Home » Blog » राजा रात्र आहे वैऱ्याची तू जाग रे

राजा रात्र आहे वैऱ्याची तू जाग रे

कन्नड, तेलगू, तामीळ, बंगाली, ओरिया या भाषांना ‘अभिजात भाषा’ हा दर्जा मिळालाय. मात्र, त्यांच्या आधी सर्व अटींची पूर्तता करून आपली मराठी दिल्ली दरबारात ताटकळत उभी आहे. त्यामागचे कारण एकच हिंदी आणि गुजराथी या भाषांच्या आधी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा त्यांना द्यावयाचा नाही!

by प्रतिनिधी
0 comments
  • दत्तप्रसाद दाभोळकर

संयुक्त महाराष्ट्राचा अमृत कलश घेऊन यशवंतराव चव्हाण मुंबईत आले. त्यावेळी सारा महाराष्ट्र आनंदात चिंब भिजून निघाला होता. यापूर्वी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्यावेळी अशी आनंदाची लहर साऱ्या महाराष्ट्रात पसरली असेल. त्याचे कारणही तसेच होते. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.’ या एकाच आवाजात सारा महाराष्ट्र पेटून उठला होता. घर, दार, मुले, बाळे विसरून १०५ जण हुतात्मा झाले होते. कोणत्याही खेड्यात जा. ‘हुतात्म्यांच्या रक्ताची शपथ तुम्हाला’ आणि ‘तुझ्या पोराबाळासाठी तुझे माग रे, राजा रात्र आहे वैऱ्याची तु जाग रे’ प्रत्येकाच्या तोंडी केवळ याच ओळी होत्या. महाराष्ट्र जात धर्म विसरला होता. केंद्रीय मंत्री पाटसकरांचा त्यांच्या मतदारसंघात पराभव करत नौशेद भरूचा याला आम्ही निवडून दिले होते- आणि अमर शेख मुसलमान आहे, असे कोणी म्हणाला असता तर तो धड अवस्थेत घरी पोचला नसता!

मुंबई तुमची, भांडी घासा आमची

मात्र त्यावेळी एक वेगळी मजेशीर गोष्ट घडत होती. आमचे गुजराथी मित्र भलतेच वैतागलेले होते. ते म्हणत, ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची’ आम्ही त्यावेळी ते हसण्यावारी नेत होतो- आज अगदी याच्या उलट ‘मुंबई नाही आमची’ हे वास्तव आपणासमोर आहे. हेअसे का झाले? ही परिस्थिती बदलता येईल का? हे असे झाले याला चार-पाच प्रमुख कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे संयुक्त महाराष्ट्र हा मराठी भाषेचा गौरव होता. ‘मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ती राज्यभाषा नसे’ ही खंत आपल्या मनात होती आणि ‘हिचे पूत्र आम्ही, हिचे पांग फेडू, हिला बैसवू वैभवाच्या शिरी’ हा आमचा निर्धार होता. मात्र, त्यानंतर आपण केले वेगळेच. आपण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालायला लागलो. या शाळेतून इंग्रजी, मराठी आणि हिंदी या तिन्ही भाषा न येणारे ‘त्रिशंकु’ तयार करतोय! त्या शाळेतल्या इंग्रजी शिकवणाऱ्या टिचर्सना पण इंग्रजी धड येत नाही ही भयावह वस्तुस्थिती आहे!

मराठी दिल्ली दरबारात ताटकळत उभी

आज आपण सारेचजण नकळत मराठीपासून दूर झालोय, मुंबई राहू देत अगदी पुणे, नाशिक आणि अनेक ठिकाणी आपणच बाजारात गेल्यावर ‘भैय्या सब्जी कैसी दी’ येथून सुरवात करतो. रिक्षात बसताना ‘भैय्या आयेगा क्या?’ म्हणून अजीजीच्या स्वरात विचारतो. दक्षिणेतील कोणत्याही राज्यात असे होत नाही. नोकरीसाठी आलेल्या लोकांना गावची भाषा किमान संवाद साधण्यापूर्ती शिकावीच लागते! गुलजार आणि अमिताभ बच्चन फार फार मोठे आहेत. मात्र, अनेक दशके मुंबईत राहून त्यांना मराठी येत नाही. ते कलकत्याला स्थायीक झाले असते तर बंगाली त्यांना अनिवार्य होती. याहूनही भयानक गोष्ट म्हणजे आपण आपल्या भाषेचा अपमान सहजपणे सहन करायला शिकलोय. कन्नड, तेलगू, तामीळ, बंगाली, ओरिया या भाषांना ‘अभिजात भाषा’ हा दर्जा मिळालाय. मात्र, त्यांच्या आधी सर्व अटींची पूर्तता करून आपली मराठी दिल्ली दरबारात ताटकळत उभी आहे. त्यामागचे कारण एकच हिंदी आणि गुजराथी या भाषांच्या आधी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा त्यांना द्यावयाचा नाही!

