मुंबई : भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा दुसऱ्यांदा पिता बनला आहे. रोहितची पत्नी रितिका सजदेहने शनिवारी मुलाला जन्म दिला. रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पिता बनल्याची बातमी जगाला सांगितली. रोहित व रितिकाचे हे दुसरे अपत्य असून त्यांना पाच वर्षांची मुलगी आहे. दरम्यान, पत्नीच्या प्रसुतीमुळे रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पर्थ येथील खेळण्याबाबत अनिश्चितता होती. आता तो पहिल्या कसोटीपूर्वी संघात रूजू होईल का, याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. (Rohit Sharma)
ताज्या बातम्या
जोहान्सबर्ग, वृत्तसंस्था : संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या झंझावाती नाबाद शतकांच्या जोरावर भारताने मालिकेतील चौथ्या व अखेरच्या टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १३५ धावांनी दणदणीत मात केली. या विजयासह भारताने ही मालिका ३-१ अशी जिंकली.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधार सूर्यकुमारचा निर्णय भारतीय फलंदाजांनी सार्थ ठरवला. संजू आणि अभिषेक शर्मा यांनी पॉवर प्लेमध्येच भारताला ७३ धावांची सलामी दिली. अभिषेक १८ चेंडूंमध्ये २ चौकार व ४ षटकारांसह ३६ धावा करून बाद झाला. त्यानंतर, संजू आणि तिलक यांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद २१० धावांची भागीदारी रचत भारताला पावणेतीनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. संजूने मालिकेतील दुसरे आणि कारकिर्दीतील तिसरे टी-२० शतक झळकावताना ५६ चेंडूंमध्ये ६ चौकार व ९ षटकारांसह नाबाद १०९ धावा फटकावल्या. तिलकने मिळालेल्या दोन जीवदानांचा पुरेपूर लाभ घेत सलग दुसरे शतक साजरे केले. तो ४७ चेंडूंमध्ये ९ चौकार १० षटकारांसह १२० धावांवर नाबाद राहिला.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीच्या तीन षटकांमध्येच चार विकेट गमावल्या. त्यानंतर, ट्रिस्टन स्टब्ज, डेव्हिड मिलर यांनी ८६ धावांची भागीदारी रचून थोडेफार प्रयत्न केले. परंतु, महाकाय आव्हानापुढे त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. अखेर आफ्रिकेचा डाव १४८ धावांत संपुष्टात आला. भारतातर्फे अर्शदीप सिंगने ३, तर वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेलने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तिलक वर्मा सामनावीर व मालिकावीर ठरला.
संक्षिप्त धावफलक : भारत – २० षटकांत १ बाद २८३ (संजू सॅमसन नाबाद १०९, तिलक वर्मा नाबाद १२०, अभिषेक शर्मा ३६, ल्युथो सिम्पाला १-५८) विजयी विरुद्ध दक्षिण आफ्रिका – १८.२ षटकांत सर्वबाद १४८ (ट्रिस्टन स्टब्ज ४३, डेव्हिड मिलर ३६, मार्को यान्सन नाबाद २९, अर्शदीप सिंग ३-२०, अक्षर पटेल २-६).
विक्रम-पराक्रम
- या सामन्यामध्ये भारताने डावात एकूण २३ षटकार ठोकले. भारतीय संघाने ‘टी-२०’च्या एका डावामध्ये ठोकलेले हे सर्वाधिक षटकार ठरले. यापूर्वी, मागील महिन्यात बांगलादेशविरुद्ध भारताने डावात २२ षटकार ठोकले होते.
