मुंबई : विशेष प्रतिनिधी : माझ्या राजीनाम्याबाबतचा निर्णय आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री देवेद फडणवीस घेतील, अशी प्रतिक्रिया सद्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आ.संदीप क्षीरसागर यांचे व कृष्णा आंधळे यांचे संबंध असल्याचा आरोप केला.(Dhananjay Munde)
धनंजय मुंडे यांचे आरोपी वाल्मिक कराड यांच्याशी आर्थिक संबंध असल्याचे पुरावे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सादर केले होते. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही सांगितले होते. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी त्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होते. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्याबाबत काहीही निर्णय घेतला नाही. त्याबाबत भाष्य करण्याचेही टाळले. मुंडे मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहिले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना फासावर लटकावा, अशी आपण भूमिका जाहीर केली होती. त्यावर आपण ठाम आहोत. दमानिया यांनी जे काही पुरावे दिले त्याविषयी आपल्याला काहीही बोलायचे नाही. माझ्या राजीनाम्याविषयीचा निर्णय सर्वस्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. (Dhananjay Munde)
आ. संदीप क्षीरसागर यांच्या आरोपावर ते म्हणाले की, कदाचित संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळे हे संपर्कात असतील, त्यांचे संबंध असतील, त्यामुळेच क्षीरसागर यांना आंधळेविषयी अधिक माहिती असेल, मीडियाच्या मायक्रो मायक्रो कॅमेऱ्यांना जे दिसले नाही, ते क्षीरसागर यांना दिसत असल्याने मला अशी शक्यता वाटत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.(Dhananjay Munde)
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्हा राज्याच्या नकाशावर आले. मंत्री मुंडे यांचा निष्ठावंत सहकारी वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपींवर मोक्का लावण्यात आला. पण तरीही त्याला अनेक सोयी-सुविधा पुरवण्यात येत असून त्यामागे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोप जिल्ह्यातील विरोधकच नाही तर सत्ताधारीही करत आहेत. तर कृष्णा आंधळे याचे काही बरे वाईट झाल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला होता.
शहानिशा करून योग्य निर्णय : अजित पवार
अंजली दमानिया यांनी आपल्याकडे धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्याशी संबंधित काही कागदपत्रे दिली आहेत. त्याची पडताळणी सीआयडी व एसआयटीकडून केली जाईल. त्यामध्ये सत्यता आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केले असता ते म्हणाले की, आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. देशमुख यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही आग्रही आहोत. या प्रकरणाची चौकशी चालू आहे. त्याच्यात पुरावे सापडल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. कोणाचा संबंध असेल तर निश्चितपणे त्याला पाठीशी घातले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
..तर जनहित याचिका दाखल करणार : दमानिया
संतोष देशमुख हत्याकांड व वाल्मीक कराडच्या बेकायदेशीर कृत्ये, संपत्ती प्रकरणात सातत्याने आवाज उठवत असलेल्या सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून मुंडे यांचा राजीनामा घेतला जाण्याची आशा आहे. त्यांच्याकडून निर्णय झाला नाही तर आपण त्या विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे मंगळवारी सांगितले.
हेही वाचा :
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे रूजू
कुंभमेळ्याचा ४५ कोटी भाविकांचा आकडा कुठून आला?