कोल्हापूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने बैठका सुरू केल्या आहे. मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील मतदार संघांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील दहा मतदारसंघापैकी कोल्हापूर उत्तर मतदार संघ शिवसेनेने लढवावा, अशी जोरदार मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोल्हापूर उत्तरचा आग्रह धरला जाईल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. कोल्हापूर उत्तरसाठी जो उमेदवार दिला जाईल त्यांच्या पाठीशी सर्व पदाधिकारी, शिवसैनिक राहतील. कोणत्याही परिस्थितीत ही जागा निवडून आणली जाईल, असा निर्धारही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
‘मातोश्री’वर झालेल्या आढावा बैठकीला माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर उपस्थित होते. ठाकरे यांनी दहाही मतदारसंघाचा आढावा घेतला. कोल्हापूर उत्तर, राधानगरी, शिरोळ, हातकणंगले, शाहूवाडी या मतदारसंघात शिवसेनेला जिंकण्याची चांगली संधी आहे. या मतदार संघाचा आग्रह धरावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती ठाकरे यांनी जाणून घेतली. सध्या हा मतदार काँग्रेसकडे असला तरी १९९० पासून या मतदार संघात पाचवेळा शिवसेनेचा विजय झाला आहे. हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने या मतदार संघात पक्षाला मोठी संधी आहे. उद्धव ठाकरे या मतदारसंघात जो उमेदवार देतील त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाहीही पदाधिकाऱ्यांनी दिली. शिष्टमंडळात शिवसेना उप नेते आणि जिल्हा प्रमुख संजय पवार, जिल्हा प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रवीकिरण इंगवले, सुनील मोदी, उप प्रमुख दिनेश साळोखे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
रश्मी शुक्लांना हटवा; काँग्रेस शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी
मुंबई : प्रतिनिधी, विधानसभेच्या आगामी निवडणुका निष्पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी वादग्रस्त आणि सरकारी पक्षाला मदत करणारे अधिकारी हटवले पाहिजेत. (Maharashtra Politics) राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची कारकीर्द संशयास्पद आणि वादग्रस्त आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यासारखे प्रकार त्यांनी केले आहेत. त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. त्यामुळे निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्षपातीपणे पार पडण्यासाठी शुक्ला यांना हटवावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली.
वादग्रस्त आणि सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही हटवावे
महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकीम आणि डॉ. गजानन देसाई यांचा समावेश होता. शुक्ला यांच्यासह वादग्रस्त आणि सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या इतर अधिकाऱ्यांनाही हटवावे, अशी मागणी आम्ही आयोगाकडे केल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, ‘‘ शुक्ला यांची सेवा समाप्त झाली असतानाही भाजप-युती सरकारने त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. सरकारला अनुकूल भूमिका घेऊन त्या मदत करतात. असे वादग्रस्त व संशयास्पद अधिकारी निवडणूक काळात नसावेत अन्यथा निवडणूक निष्पक्ष होणार नाही, याकडे निवडणूक आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. त्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.’’
महाराष्ट्रात कायदा–सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे : पटोले
महाराष्ट्रात कायदा–सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मंत्रालयातील गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची एका महिलेने तोडफोड केली. राज्याचे गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर जनता कशी सुरक्षित असेल, असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला. भाजपा युती सरकारने विकासाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली आहे, विकास कुठेच दिसत नाही पण निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये सरकारची स्वच्छ व विकास केल्याची प्रतिमा मीडियातून दाखवण्यासाठी एका आयएएस अधिकाऱ्यामार्फत मीडियाच्या प्रमुख व्यक्तींना बोलावून टार्गेट दिले जात आहे. यासाठी एमएसआरडीसी, एमएमआरडीए, म्हाडा,
पावसामुळे राज्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या तीन चार दिवसांत ३३ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. शेतकरी संकटात आहे पण सरकारने अद्याप मदत दिलेली नाही. मुंबईतील नालेसफाईच्या कामात जातीने लक्ष घातल्याने मुंबई तुंबणार नाही, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी एका कार्यक्रमात केला आणि संध्याकाळी झालेल्या पावसात मुंबई तुंबली, मुंबईचे जनजीवन ठप्प झाले. अवकाळी पावसासारखे भाजपा युती सरकारही अवकाळीच आहे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.
Maharashtra Politics : खाजगी जागेतील मतदान केंद्र रद्द करा
यावेळी बोलताना काँग्रेस सरचिटणीस मुनाफ हकीम यांनी खासगी सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र सुरु करण्याला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. मतदान हे सरकारी इमारतीतच झाले पाहिजेत. तसेच मतदानाची आकडेवारी देणारे 17 C फॉर्म मतदानानंतर लगेचच मतदान प्रतिनिधींना देण्यात यावेत, अशी भूमिकाही मांडल्याचे सांगितले.
हेही वाचा
दिल्ली वायू प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालय संतप्त; सीएक्यूएमला फटकारले…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाइन डेस्क : दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत (Delhi air pollution ) दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. तर दुसरीकडे उत्तर भारतातील राज्यांमध्ये पीक काढून घेतल्यानंतर गव्हाचे काड, भाताचे पिंजार किंवा इतर कचरा जाळण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यावर कोणतीही ठोस पावले उचलली नाही, या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी, दि.२७ सप्टेबर रोजी कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटवर (CAQM – Commission for Air Quality Management) जोरदार ताशेरे ओढले.