ग्रॉस आयलेट; वृत्तसंस्था : इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेत शुक्रवारी तीन विकेटनी विजय साकारला. इंग्लंडचा हा सलग तिसरा विजय असून याबरोबरच इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजला ८ बाद १४५ धावांत रोखले. विंडीजचा निम्मा संघ पॉवर-प्लेमध्ये ३७ धावांत गारद झाला होता. त्यानंतर कर्णधार रोव्हमन पॉवेल आणि रोमारिओ शेफर्ड यांनी सहाव्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी रचत विंडीजचा डाव सावरला. पॉव्हेलने ४१ चेंडूमध्ये ३ चौकार व ४ षटकारांसह ५४, तर शेफर्डने ३० धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर पुन्हा विंडीजच्या धावसंख्येस ब्रेक लागला. इंग्लंडकडून साकिब महमूद आणि जेमी ओव्हर्टन यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्याही पॉवर-प्लेमध्ये ३ विकेट गेल्या होत्या, मात्र विल जॅक्स, सॅम करन आणि लियाम लिव्हिंगस्टन यांनी महत्त्वपूर्ण खेळी करून इंग्लंडचा विजय निश्चित केला. करनने २६ चेंडूंमध्ये ३ चौकार व एका षटकारासह ४१, तर लिव्हिंगस्टनने २८ चेंडूंमध्ये प्रत्येकी २ चौकार व षटकारांसह ३९ धावा फटकावल्या. विंडिजच्या अकिल होसेनने ४ विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक : वेस्ट इंडिज – २० षटकांत ८ बाद १४५ (रॉव्हमन पॉवेल ५४, रोमारिओ शेफर्ड ३०, अल्झारी जोसेफ नाबाद २१, साकिब महमूद ३-१७, जेमी ओव्हरटन ३-२०) पराभूत विरुद्ध इंग्लंड – १९.२ षटकांत ७ बाद १४९ (सॅम करन ४१, लियाम लिव्हिंगस्टन ३९, विल जॅक्स ३२, अकिल होसेन ४-२२, गुडकेश मोती १-२२).
वृत्तसंस्था : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. साऊथी घरच्या मैदानावर होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतून क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. (Tim Southee)
न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज टीम साऊथीने डिसेंबर महिन्यात सेडॉन पार्कवर होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या मालिकेनंतर निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (NZC) ने माहिती दिली आहे. परंतु, जर न्यूझीलंडचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरला, तर तो पुढील वर्षी होणाऱ्या फायनलमध्ये न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
टीम साऊथीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०४ कसोटी सामन्यात ३८५ विकेट घेतल्या आहेत. न्यूझीलंडकडून कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज आहे. यासह त्याने वन-डे क्रिकेटमध्ये २२१ विकेट घेतल्या आहेत. तर टी-२० क्रिकेटमध्ये १६४ विकेट घेतल्या आहेत.
आपल्या कारकिर्दीबाबत बोलताना साऊथी सौदी म्हणाला, ‘न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करण्याचे लहानपणी स्वप्न पाहिले होते. १८ वर्षे न्यूझीलंड संघासाठी खेळणे हा सर्वात मोठा सन्मान आहे. पण, खेळापासून दूर जाण्याची ही योग्य वेळ आहे.
स्विंग गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या साऊथी २००८ साली झालेल्या अंडर-१९ विश्वचषकात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. या स्पर्धेत त्याने १७ विकेट घेतल्या होत्या. न्यूझीलंड-भारत यांच्यातील तीन कसोटी सामन्यांमध्ये साऊथीने मोलाची भूमिका बजावली होती.
न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्कॉट वेनिंक यांनी साऊथीचे आधुनिक न्यूझीलंड क्रिकेटचा एक दिग्गज खेळाडू म्हणून वर्णन केले होते, आणि त्याच्या १८ वर्षाच्या योगदानाचे कौतुक केले. पुढे ते म्हणाले की, साऊथी संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. तो महान खेळाडूंपैकी एक म्हणून स्मरणात राहील,’ (Tim Southee)
२०२१ साली झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत न्यूझीलंडला विजय बनवण्यास साऊथीने महत्वाची भूमिका बजावली होती. साऊथीचे कौतुक करताना न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, साऊथी आमच्यासाठी महत्वाचा खेळाडू आहे. त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी न्यूझीलंडसाठी इंग्लंडविरुद्धची मालिका खूप महत्त्वाची आहे.
