Home » Blog » Book Publish: स्त्रियांनी ज्ञानार्जन केल्यास भविष्य आश्वासक

Book Publish: स्त्रियांनी ज्ञानार्जन केल्यास भविष्य आश्वासक

‘गुटेनबर्गच्या सावल्या’ पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

by प्रतिनिधी
0 comments
book publish

कोल्हापूर : मानवी समाजातल्या धर्मांमध्ये स्त्रियांप्रती भेदभाव केला आहे. त्यांना दुय्यम स्थान देऊन कमी लेखले आहे. पण ग्रंथानी त्यांना समानतेचा, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात हे अधिकार अधिक विस्तारत गेले. स्त्रिया शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आल्याने समाजाची पर्यायाने देशाची सर्वांगीण प्रगती होत आहे. आज ज्ञानाला अधिक महत्व प्राप्त झाले असून स्त्रियांनी ज्ञानार्जन केल्यास त्यांचे भविष्य आश्वासक असेल, असे मत माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे यांनी व्यक्त केले.(Book Publish)

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत कमला कॉलेज, कोल्हापूर येथे ‘गुटेनबर्गच्या सावल्या’ या प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या माणिकराव साळुंखे बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्राध्यापक व जेष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, मुक्त विद्यापीठाचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. आर. व्ही.कुलकर्णी व भाग्यश्री प्रकाशनाच्या प्रकाशिका भाग्यश्री पाटील-कासोटे उपस्थित होते.(Book Publish)

कार्यक्रमाच्या सुरूवातीस प्रास्ताविक व पुस्तकामागची भूमिका लेखक प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनी मांडली.

ज्येष्ठ  समीक्षक, प्रा. डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, ‘लेखकाने निवडलेला विषय अत्यंत वेगळा आहे. प्रकाशक म्हणून सांस्कृतिक क्षेत्रात आपली नाममुद्रा उमटविणाऱ्या तेवीस प्रकाशिका यांच्या वाटचालीचा विस्तृत आढावा  पुस्तकात घेण्यात आला आहे. खडतर प्रवास करत कर्तृत्वाचा आलेख उंचावत नेणाऱ्या प्रवासाची नोंद या पुस्तकात आहे. पुरुषसत्ताक समाजात स्त्रियांच्या कामगिरीची दाखल अपवादाने घेण्यात येते. प्रगतशील विचार समाजापर्यंत पोहोचावेत, अशी या स्त्रियांची भूमिका दिसून येते. पुस्तक प्रकाशक यांच्यावर संस्कृतीला पुढे घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी असते.’(Book Publish)

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील म्हणाले, सावित्रीबाई फुले यांना स्त्री शिक्षणासाठी खूप त्रास झाला, पण आज अनेक सावित्रीच्या लेकी आपला ठसा प्रत्येक क्षेत्रात उमटवत आहेत. सूत्रसंचालन डॉ. सुजय पाटील यांनी केले. आभार भाग्यश्री पाटील कासोटे यांनी मानले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00