-मुकेश माचकर
एका गावात एक शेतकरी आणि एक व्यापारी राहात होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला दर आठवड्याला पाच किलो गहू जायचा आणि शेतकऱ्याकडून दर आठवड्याला पाच किलो ज्वारी किंवा बाजरी व्यापाऱ्याकडे जायची. हा त्यांचा वर्षानुवर्षांचा व्यवहार होता.
दोघांमध्ये एकदा कडाक्याचं भांडण झालं. दोघांनीही एकमेकांशी बोलणं टाकलं. पण, दोघांमधला व्यवहार सुरू राहिला. एक दिवस व्यापाऱ्याला शंका आली की शेतकऱ्याकडून आलेली ज्वारी पाच किलो नसावी. त्याने त्याच्याकडच्या काट्यावर तोलून पाहिली. ती साडेचार किलो भरली. पुढच्या वेळी चार किलोच ज्वारी आली.
तो खूप संतापला. त्याने शेतकऱ्याला धडा शिकवायचा निर्धार केला. पंचायतीत तक्रार केली.
पंचायतीत जाहीर सुनावणी झाली. पंचांनी शेतकऱ्याला विचारलं, तू व्यापाऱ्याला का फसवतोस? शेतकरी म्हणाला, भांडण झालं म्हणून मी मापात पाप करीन हे शक्यच नाही. व्यापारी भडकून म्हणाला, आता निदान खोटं तरी बोलू नकोस. माझ्याकडच्या काट्यावर तोलून पाहिलीये मी ज्वारी. पाच किलोच्या जागी कधी चार किलो, कधी साडेचार किलो.
शेतकरी तरीही मानायला तयार नव्हता. तेव्हा पंच वैतागून म्हणाले, तुझ्याकडच्या वजनांमध्ये काही गडबड आहे का? शेतकरी म्हणाला, मी काय व्यापारी आहे का वजनं ठेवायला? माझ्याकडे वजनं नाहीत.
पंच म्हणाले, मग तू व्यापाऱ्याला पाच किलो ज्वारी कशी तोलून देतोस?
शेतकरी म्हणाला, त्याच्याकडून दर आठवड्याला जो पाच किलो गहू येतो, तीच पिशवी मी तागडीत एका बाजूला टाकतो आणि तेवढीच ज्वारी मापून पाठवतो.