Home » Blog » देवेंद्र फडणवीस हे सुटाबुटातले `योगी`

देवेंद्र फडणवीस हे सुटाबुटातले `योगी`

राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्र पेटवायला जाल तर आधी तुमच्या खुर्च्यांच्या बुडाखाली आग लागल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेवा.

0 comments

मुख्यमंत्र्यांनी राज्य सांभाळायचे असते. राज्यात शांतता नांदण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. कायदा-सुव्यवस्था राखायची असते. गृहखाते त्यांनी आपल्याकडेच ठेवले आहे त्यामुळे त्यांच्यावर ती जबाबदारी अधिक येते. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे भान दिसून येत नाही. २०१४ साली ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा नवखे असल्याने त्यांच्या अगोचरपणाकडे दुर्लक्ष केले जात होते. परंतु आपल्या बेजबाबदारपणाकडे दुर्लक्ष म्हणजे आपल्या कामाची पोचपावती असल्यासारखे त्यांचे वागणे दिसून येते. एखादा मुख्यमंत्रीच राज्य अस्थिर करतो, राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यास चिथावणी देतो असे उदाहरण दुर्मीळ असते. उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा त्याबाबतीत नंबर लागतो. त्याअर्थाने विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांना सुटाबुटातले योगी म्हणता येईल. वरून पेहराव फक्त आधुनिक आहे, मेंदू बुरसटलेला आहे. योगींशी स्पर्धा करील इतका विखारी आणि विद्वेषी. (Fadnavis set Maharashtra on fire)

माणसांची माकडे बनवून पदरी नेमली

राज्याचे आणि राज्यकर्त्यांच्या यशाचे मोजमाप त्या राज्यातील शांतता आणि सुव्यवस्थेवरून केले जाते. बाकी सगळ्या पातळीवर आनंदी आनंद आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येईल. परंतु सामान्य माणसांच्या जिवाशी जेव्हा राज्यकर्ते खेळ मांडतात तेव्हा राज्य अस्थिर होऊन जाते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे गुजरातची सुपारी घेऊन राज्य अस्थिर करायला निघाले आहेत काय, असा प्रश्न कुणाही सुजाण नागरिकाला पडल्यावाचून राहात नाही. (Fadnavis set Maharashtra on fire)

औरंगजेबाची कबर हा राज्यकर्त्यांच्यापुढचा आजच्या काळातला प्रमुख मुद्दा कसा काय असू शकतो? राज्यात गुन्हेगारांनी उच्छाद मांडलाय. शेतकरी आत्महत्या करायला लागले आहेत. महिलांच्यावरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बेरोजगारीनं कळस गाठलाय. सामान्य माणसाचं जगणं मुश्किल झालं आहे. या प्रश्नांपासून दूर पळण्यासाठी राज्यकर्ते औरंगजेबाचा आधार घेताहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणा-या प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांना संरक्षण देणारे शिवप्रेमाचा देखावा करताहेत. राज्याचे मंत्री एखाद्या सराईत गुंडासारखे चिथावणी देत राज्यभर फिरत आहेत. महाराष्ट्र ठऱवून खड्ड्यात घालायचा उद्देश असल्याशिवाय हे इतके सगळे घडू शकत नाही.

काहीही करून दंगल पेटली पाहिजे. तरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा फायदा होईल, हा त्यांचा डाव आहे. विधानसभा निवडणुकीतले यश कसे मिळाले आहे, याचे गुपित त्यांनाच ठावूक आहे. त्याची पुनरावृत्ती करता येणार नाही. त्यासाठी हिंदू-मुस्लिम केल्याशिवाय फायदा नाही. हे ओळखून सगळे नियोजनबद्धरितीने चालले आहे. सत्ताधारीच राज्य अस्थिर करायला निघाल्याचे जगाच्या पाठीवरचे हे दुर्मीळ उदाहरण आहे. (Fadnavis set Maharashtra on fire)

यशवंतराव चव्हाण एकदा म्हणाले होते,‘महाराष्ट्रामध्ये मी माकडांची माणसं बनवली, माणसांचे सरदार बनवले, त्यांच्या हातात सहकार, पंचायतराज व्यवस्था या साधनांच्या तलवारी दिल्या आणि त्याच तलवारी घेऊन ते माझ्यावर वार करायला निघाले आहेत.’

यशवंतरावांच्या याच विधानाचा संदर्भ घेऊन असे म्हणता येईल की, फडणवीसांनी माणसांची माकडे बनवून आपल्या पदरी नेमली आहेत. त्यांना पदांचे तुकडे देऊन किंवा अन्य मार्गाने संरक्षण देऊन मोकाट सोडले आहे. त्यांनी अक्षरशः महाराष्ट्रात उच्छाद मांडला आहे. कुणी विरोधी नेत्याला शिविगाळ करतो. कुणी परक्या जातीचा उद्धार करतो. कुणी जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करतो. कुणी विरोधी नेत्याच्या घरात घुसून आंदोलनाची भाषा करतो. कुणी जातीचा आधार घेऊन आक्रस्ताळेपणे कुणालाही काहीही शिव्या देत असतो. असल्या पाळीव लोकांच्यामार्फत फडणवीसांचा कारभार चालला आहे.

