सातारा : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या गावी दरे येथे आले आहेत. सत्तास्थापनेच्या गडबडीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना तोंड फुटले होते; पण गावी आल्यानंतर शिंदे यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे आज त्यांना कोणालाही भेटता येणार नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे.
शिंदे यांची तब्येत आधीच काहीशी ठीक नसल्याने त्यांनी गावाला मुंबईतून गावाला जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळेच मुंबईतील महायुतीची बैठकही रद्द करण्यात आली. त्यानंतर शिंदे यांनी अचानक साताऱ्यातील आपल्या दरे गावी जाण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी ते हेलिकॉप्टरने गावी पोहोचले; पण त्यांची प्रकृती अद्याप ठीक नाही. शिंदे यांना कणकणी आणि किरकोळ ताप आल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे दरे गावातच विश्रांती घेत आहेत. ऐन राजकीय घडामोडींच्या काळातच शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप जाहीर केला जात नसल्याने शिंदे नाराज असल्याचे कळते. कारण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर झाल्याशिवाय पुढची चर्चा होणार नाही, असा पवित्रा शिंदे आणि अजित पवार यांनी घेतल्याचे समजते.