कोल्हापूर : प्रतिनिधी : हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशभराला पुढील सात दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा येथील किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्र, गुजरातमध्ये पुढील सात दिवस जोरदार पावसाचे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान सोमवारी सकाळपासून मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पावसाच्या सरी कोसळत असल्याने नद्यांना पूर आला आहे. मुंबईत जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काही ठिकाणी शाळांना सुट्ट्या दिल्या आहेत. (Heavy rain warning in Maharashtra)
हवामान विभागाने पुढील सात दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य भारतावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण, मुंबई, मुंबई उपनगर आणि मराठवाड्यातील काही भाग येथे १८ आणि १९ ऑगस्ट रोजी जारदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, कोकणातील सर्वच जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव आणि लातूर येथेही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मराठवाडा आणि खान्देशात मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. (Heavy rain warning in Maharashtra)
पश्चिम मध्य आणि त्या लगतच्या उत्तर-पश्चिम बंगाल खाडी आणि उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्या लगतच्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. १८ आणि १९ ऑगस्टपर्यंत या भागात अशीच स्थिती राहणार असून १९ ऑगस्टला दक्षिण ओडिशा, उत्तर आंध्रप्रदेशच्या किनारी भागात प्रवेश करण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरातमधील सौराष्ट्र येथे आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत दादर, कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर, गोरेगाव, विलेपार्ले, सांताक्रूझसह उपनगरातील सर्व भागात पाऊस सुरू झाला आहे. दादर स्टेशन परिसरामध्ये पाणी साचले आहे. पाण्यातून वाट काढत प्रवासी आणि वाहन चालक आपला मार्ग गाठत आहे. महापालिकेकडून पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बीएमसी कर्मचारी पंपिंग मशीनद्वारे अंधेरी सबवेमधून पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पावसाचा परिणाम अंधेरी सबवेमध्ये दिसून आला. अंधेरी सबवे मध्ये पाणी साचल्याने सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. हवामान विभागाने मुंबईला आज येलो अलर्ट जारी केला आहे. आज दिवसभर जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Heavy rain warning in Maharashtra)