Home » Blog » Champions Final : भारत तिसऱ्यांदा ‘चॅम्पियन’

Champions Final : भारत तिसऱ्यांदा ‘चॅम्पियन’

अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ४ विकेटनी मात

by प्रतिनिधी
0 comments
Champions Final

दुबई : फिरकी गोलंदाजीला रोहित शर्माच्या अर्धशतकाची जोड मिळाल्यामुळे भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेत तब्बल १२ वर्षांनी विजेतेपदावर नाव कोरले. रविवारी रंगलेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ४ विकेट आणि एक षटक राखून विजय मिळवला. न्यूझीलंडला ७ बाद २५१ धावांत रोखून भारताने ४९ षटकांत ६ बाद २५४ धावा केल्या. २००२ आणि २०१३ नंतर भारताचे हे तिसरे चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद आहे. (Champions Final)

विजेतेपदासाठी २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने आश्वासक सुरुवात केली. शुभमन सुरुवातीला अडखळत खेळत असताना रोहितने धावफलक हलता ठेवण्याची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेत न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. भारताच्या ५० धावा धावफलकावर झळकल्या, तेव्हा त्यामध्ये रोहितचा वाटा ३९ धावांचा होता. या जोडीने भारताला १०५ धावांची सलामी दिली. एकोणिसाव्या षटकात सँटनरच्या गोलंदाजीवर ग्लेन फिलिप्सने शुभमनचा अप्रतिम झेल पकडला. शुभमन ५० चेंडूंमध्ये ३१ धावा करून बाद झाला. पुढच्याच षटकात ब्रेसवेलने विराट कोहलीला पायचीत केले. कोहली केवळ एकच धाव करू शकला. (Champions Final)

या दोन विकेटमुळे भारताच्या धावगतीला ब्रेक लागला. रोहितलाही काही वेळ फटकेबाजीला मुरड घालावी लागली. काही षटके अशी गेल्यानंतर पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित रवींद्रच्या गोलंदाजीवर यष्टिचित झाला. रोहितने ८३ चेंडूंमध्ये ७ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावांची खेळी केली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कर्णधाराने केलेली ही सौरव गांगुलीनंतरची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी ठरली. गांगुलीने २०००च्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात ११७ धावा फटकावल्या होत्या.

श्रेयस अय्यर व अक्षर पटेल यांनी चौथ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी रचून भारताचा पाठलाग पुन्हा रुळावर आणला. सँटनरने श्रेयसला बाद करून ही जोडी फोडली. श्रेयसने ६२ चेंडूंमध्ये प्रत्येकी २ चौकार व षटकारांसह ४८ धावा केल्या. ब्रेसवेलने अक्षरला २९ धावांवर माघारी पाठवले. हार्दिकही १८ धावा करून जेमिसनचा बळी ठरला. त्यानंतर, लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जडेजाने ४९ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार खेचून भारताचा विजय साकारला. राहुलने नाबाद ३४, तर जडेजाने नाबाद ९ धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे ब्रेसवेल व सँटनर यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद २५१ धावा केल्या. भारताच्या फिरकीपटूंनी प्रभावी गोलंदाजी करून न्यूझीलंडच्या धावसंख्येला वेसण घातली. रोहित शर्मा वन-डे क्रिकेटमध्ये सलग बाराव्यांदा नाणेफेक हरला. वन-डेमध्ये सर्वाधिकवेळा सलग नाणेफेक हरण्याबाबत त्याने वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराशी बरोबरी केली. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. विल यंग आणि रचिन रवींद्रने सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजीवर आक्रमण चढवत न्यूझीलंडला ८ षटकांमध्ये ५७ धावांची सलामी दिली. विशेषत: रवींद्रने भारताच्या वेगवान गोलंदाजांना लक्ष्य केल्यामुळे रोहितने सहाव्या षटकामध्येच फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला पाचारण केले. वरुणनेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत आठव्या षटकामध्ये यंगला बाद करून न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. अकराव्या षटकात कुलदीपने रवींद्रचा त्रिफळा उडवला. भारताविरुद्धच्या मागील सामन्यात ८१ धावा फटकावणारा केन विल्यमसन यावेळी फक्त ११ धावाच करू शकला. कुलदीपने स्वत:च्याच गोलंदाजीवर त्याचा झेल घेतला. त्यानंतर, जडेजाने टॉम लॅथमला पायचीत पडकले. (Champions Final)

