लंडन : भारताच्या लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीमध्ये सनसनाटी निकाल नोंदवला. लक्ष्यने इंडोनेशियाच्या तृतीय मानांकित जोनातन ख्रिस्टीचा २१-१३, २१-१० असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. भारताच्या मालविका बनसोड, ऋत्विका-रोहन यांचे आव्हान मात्र अनुक्रमे महिला एकेरी व मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीमध्ये संपुष्टात आले.(England Badminton)
जागतिक क्रमवारीत ख्रिस्टी दुसऱ्या, तर लक्ष्य १५ व्या स्थानी आहे. तथापि, लक्ष्यने गुरुवारी दोन्ही गेम्समध्ये ख्रिस्टीपेक्षा सरस खेळ केला. पहिला गेम लक्ष्यने २१-१३ असा जिंकून सामन्यात आघाडी घेतल्यानंतर ख्रिस्टी दुसऱ्या गेममध्ये पुनरागमनासाठी प्रयत्न करेल, अशी अपेक्षा होती. तथापि, लक्ष्यने दुसऱ्या गेममध्येही त्याला फारशी संधी दिली नाही. हा गेम २१-१० असा जिंकून लक्ष्यने अवघ्या ३६ मिनिटांमध्ये विजय साकारला. उपांत्यपूर्व फेरीमध्ये लक्ष्यचा सामना चीनच्या सहाव्या मानांकित शी फेंग ली याच्याशी होईल. लीने फ्रान्सच्या टोमा पोपोव्हवर तीन गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत २१-१८, १७-२१, २१-१५ अशी मात करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.(England Badminton)
गुरुवारी अन्य गटांमधील सामन्यांत मात्र भारतीय खेळाडूंच्या पदरी निराशा आली. महिला एकेरीमध्ये भारताच्या मालविका बनसोडचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले. जपानच्या तृतीय मानांकित अकाने यामागुचीने मालविकाला अवघ्या ३३ मिनिटांमध्ये २१-१६, २१-१३ असे पराभूत केले. यामागुचीच्या वेगवान खेळापुढे मालविकाचा निभाव लागला नाही. मिश्र दुहेरीमध्ये रोहन कपूर आणि ऋत्विका शिवानी गड्डे यांचा सामना चीनच्या पाचव्या मानांकित यान झे फेंग-या शिन वेई यांच्याशी होता. हा सामना चीनच्या जोडीने केवळ ३० मिनिटांमध्ये २१-१०, २१-१२ असा जिंकला.(England Badminton)
हेही वाचा :
‘कर्तव्यमूर्ती’ द्रविड कुबड्यांसह मैदानात!
मार्शला खेळण्यास परवानगी, पण…