसाईने ७३ व्या मिनिटाला गोल करत पाटाकडीलला एकतर्फी विजय मिळवून दिला.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00