न्यूझीलंडची अवस्था चोविसाव्या षटकामध्ये ४ बाद १०८ अशी होती. या मोक्याच्या वेळी डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्सने पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. वरुणने ३४ धावा करणाऱ्या फिलिप्सला त्रिफळाचीत करून न्यूझीलंडची पाचवी विकेट काढली. त्यानंतर मिचेलने मायकेल ब्रेसवेलच्या साथीने संघाचे द्विशतक धावफलकावर लावले. अखेरच्या पाच षटकांमध्ये फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात मिचेल बाद झाला. त्याने १०१ चेंडूंमध्ये ३ चौकारांसह ६३ धावा केल्या. ब्रेसवेलने अखेरपर्यंत नाबाद राहात न्यूझीलंडला अडीचशेपार पोहचवले. ब्रेसवेलने ४० चेंडूंमध्ये ३ चौकार व २ षटकार लगावून नाबाद ५३ धावांची खेळी केली. भारतातर्फे वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. (Champions Final)

धावफलक : न्यूझीलंड विल यंग पायचीत गो. वरुण १५, रचिन रवींद्र त्रि. गो. कुलदीप ३७, केन विल्यमसन झे. व गो. कुलदीप ११, डॅरेल मिचेल झे. शर्मा गो. शमी ६३, टॉम लॅथम पायचीत गो. जडेजा १४, ग्लेन फिलिप्स त्रि. गो. वरुण ३४, मायकेल ब्रेसवेल नाबाद ५३, मिचेल सँटनर धावबाद ८, नॅथन स्मिथ नाबाद ०, अवांतर १६, एकूण ५० षटकांत ७ बाद २५१.

बाद क्रम १-५७, २-६९, ३-७५, ४-१०८, ५-१६५, ६-२११, ७-२३९.

गोलंदाजी महंमद शमी ९-०-७४-१, हार्दिक पंड्या ३-०-३०-०, वरुण चक्रवर्ती १०-०-४५-२, कुलदीप यादव १०-०-४०-२, अक्षर पटेल ८-०-२९-०, रवींद्र जडेजा १०-०-३०-१.

भारत रोहित शर्मा यष्टि. लॅथम गो. रवींद्र ७६, शुभमन गिल झे. फिलिप्स गो. सँटनर ३१, विराट कोहली पायचीत गो. ब्रेसवेल १, श्रेयस अय्यर झे. रवींद्र गो. सँटनर ४८, अक्षर पटेल झे. ऑरुर्के गो. ब्रेसवेल २९, लोकेश राहुल नाबाद ३४, हार्दिक पंड्या झे. व गो. जेमिसन १८, रवींद्र जडेजा नाबाद ९, अवांतर ८, एकूण ४९ षटकांत ६ बाद २५४.

बाद क्रम १-१०५, २-१०६, ३-१२२, ४-१८३, ५-२०३, ६-२४१.

गोलंदाजी काइल जेमिसन ५-०-२४-१, विल ऑरुर्के ७-०-५६-०, नॅथन स्मिथ २-०-२२-०, मिचेल सँटनर १०-०-४६-२, रचिन रवींद्र १०-१-४७-१, मायकेल ब्रेसवेल १०-१-२८-२, ग्लेन फिलिप्स ५-०-३१-०.

हेही वाचा : 

‘दिलबहार’ उपांत्य फेरीत दाखल

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00