रायपूर : छत्तीसगड राज्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून छत्तीसगडमधील ‘डीएमएफ’ फंडात दहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या पत्राने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांच्याविरुध्द विरोधी काँग्रेस पक्षाने प्रश्न उपस्थित केले आहेत. ननकीराम कंवर यांनी उपस्थित केलेल्या विषयाची चौकशी करावी, अशी मागणी छत्तीसगड काँग्रेसने केली आहे.(DMF Fund Fraud)
ननकीराम कंवर हे राज्याचे माजी गृहमंत्री असून भाजपचे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांनी केलेल्या आरोपामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. कंवर यांनी दावा केला आहे की राज्यातील डीएमएफ फंडात दहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याची सीबीआयने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना केली आहे. कंवर यांनी जिल्हाधिकाऱ्यांवरही आरोप केले आहेत. डीएमएफ फंडाचा सर्वाधिक भ्रष्टाचार कोरबा आणि दंतेवाडा जिल्ह्यात झाला आहे. तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांवर त्यांनी आरोप केले आहेत.(DMF Fund Fraud)
रविवारच्या पत्रकार परिषदेत ननकीराम यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. ननकीराम कंवर यांनी, ज्यावेळी डीएमएफची सुरुवात झाली त्यावेळेपासून कोरबा, दंतेवाडा आणि राज्यातील जिल्हा कार्यालयातील प्रकरणांची सीबीआय आणि ईडीने चौकशी करण्याची गरज व्यक्त केली आहे. यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे, असे पत्रकार परिषदेत सांगितले. सोनालिया पुलाच्या अंडरब्रीजचे काम सुरू आहे. हे काम ‘डीएमएफ’च्या माध्यमातून केले जात आहे. नियमानुसार हे काम ‘डीएमएफ’नुसार करता येत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. कमिशनखोरांसाठी हे काम सुरू आहे. त्यांनी महिला समिती, आरोग्य विभाग, महिला आणि बाल विकास या विभागातही भ्रष्टाचार झाला असल्याचा दावा केला आहे.(DMF Fund Fraud)
दरम्यान, कंवर यांच्या पत्रानंतर काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्ला चढविला आहे. काँग्रेसचे मीडिया प्रमुख सुशील आनंद शुक्ला यांनी म्हटले आहे की, ननकीराम कंवर हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी सरकारवर जे आरोप केले आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे.
हेही वाचा :
कौटुंबिक खासगीपणाचा आदर