मुंबई : मुंबई महानगरपालिकेसह राज्यात ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढविणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.(CM Mahayuti)
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी महायुती व आगामी राजकारणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. भविष्यात उद्धव ठाकरे यांच्या समवेत युती करणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महायुतीचा कारभार एकमताने व सहमतीने सुरू असल्याचे सांगून ते म्हणाले की किरकोळ मतभेद असू शकतात मात्र राज्याच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्रपणे काम करत आहोत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी त्यांनी पक्ष नक्कीच एकत्रपणे लढतील त्याचबरोबर अन्य जिल्ह्यातील ज्या ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये शक्य आहे, तेथेही महायुती म्हणून निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. (CM Mahayuti)
मनसे बाबत अद्याप निर्णय नाही
राज ठाकरे आपले मित्र असले तरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना सोबत घेण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही त्या त्यावेळी त्याबाबत ठरवण्यात येईल, असे स्पष्ट करून ते म्हणाले की, राज ठाकरेंच्यासंबंधात आजतरी निर्णय झालेला नाही. त्यांचा निर्णय ते घेत असतात. ज्या त्या वेळी विचार केला जाईल, असेही फडणवीस म्हणाले.
दोघेही लाडके उपमुख्यमंत्री
तुमचे लाडके उपमुख्यमंत्री कोण?, यावर फडणवीस म्हणाले की, दोघेही माझे लाडके आहेत आणि मी पण त्यांचा लाडका आहे. त्यामुळे आम्ही लाडके उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आहोत. नाराजीनाट्य असे कोणीच करत नाही. अलीकडच्या काळामुळे, सोशल मीडियामुळे कोणत्याही गोष्टीला कसेही सांगितले जाते. माझा अनुभव असा आहे की, अजितदादा असो की एकनाथ शिंदे, दोघांच्यातही नाराजीनाट्य नाही. काही प्रश्न असतात, ते आम्ही एकत्र येऊन सोडवतो. एकनाथ शिंदे शिवसैनिक आहेत आणि शिवसैनिक हा भावनिक असतो. त्यामुळे एकनाथ शिंदे भावनिक आहेत. तर अजितदादा कामाच्या बाबतीत प्रॅक्टिकल आहेत. (CM Mahayuti)
लाडके ठाकरे कोण?
लाडके ठाकरे कोण? या प्रश्नावर फडणवीस यांनी ठाकरे असे आहेत की, त्यांना आपण लाडके म्हणायचे आणि त्यांनी आपल्याला दोडके म्हणायचे. त्यामुळे यामध्ये आपण का पडायचे, पण एक खरे सांगतो, गेल्या पाच वर्षांमध्ये माझा उद्धव ठाकरेंसोबत काहीच संबंध राहिलेला नाही. माझा राज ठाकरेंसोबतच संबंध राहिलाय. उद्धव ठाकरेंनी संबंध तोडून टाकले, म्हणजे मारामारी नाही. समोर आलो की आम्ही चांगले बोलतो, नमस्कार करतो, पण उद्धव ठाकरेंसोबत संबंध नाही. (CM Mahayuti)
..म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला, याचा एकमेव कारण असा आहे की, या संपूर्ण प्रकरणांमध्ये ज्याला मुख्य आरोपी केलेला आहे तो वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा उजवा हात आहे. वर्षानुवर्षे धनंजय मुंडे यांचे राजकारण त्यांनी सांभाळलेले आहे. म्हणून सहाजिक महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा होती की अशा प्रकारे जर नेत्यांच्या जवळचे लोक इतका क्रूर अशा प्रकारचा काम करत असतील तर नेत्यांनी काही ना काही तरी पश्चाताप म्हणून नैतिकतेच्या आधारावर अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे. चर्चेत गेल्यानंतर दोन गोष्टी क्लिअर झाल्या. एक गोष्ट क्लिअर झाली की या गुन्ह्यात धनंजय मुंडेंचं नाव नाही आणि दोन वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. धनंजय मुंडे यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिला, तर आमची चौकशीची आणि कारवाईची तयारी आहे, पण उगीच हवेत तीर मारण्यात अर्थ नाही, असे त्यांनी सांगितले.