नवी दिल्ली : आरोग्याच्या कारणास्तव जगदीप धनकड यांनी २१ जुलै रोजी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी आता त्यांचे अधिकृत शासकीय निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते अन्यत्र राहायला जाणार आहे. ‘द इंडियन एक्स्रपेस’ने हे वृत्त दिले आहे. (Dhanakad will leave govt residence)
२१ जुलै अधिकृतपणे राजीनामा दिल्यानंतर धनकड कधीच समोर आलेले नव्हते. सोमवारी (१ सप्टेंबर) ते पहिल्यांदाच शासकीय निवासस्थानातून बाहेर पडले असल्याचे सांगण्यात आले.
अधिकृत निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते कुठे जाणार याची चर्चा आणि उत्सुकत होती. मात्र ते इंडियन नॅशनल लोक दल (आयएनएलडी) प्रमुख अभय सिंग चौटाला यांच्या फार्महाऊसमध्ये स्थलांतरित होणार आहे. दक्षिण दिल्लीतील छत्तरपूर येथे चौटाला यांचे फार्महाऊस आहे. (Dhanakad will leave govt residence)
“गेल्या महिन्यापासून ते उपराष्ट्रपतींच्या अधिकृत निवासस्थानातच असून, येथे ते त्यांच्या नातेवाईक आणि जुन्या मित्रांना भेटत आहेत. आज ते डॉक्टरांना भेटण्यासाठी बाहेर पडले होते”, असे एका सूत्राने सांगितले.
“धडखड यानी सुरक्षा यंत्रणांना यासंबंधी कळवले आहे. ते संध्याकाळी छत्तरपूर एन्क्लेव्ह येथील गदाईपूर डीएलएफ फार्म्समधील एका खाजगी निवासस्थानात जाणार आहेत. त्यांचे बरेच सामान आधीच हलवण्यात आले आहे, तर अनेक घरगुती वस्तू उपराष्ट्रपतींच्या अधिकृत निवासस्थानातील फ्लॅटमध्ये हलवण्यात आल्या आहेत”, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, चौटाला यांनी धनकड त्यांच्या फार्महाऊसवर राहायला जाणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. “आमचे जुने कौटुंबिक संबंध आहेत. त्यांनी माझ्याकडे घर मागितले नव्हते तर, मी त्यांना देऊ केले”, असे चौटाला यांनी स्पष्ट केले.