Home » Blog » शिक्षणाच्या धंदेवाईकपणाला चाप

शिक्षणाच्या धंदेवाईकपणाला चाप

शिक्षणाच्या धंदेवाईकपणाला चाप

by प्रतिनिधी
0 comments
Education file photo

आकर्षक जाहिरातींची भूल घालून विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करण्याच्या खासगी कोचिंग क्लासेसच्या वृत्तीला चाप लावण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दिशानिर्देश जारी केले आहेत. या निर्देशांमुळे खासगी क्लासेसचा बाजार कमी होईल असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. परंतु एका मोठ्या बाजारावर काही प्रमाणात का होईना अंकुश ठेवण्याचे पाऊल म्हणून याकडे पाहावे लागेल. शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने होत आहे. आधी विनाअनुदानित शिक्षणाचे धोरण आले. त्यातून खासगी शिक्षण संस्था उभ्या राहिल्या, यापैकी काही संस्थांनी उत्तम कामगिरी करून जागतिक पातळीवरील स्पर्धेत आपल्याला अग्रस्थानी ठेवले. ज्यांना स्पर्धेत टिकणे शक्य झाले नाही त्यांची दुकाने बंद झाली. विनाअनुदानित शिक्षण संस्था स्थिरावत असतानाच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेशाचे धोरण राबवले जाऊ लागले. त्याआधी सुद्धा खासगी शिकवणी वर्ग होते, परंतु ते मर्यादित स्वरुपात होते. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांपुरतेच ते मर्यादित होते. परंतु मेडिकल, इंजिनिअरिंग आणि तत्सम अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय पातळीवर स्पर्धा परीक्षा होऊ लागली तेव्हा या परीक्षांसाठीचे कोचिंग क्लासेस सुरू झाले. विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याऐवजी या परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचे तंत्र या क्लासेसमध्ये शिकवले जाऊ लागले. सुरुवातीला एखाद्याने छोटे दुकान सुरू करावे, हळुहळू त्या दुकानाचे डिपार्टमेंटल स्टोअर्स व्हावे आणि नंतर त्याचे एखाद्या भव्य मॉलमध्ये रुपांतर व्हावे, तशा प्रकारे कोचिंग क्लासेसचे प्रस्थ वाढत गेले. एखाद्या क्लासच्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने निवड झाली तर संबंधित क्लासेस त्या विद्यार्थ्यांच्या छायाचित्रांसह जाहिरात करू लागले. पालक आणि विद्यार्थी एवढे भाबडे असतात की, अशा जाहिरातींना भुलून संबंधित क्लासमध्ये प्रवेश घेऊ लागले. राज्य आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी चालवणारे क्लासेसही अशाच प्रकारे विद्यार्थ्यांच्या जाहिराती करू लागले. जाहिरातीचे युग असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन व्याप वाढवला जाऊ लागला. अनेक क्लासेसचे जाळे राज्यभर विस्तारले आहे. त्यांचे ब्रँड्स बनले आहेत आणि त्या ब्रँड्सकडे विद्यार्थी-पालक आकर्षित होत असतात. मोठे क्लासेस वाढत गेले त्याबरोबर छोट्या क्लासचालकांचे मात्र मरण ओढवले. अनेक छोट्या क्लासचालकांवर गंडांतर आले. नोकरी नसल्यामुळे बेरोजगारीला कंटाळून छोट्या प्रमाणात खासगी शिकवणी वर्ग चालवून उदरनिर्वाह करणा-या लोकांच्यावर उपासमारीची पाळी आली. कोविड काळात तर अशा अनेकांना क्लास बंद करून उदरनिर्वाहाचे अन्य पर्याय शोधावे लागले.

खासगी कोचिंग क्लासेसवर टाकलेल्या निर्बंधांकडे या सगळ्या पार्श्वभूमीवर पाहावे लागते. ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या यासंदर्भातील समितीमध्ये शिक्षण मंत्रालय आणि नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या प्रतिनिधींचा समावेश होता. यासंदर्भात दिलेल्या निर्देशांमध्ये महत्त्वाचा भाग आहे,तो म्हणजे जर खासगी कोचिंग क्लासेसना आपल्या जाहिरातीमध्ये संबंधित विद्यार्थ्यांचे छायाचित्र वापरावयाचे असेल तर निवड झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांची परवानगी घ्यावी, असे म्हटले आहे. निवड झाल्यानंतरची परवानगी इथे महत्त्वाची आहे.नाहीतर सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार विद्यार्थी संबंधित क्लासमध्ये प्रवेशासाठी आला किंवा नोट्स विकत घ्यायला आला तरी त्याच्याकडून अर्ज भरून घेतला जातो आणि नंतर त्याचा वापर केला जातो. आता निवड झाल्यानंतर ही प्रक्रिया करावी लागेल, जेणेकरून संबंधित क्लासमध्ये खरोखर मार्गदर्शन मिळाले असेल तरच विद्यार्थी अनुमती देतील. कोणताही संबंध नसताना जाहिराती करून बाजार मांडणा-या क्लासेसना त्यामुळे चाप बसेल. विद्यार्थ्यांवर दबाव आणून त्यांची संमती घेऊन जाहिरात करण्यावर त्यामुळे निर्बंध येऊ शकतील. कोचिंग क्लासेसनी केलेले सर्व दावे खरे आणि पडताळणीत सच्चे ठरणारे असावेत. यशाची खात्री, नोकरी मिळणे किंवा यशाचे दावे अतिशयोक्ती स्वरुपात करण्याचाही यात अंतर्भाव आहे. विद्यार्थ्यांना आकर्षित करणअयासाठी खोटे दावे आणि जाहिराती करणा-या संस्थांवर ग्राहक संरक्षण कायद्यानुसार दंडाची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करायला हवे, कारण लोकांच्या रोजच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नांच्या पलीकडे अनेक प्रश्न दुर्लक्षित राहतात. काही कुप्रथा वर्षानुवर्षे सुरू असतात आणि त्याकडे कुणाचे लक्ष नसल्यामुळे त्याच योग्य असल्याचा समज रूढ होत असतो. अशा निर्णयांमुळे त्याला धक्का बसतो आणि एका अनिष्ट प्रथेला चाप लावण्यासाठीची पावले पडतात.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00