लगेगी आग तो….

एकनाथ शिंदे यांनी नसेल, पण देवेंद्र फडणवीस यांनी राहत इंदोरी यांचा हा शेर नक्की ऐकला असेल –

 लगेगी आग तो आएँगे घर कई ज़द में

 यहाँ पे सिर्फ़ हमारा मकान थोड़ी है

याच रचनेमध्ये अखेरचा शेर आहे –

सभी का ख़ून है शामिल यहाँ की मिट्टी में

किसी के बाप का हिन्दोस्तान थोड़ी है

देशाच्या स्वातंत्र्यासाठी इथल्या मुसलमानांनी रक्त सांडले आहे. त्यावेळी तुमचे पूर्वज इंग्रजांसाठी फितूरी करीत होते, इथल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या खबरी सरकारला कळवीत होते. त्याच अल्पसंख्य समाजाला सरकारकडूनच सतत लक्ष्य केले जाते. (Fadnavis set Maharashtra on fire)

नागपूर पेटल्यावर भाषा बदलली

फडणवीसांच्या गृहमंत्रिपदाच्या काळात अनेक दंगली झाल्या. परंतु कुठल्याही दंगलीच्यावेळी त्यांनी शांततेचे आवाहन केले नाही. प्रत्येकवेळी त्यांची भाषा – औरंग्यांच्या औलादींना इथे थारा नाही… अशा प्रकारची असायची. नगरच्या दंगलीवेळी असेल किंवा अलीकडे विशाळगडच्या दंगलीवेळी असेल. आपण सत्तेतल्या पदावर आहोत, याचे भान फडणवीसांनी कधीच ठेवले नाही. राज्यभर दंगली पेटवण्याचा अजेंडा ठेवला.परंतु दंगलीचा नारळ त्यांच्या नागपुरातच फुटला. त्यावेळी मात्र त्यांची भूमिका बदललेली दिसली. पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री शांतता राखण्याचे आवाहन करताना दिसले. पण तेवढ्याने शहाणे झाल्याचे काही आढळले नाही. कारण दुस-या दिवशी राम कदमांसारखे त्यांचे पंटर औरंगजेबाचा राग आळवतच होते. फडणवीसांच्या हिंदुत्वाला टक्कर देण्यासाठी एकनाथ शिंदे यांची टोळी विधानभवनाच्या पायरीवर औरंगजेबाचा खेळ खेळत होती. स्वतः एकनाथ शिंदे सभागृहात औरंगजेबावरून मागे हटायला तयार नव्हते. एका दंगलीने यांचे समाधान झालेले नाही, हेच यावरून दिसून येते. (Fadnavis set Maharashtra on fire)

लाभार्थ्यांद्वारे फक्त निवडणुका जिंकता येतात..

खरेतर २३२ जागांचे भक्कम बळ मिळाल्यानंतर कसे राज्य चालवायला पाहिजे होते. आर्थिक संकटातही लोकांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करता आले असते. माणसांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित गोष्टी सहजसुलभ बनवून जगणे सुसह्य करता आले असते. अनुदानाद्वारे लोकांना लाभार्थी किंवा भिकारी बनवून निवडणुका जिंकता येतात. परंतु लोकांना समाधानी नाही ठेवता येत. लोकांना शांतता हवी असते. रोजच्या जगण्यात अडथळा नको असतो.

माकडांच्या हाती पलिते कशाला देता ?

तुम्हाला तुमचा अजेंडा राबवायचा आहे ना, तर घ्या पटापट निर्णय. तुमच्यात दम आहे तर विद्यापीठांची नावे बदला. शहरांची नावे बदला. औरंगजेबाची कबर उखडा. तिचे संरक्षण काढून घ्या. दिल्लीतही तुमचेच सरकार आहे ना…. पण हे पटापट करा. त्यासाठी लोकांना चिथावणी देऊन रस्त्यावर का उतरवता. त्यांना चिथावणी देण्यासाठी पाळीव माकडांच्या हाती पलिते कशाला देता… (Fadnavis set Maharashtra on fire)

महाराष्ट्र पेटवू नका. तुम्हाला वाटत असेल की महाराष्ट्र पेटवून गमजा मारता येतील. किंवा गोध्राकांडानंतर जसे नरेंद्र मोदी हिरो झाले तसे हिरो होता येईल. तर ते शक्य होणार नाही. तुम्ही कितीही बिघडलात तरी छत्रपती शिवरायांचा… महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र एका मर्यादेच्या पलीकडे तुमच्या कारस्थानाला बळी पडणार नाही. महाराष्ट्र पेटवायला जाल तर आधी तुमच्या खुर्च्यांच्या बुडाखाली आग लागेल, हे ध्यानात ठेवा.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00