साऊथीची कारकिर्द
सौदीने १०४ कसोटीत ३८५ विकेट घेतल्या आहेत. ६४ धावांत सात बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने १५ वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याची सरासरी २९.८९ होती. तर स्ट्राइक रेट ५९.९५ होता. याशिवाय त्याने १६१ एकदिवसीय सामन्यात २२१ विकेट्स आणि १२५ टी-२० मध्ये १६४ विकेट घेतल्या आहेत. सौदीने २००८ मध्ये मॅक्लीन पार्क येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. आता त्याच संघाविरुद्ध तो आपल्या कसोटी कारकिर्दीचा शेवट करणार आहे.
New Zealand seamer Tim Southee to retire from Tests after England series
Read @ANI Story | https://t.co/tKBtLPh0GW#TimSouthee #retirement #NewZealand #NZvENG #Tests pic.twitter.com/OjkFLeakqQ
— ANI Digital (@ani_digital) November 15, 2024
हेही वाचा :
सेंच्युरियन, वृत्तसंस्था : तिलक वर्माचे नाबाद शतक आणि त्याला अभिषेक वर्माने दिलेली अर्धशतकी साथ यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ११ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या अंगलट आला. भारताचा सलामीवीर संजू सॅमसन पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाल्यानंतर तिलक आणि अभिषेक यांनी आफ्रिकेच्या गोलंदाजीवर आक्रमण चढवले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी रचली. अभिषेक २५ चेंडूंमध्ये ३ चौकार व ५ षटकारांसह ५० धावा करून बाद झाला. तिलकने अखेरपर्यंत नाबाद राहत भारताला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. तिलकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलेवहिले शतक झळकावताना ८ चौकार व ७ षटकारांसह नाबाद १०७ धावांची खेळी केली.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत ७ बाद २११ धावांपर्यंतच मजल मारता आली. आफ्रिकेकडून मार्को यान्सनने १७ चेंडूंमध्ये ४ चौकार व ५ षटकारांसह ५४, तर हेन्रिक क्लासेनने २२ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ४१ धावा करून विजयासाठी प्रयत्न केले. मात्र अर्शदीपने या दोघांना बाद करून आफ्रिकेच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या. अर्शदीपने ३७ धावांत ३ विकेट घेतल्या.
विक्रम- पराक्रम
- भारताने या वर्षी आठव्यांदा ‘टी-२०’त दोनशे धावांचा टप्पा पार केला असून, याबरोबरच भारत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक वेळा दोनशे धावा करणारा संघ ठरला. भारताने आपलाच मागील वर्षीचा विक्रम मागे टाकला असून २०२३ मध्ये भारताने सात वेळा दोनशेहून अधिक धावा केल्या होत्या.
- तिलक वर्मा हा भारताचा आंतरराष्ट्रीय टी-२० मधील बारावा शतकवीर ठरला. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकवीर भारताचे असून, त्याखालोखाल न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी सहा शतकवीर आहेत.
- तिलक वर्मा हा भारताचा दुसरा सर्वांत तरुण टी-२० शतकवीर ठरला. त्याने २२ वर्षे ५ दिवस इतके वय असताना शतक झळकावले. भारतातर्फे सर्वांत तरुण शतकवीराचा विक्रम यशस्वी जैस्वालच्या नावावर असून त्याने २१ वर्षे २७९ दिवस इतके वय असताना शतक ठोकले होते.
- या सामन्यातील तीन विकेटसह अर्शदीप सिंगच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ९२ विकेट झाल्या असून, तो भारताचा सर्वाधिक टी-२० विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने ५९ सामन्यांत ही कामगिरी करताना भुवनेश्वर कुमारला (८७ सामन्यांत ९० विकेट) मागे टाकले.
संक्षिप्त धावफलक : भारत – २० षटकांत ६ बाद २१९ (तिलक वर्मा नाबाद १०७, अभिषेक शर्मा ५०, हार्दिक पंड्या १८, अँडाईल सॅमिलाने २-३४, केशव महाराज २-३६) विजयी विरुद्ध दक्षिण आफ्रिका – २० षटकांत ७ बाद २०८ (मार्को यान्सन ५४, हेन्रिक क्लासेन ४१, एडन मार्क्रम २९, अर्शदीप सिंग ३-३७, वरुण चक्रवर्ती २-५४).
