नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.६) राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा मंडळाला नीट-पीजी परीक्षा ३ ऑगस्ट २०२५ रोजी घेण्याची परवानगी दिली. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने नीट परीक्षा घेण्यासाठी ३ ऑगस्ट २०२५ पर्यंत वेळ वाढवण्यासाठी एनबीएने दाखल केलेल्या अर्जाला मान्यता दिली. (NEET-PG exam)
३० मे रोजी, सर्वोच्च न्यायालयाने एनबीएला नीट-पीजी २०२५ परीक्षा दोन शिफ्टऐवजी एकाच शिफ्टमध्ये घेण्याचे आदेश दिला. न्यायालयाने सुरुवातीला नियोजित तारखेला १५ जून २०२५ रोजी परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. त्याच वेळी, न्यायालयाने एनबीए ला वेळ वाढवण्याची परवानगी दिली होती.
एनबीएने ३ जून रोजी, परीक्षेसाठी वेळ वाढवण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला , ज्यामध्ये असे म्हटले होते की एकाच वेळी परीक्षा घेण्यासाठी केंद्रांची संख्या दुप्पट ४५० वरून ९०० अशी दुप्पट वाढवावी लागणार आहे. तसेच सुरक्षा व्यवस्था करावी लागेल. एनबीए ने असेही म्हटले आहे की, त्यांच्या तंत्रज्ञान भागीदार असलेल्या टीसीएस च्या मते,३ ऑगस्ट ही नीट परीक्षा आयोजित करण्यासाठी सर्वात जवळची उपलब्ध तारीख आहे. (NEET-PG exam)
आजच्या सुनावणीदरम्यान, खंडपीठाने सुरुवातीला एनबीए ला प्रश्न विचारला आणि विचारले की तीन ऑगस्टपर्यंत वेळ का हवा आहे. एनबीए च्या वकिलांनी स्पष्ट केले की सुरुवातीला ही परीक्षा अडीच लाखांहून अधिक उमेदवारांसह ४५० केंद्रांवर घेण्याचा प्रस्ताव होता. न्यायालयाने एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याचे निर्देश दिले असल्याने, केंद्रांची संख्या दुप्पट करावी लागेल. वकिलांनी सांगितले की केंद्रे ओळखण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी वेळ लागेल. त्यानंतर, उमेदवारांना निवड करण्यासाठी केंद्रांची माहिती देणे आवश्यक आहे. ते म्हणाले की ही एक वेळखाऊ प्रक्रिया आहे. (NEET-PG exam)
न्यायमूर्ती मिश्रा यांनी . “तुम्हाला तीन ऑगस्टपर्यंत वेळ हवा आहे? इतका वेळ का?”, असे विचारले. “तुम्ही प्रक्रिया सुरूही केलेली नाही. ३० मे रोजी आदेश देण्यात आला होता. त्यानंतर तुम्ही काय केले? हा विलंब होत आहे. तुम्हाला दोन महिने का हवे आहेत?” न्यायमूर्ती मसीह यांनी विचारले. एनबीईच्या वकिलांनी टीसीएसने पाठवलेल्या पत्राचा संदर्भ दिला, ज्यानुसार परीक्षा फक्त तीन ऑगस्ट रोजीच घेता येते. केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल केएम नटराज यांनीही बाजू मांडताना सांगितले की, तीन ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय अनेक उच्चस्तरीय बैठकींनंतर घेण्यात आला.
खंडपीठाने आपल्या आदेशात असे निरीक्षण नोंदवले की एनबीईची विनंती प्रामाणिक होती यावर त्यांचे समाधान झाले आणि त्यांनी ३ ऑगस्ट २०२५ रोजी परीक्षा घेण्याची परवानगी दिली. खंडपीठाने स्पष्ट केले की यापुढे कोणताही वेळ वाढवला जाणार नाही. (NEET-PG exam)