राडा आणि शिववडा पाव!

याहीपेक्षा दुसरी एक भयावह गोष्ट आपण लक्षात घ्यावयास हवी. मुंबई महाराष्ट्रात आली यामुळे मराठी तरुणांना मोठ्या प्रमाणात छोटे- मोठे उद्योगधंदे काढावयास आपण आर्थिक सहाय्य करून प्रवृत्त करू, असे आपणाला वाटले होते. प्रत्यक्षात झाले काय? आपण मुंबईतील मराठी तरुणांना राडा करायला आणि ‘शिवपाव वडा’ असा उद्योगधंदा एवढ्याच गोष्टी शिकवल्या! राडा करून दहशतीतून पैसा, राडा आणि पैसा यांच्याबरोबर सत्ता अशी भयानक रचना आपण निर्माण केली. त्याचवेळी आणखी एक भयावह गोष्ट आपण केली, मुंबईतून अमाप पैसा मिळत होता.

पर्जन्यछायेच्या प्रदेशात साखर कारखाने

आपण महाराष्ट्रभर उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगधंद्यांचे जाळे निर्माण करू शकलो असतो. आपण मात्र जो उद्योगधंदा करावयास आज तंत्रज्ञान आणि प्रशासन या अगदी मामुली गोष्टी झाल्या आहेत, असे साखर कारखाने काढले. ते सहकारी आहेत. शेतकऱ्यांचे आहेत, असेही दाखवले. प्रत्यक्षात सरकारकडून अनुदान म्हणून भली मोठी रक्कम पुन्हा कारखानाही चालत नाही म्हणून आणखी पैसे किंवा नंतर बँकेकडून कर्ज. आणि शेवटी या कर्जातील थोडेतरी पैसे बँकेला परत द्यावयाचे आहेत म्हणून लिलावात कारखाना काढायचा. तो आपणच नगण्य किमतीत विकत घ्यायचा! या व्यवहारात आपण आणखी एक भयावह गोष्ट केली. जगात प्रथमच पर्जन्यछायेच्या प्रदेशात आपण साखर कारखाने काढून दाखवले. रस्त्याच्या एका बाजूला पाणी पिणारा ऊस तरारलाय आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला रणरणत्या उन्हात डोक्यावर हंडे घेऊन पाण्याच्या टँकरची वाट पहात ताटकळत उभी असलेली माणसे असे चित्र आपण तयार केले.

आरक्षणाचा धगधगता प्रश्न

पण महाराष्ट्रात आज आणखी एक भयावह गोष्ट आहे. महाराष्ट्रात, ब्राम्हण, ब्राह्मणेतर चळवळ होती. नामांतराचा प्रश्न होता. त्यावेळची आंदोलने नगण्य वाटावीत असे झंजावाती ज्वालाग्राही आंदोलन घेऊन आज जरांगे पाटील उभे आहेत. वर्णव्यवस्थेत जे आमच्याखाली आहेत ते आरक्षणाचा फायदा घेऊन वर्गव्यवस्थेत आमच्याबरोबर येताहेत, त्यांना आम्ही त्यांच्यातील आरक्षण घेऊन त्यांना तेथेच अडवू असा काही प्रकार आहे का? या चर्चा आज कुचकामी आहेत. हे आंदोलन आपोआप वाढले की पैसा आणि प्रशासन देऊन, महाराष्ट्र फोडावयाचाच म्हणून दिल्लीतील एखादा चाणक्य गुप्तपणे उभा राहिला ही चर्चा आज फिजूल आहे. कारण महाराष्ट्रात जातीय दंगली घडविण्यात आल्या नाहीत. तरीसुद्धा महाराष्ट्रातील प्रमुख उद्योगधंदे आज सहजपणे गुजरात मध्ये नेण्यात ते यशस्वी झालेत. मुंबईत मराठी माणसांनी आमच्या संकुलात जागा विकत घेता येणार नाही, म्हणून ते थांबत नाहीत. मुंबईत ‘मराठी माणसंनी नोकरीसाठी अर्ज करू नये’ असे ते सहजपणे डिवचताहेत.

आज गरज आहे ‘वयम् पंचाधिकम शतम’ म्हणून मराठी माणसांनी एकत्र येण्याची आणि अमर शेख यांच्या बुलंद आवाजात-
राजा रात्र आहे वैऱ्याची तू जाग रे
तुझ्या पोराबाळांसाठी तुझे माग रे
हा संदेश घेऊन प्रत्येक खेडे, घर आणि शिवार झोपेतून जागे करण्याची!

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00