मुंबई : भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रंगणारी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका अवघ्या दहा दिवसांवर आली असली, तरी अद्याप भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याबाबत स्पष्टता नाही. दरम्यान, रोहित सध्या मुंबईत रिलायन्स कॉर्पोरेट पार्क येथे सराव करत आहे.
मालिकेतील पहिली कसोटी पर्थ येथे रंगणार असून भारतीय संघाने बुधवारी पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर सराव सुरू केला. तथापि, रोहित या कसोटीमध्ये खेळण्याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. रोहितने वैयक्तिक कारणास्तव सुट्टी घेतली आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी रोहित पहिल्या कसोटीत खेळण्याची आशा व्य्क्त केली होती. तथापि, तसे न घडल्यास जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करेल आणि लोकेश राहुल व अभिमन्यू ईश्वरन यांच्यापैकी एकजण रोहितऐवजी सलामीस फलंदाजी करेल, असेही गंभीर यांनी स्पष्ट केले होते.
पर्थ; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाने आजपासून (दि.१३) सरावाला सुरुवात केली. पर्थ येथे या मालिकेतील पहिला सामना रंगणार असून दोन दिवसांपूर्वीच भारतीय खेळाडू येथे दाखल झाले होते. तथापि, या सरावाबाबत गोपनीयता बाळगण्यात आली असून नेट्सभोवती पडदे लावण्यात आले आहेत. (border gavaskar trophy)
भारताचे काही खेळाडू मंगळवारी स्टेडियमवर सरावासाठी आले होते. रिषभ पंत, यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल यांनी सुमारे तासभर फलंदाजीचा सराव केला. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांसारख्या अनुभवी खेळाडूंनी मात्र सरावापासून दूर राहणे पसंत केले. बुधवारी मात्र कोहली सरावास उपस्थित होता. ऑप्टस स्टेडियमवर पहिल्या कसोटीसाठी बनवण्यात येणारी खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजीस पूरक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, जैस्वालसह अन्य भारतीय फलंदाजांनी मुख्यतः उसळत्या चेंडूंवर फलंदाजीचा सराव केला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघामध्ये विशेषतः गोलंदाजी आघाडीमध्ये नवोदित खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळेच, बुमराह, अश्विन, जडेजा या अनुभवी गोलंदाजांवरील जबाबदारी वाढली असून बुधवारी या तिघांनीही नेट्समध्ये गोलंदाजी केली. पर्थ येथील कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
कोल्हापूर; प्रतिनिधी : अकोला येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले. (Shivaji University)
या युवा महोत्सवांमध्ये नृत्य, नाट्य, ललित कला, संगीत आणि वाङ्मय या कलाप्रकारात एकूण २९ स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता. यामध्ये शिवाजी विद्यापीठाने भरघोस यश मिळविले. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी इंद्रधनुष्य युवा महोत्सवांमध्ये सर्वसाधारण उपविजेतेपद तसेच संगीत विभागातील सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. एकूण १३ बक्षिसे शिवाजी विद्यापीठाने मिळवली आहेत. (Shivaji University)
शिवाजी विद्यापीठातील सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यातील निवडक ४२ विद्यार्थी, सात व्यावसायिक साथीदार, दोन संघ व्यवस्थापक, प्रशासकीय सेवक, सांस्कृतिक समन्वयक, संचालक विद्यार्थी विकास असा एकूण ५५ सदस्यांचा संघ सहभागी झाला होता.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील. व्यवस्थापन परिषद सदस्य व युवा महोत्सव समिती सदस्य डॉ. आर. डी. ढमकले, स्वागत परुळेकर, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, माजी संचालक डॉ. पी. टी. गायकवाड, संचालक डॉ. टी. एम. चौगले, सांस्कृतिक समन्वयक दीपक बिडकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कला विभागासाठी बबन माने, संग्राम भालकर, नृत्य विभागासाठी गणेश इंडीकर, आकाश लिगाडे, थिएटर विभागासाठी शंतनू पाटील, संदीप जंगम, मयुरेश पाटील, संगीत विभागासाठी ऋषिकेश देशमाने, नितीन शिंदे, सुमंत कुलकर्णी, चैतन्य देशपांडे आणि वांड्मय विभागासाठी प्रमोद पाटील यांनी मार्गदर्शन केले. या महोत्सवासाठी टीम मॅनेजर म्हणून हेमंत रकटे आणि डॉ. उज्वला बिरजे यांनी तर विद्यार्थी विकास विभागाचे कर्मचारी विजय इंगवले, सौ. सुरेखा आडके यांचे सहकार्य लाभले.
