मुंबई; विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुका येत्या बुधवारी २० नोव्हेंबरला होत आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांच्या संबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र (ईएमएमसी) स्थापित करण्यात आला आहे. (Electronic Media Monitoring Center)
मतदान दिनी तसेच मतदान दिवसाच्या एक दिवस आधी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचे काम भारत निवडणूक आयोगाकडून या कक्षाव्दारे होणार आहे. वाहिन्यांवरील महत्त्वाच्या घटना, आचारसंहितेचा भंग, कायदा व सुव्यवस्था आदींबाबत बातम्या प्रसारित झाल्यास अशा घटनांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत किंवा संबंधित यंत्रणेमार्फत इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटरद्वारे तत्काळ दखल घेतली जाणार आहे.
इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र संदर्भातील बैठक आज मंत्रालयात झाली. यावेळी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव (माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती) यांना सहमुख्य निवडणूक अधिकारी विजय राठोड यांच्याकडून सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीस माहिती व जनसंपर्क संचालक दयानंद कांबळे, अवर सचिव तथा माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी शरद दळवी, आदी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.