श्रीनगर : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू केली असताना, सोमवारी (२८ जुलै) श्रीनगरजवळ झालेल्या चकमकीत तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. या तिघांपैकी दोघे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी होते, असे सांगण्यात येत आहे. (Three terrorists killed)
यांपैकी लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी सुलेमान शाह हा २२ एप्रिल रोजी देशाला हादरवून टाकणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये तोही असल्याची पुष्टी सुरक्षा सूत्रांनी केली आहे. आजच्या ऑपरेशन महादेव नावाच्या मोहिमेत अबू हमजा आणि यासिर या इतर दोन दहशतवाद्यांना निष्क्रिय करण्यात आले. यासीर हा देखील पहलगामच्या खुन्यांमध्ये असल्याचे मानले जाते. आजच्या संयुक्त कारवाईत लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे सुरक्षा दल सहभागी होते. (Three terrorists killed)
सुलेमान पाकिस्तानी सैन्याच्या सेवेत होता. त्याला हाशिम मुसा म्हणूनही ओळखले जात असे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, जम्मू-काश्मीर पोलिसांनी सुलेमानबद्दल माहिती देणाऱ्याला २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
दरम्यान, सोमवारी (२८ जुलै) लष्कराने सांगितले की, दारा श्रीनगर जिल्ह्यातील लिडया मैदानी भागात दहशतवाद्यांचा एक गट दिसला, त्याने गोळीबार केला. (Three terrorists killed)
लष्कराच्या चिनार कॉर्प्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, लिडवास भागात संपर्क स्थापित झाला आहे. या कारवाईला ऑपरेशन महादेव असे सांकेतिक नाव देण्यात आले आहे.
“ऑपरेशन सुरू आहे,” असे लष्कराने सांगितले.
सोमवारी (२८ जुलै) सकाळी पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने दाराच्या वरच्या भागात लिडवासमध्ये शोधमोहीम सुरू केली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती.
लष्कराने सांगितले की, “लिडवास परिसरात झालेल्या गोळीबारात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे आणि ही कारवाई अजूनही सुरू आहे.”
हेही वाचा :
भाजप मंत्र्याविरोधात ‘एसआयटी’
देशाचा उल्लेख भारत असाच हवा : भागवत