चेन्नई : भारताचा युवा बुद्धिबळपटू अरविंद चिदंबरमने चेन्नई ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या अखेरच्या फेरीपर्यंत विजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळाली. अरविंदने अगोदर पऱ्हम मॅगसुदलूला पराभूत करून विजेतेपदासाठी दावेदारी सांगितली. अरविंदसह लिव्हॉन अरॉनियन आणि अर्जुन एरिगैसी हे बुद्धिबळपटूही गुणतक्त्यात संयुक्तरीत्या प्रथम स्थानावर असल्याने विजेतेपदाकरिता टायब्रेकर लढती खेळवण्यात आल्या. या टायब्रेकर लढतींमध्ये अरविंदने अन्य दोन बुद्धिबळपटूंवर मात करून विजेतेपद निश्चित केले. या विजेतेपदासह अरविंदने २७०० एलो रेटिंग प्राप्त करणाऱ्या बुद्धिबळपटूंमध्ये स्थान पटकावले असून, अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. यापूर्वी अरविंदने २०१८ आणि २०१९ या सलग दोन वर्षी राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद पटकावले होते. (Aravindh Chithambaram)
शारजा, वृत्तसंस्था : रहमानुल्ला गुरबाझचे शतक आणि अझमतुल्ला ओमरझाईच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात ५ विकेटनी विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्तानने ही मालिका २-१ अशी जिंकली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ५० षटकांत ८ बाद २४४ धावा केल्या. सुरुवातीच्या विकेट झटपट गेल्यामुळे बांगलादेशची अवस्था पंधराव्या षटकात ४ बाद ७२ अशी झाली होती. तथापि, महमदुल्ला आणि कर्णधार मेहदी हसन मिराझ यांनी पाचव्या विकेटसाठी १४५ धावांची भागीदारी रचत बांगलादेशला दोनशेपार मजल मारून दिली. बांगलादेशचा मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज महमदुल्लाने ९८ चेंडूंमध्ये ७ चौकार व ३ षटकारांसह ९८ धावांची खेळी केली. त्याचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले. कर्णधार मेहदी हसन मिराझने ४ चौकारांसह ११९ चेंडूंमध्ये ६६ धावा करून त्याला साथ दिली. अफगाणिस्तानकडून ओमरझाईने ३७ धावांत ४ विकेट घेतल्या.
बांगलादेशचे आव्हान अफगाणिस्तानने ४८.२ षटकांत ५ विकेटच्या मोबदल्यात पार केले. अफगाणिस्तानचा सलामीवीर गुरबाझने ५ चौकार व ७ षटकारांसह १२० चेंडूंमध्ये १०१ धावा फटकावल्या. त्याचे हे आठवे वन-डे शतक ठरले. त्याने ओमरझाईसोबत शतकी भागीदारीही रचली. ओमरझाईने ७७ चेंडूंमध्ये ३ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७० धावा केल्या. गुरबाझ बाद झाल्यानंतर ओमरझाईने महंमद नबीच्या साथीने अफगाणिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश – ५० षटकांत ८ बाद २४४ (महमदुल्ला ९८, मेहदी हसन मिराझ ६६, सौम्य सरकार २४, अझमतुल्ला ओमरझाई ४-३७, महंमद नबी १-३७) पराभूत विरुद्ध अफगाणिस्तान – ४८.२ षटकांत ५ बाद २४६ (रहमानुल्ला गुरबाझ १०१, अझमतुल्ला ओमरझाई नाबाद ७०, महंमद नबी नाबाद ३४, नाहिद राणा २-४०, मुस्तफिझूर रहमान २-५०).