CAQM कायद्याचे योग्यरित्या पालन होत नाही?
न्यायमूर्ती अभय एस. ओक आणि ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने सीएक्यूएमच्या (CAQM) क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचबरोबर दिल्लीशेजारील पंजाब आणि हरियाणा येथे गव्हाचे काड, भाताचे पिंजार किंवा इतर कचरा जाळण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.
सुनावणीदरम्यान हवा गुणवत्ता समितीचे अध्यक्ष राजेश वर्मा यांनी यासंदर्भात तीन उपसमित्यांची दर तीन महिन्यांनी एक बैठक होत असल्याकडे कोर्टाचे लक्ष वेधले. त्यावर न्यायालयाने, तीन महिन्यांतून एकदा भेटून सर्व कामे कशी पार पाडता, CAQM कायद्याचे योग्यरित्या पालन होत नाही. वायू प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या समित्या स्थापन केल्या, कोणती पावले उचलली, कोणत्या दिशानिर्देशांचा वापर केला, अशा प्रश्नांची सरबत्ती केली. तुम्ही काहीही करत नाही, तुम्ही मूक प्रेक्षक आहात, या शब्दांत समितीची कानउघाडणी केली.
Delhi air pollution : अधिकाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे
पीक कापणीनंतर शेतातील गव्हाचे काड, भाताचे पिंजार किंवा इतर कचरा जाळण्यासाठी पर्यायी उपकरणांचा वापर केला जाईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी CAQM कायद्यांतर्गत क्वचितच आदेश जारी केले गेले आहेत. या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे यापुढे अधिकाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे, अशी उद्विग्नता खंडपीठाने व्यक्त केली.
वरिष्ठ वकील आणि कोर्टाचे ॲमिकस क्युरी अपराजिता सिंग म्हणाल्या, ‘‘शेतकऱ्यांना २०१७ मध्ये गव्हाचे काड, भाताचे पिंजार किंवा इतर कचरा जाळण्यासाठी हजारो कोटी रुपयांची उपकरणे दिली गेली आहेत. जेणेकरुन वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. परंतु तसे झाले नाही. याचसाठी CAQMची स्थापना झाली. तरीही काही होत नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे.’’
‘या’ तारखेपर्यंत स्पष्टीकरण द्या
सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात मंगळवारी (दि.२४) सुनावणी झाली होती. त्यावेळी गव्हाचे काड, भाताचे पिंजार किंवा इतर कचरा जाळण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवल्या याबाबत आज (दि.२७) तपशील सादर करण्याचे आदेश CAQM ला दिले होते.
काय आहे CAQM ?
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि लगतच्या क्षेत्रांमधील हवेची गुणवत्ता व्यवस्थापनासाठी कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CAQM) या वैधानिक संस्थेची स्थापना केली. CAQM चे मुख्य उद्दिष्ट राजधानी दिल्ली आणि पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या शेजारच्या राज्यांत हवेची गुणवत्ता तपासणे, यासंदर्भाती समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करणे हे आहे.
हेही वाचा
नवी दिल्ली; महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क: ताप, सर्दी खोकला आला की सर्वसाधारणपणे पॅरासिटामॉल (Paracetamol) या औषधाचे सेवन केले जाते. तथापि, पॅरासिटामॉलसह ५३ औषधांचा दर्जा योग्य मापदंडानुसार नसल्याचे सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन(CDSCO)ने घेतलेल्या नमुन्यांमध्ये आढळले आहे. दर महिन्याला (CDSCO)कडून नमुना चाचणी अहवाल तयार केला जातो. त्यानुसार उत्पादक कंपन्यांवर कारवाई केली जाते. या ५३ औषधांमध्ये मधुमेहासारख्या अनेक आजारांवर घेतल्या जाणाऱ्या औषधांचाही समावेश आहे. या औषधांमध्ये डायक्लोफेनाक, अँटीफंगल औषध फ्लुकोनाझोलचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त आढळले आहे.
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून भारतात उपलब्ध असलेल्या सर्व औषधांची गुणवत्ता चाचणी केली जाते. वर उल्लेख केलेली औषधे ऑगस्ट महिन्यात केलेल्या गुणवत्ता चाचणीत उचित मापदंडानुसार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या औषधांमध्ये पेक्टिनेस, बीटा-ग्लुकोनेज, एमायलेस, प्रोटीज, अल्फा गॅलॅक्टोसिडेस, ग्लुकोमायलेज, सेल्युलेज, ब्रोमेलेन, झायलेनेज, लिपेज, हेमिसेल्युलेज, लैक्टेज, माल्ट डायस्टेस यांचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Paracetamol )
हेही वाचा :
कोल्हापूर; प्रतिनिधी : धुळ्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास चुडामण पाटील (वय ८४) यांचे आज (दि.२७) सकाळी धुळे येथे निधन झाले. काँग्रेसचे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्यावर उद्या (दि.२८) सकाळी धुळ्यातील एस.एस.व्ही.पी.एस. कॉलेजच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ( Rohidas Patil )
गेल्या फेब्रुवारी महिन्यात रोहिदास पाटील ( Rohidas Patil ) त्यांच्या कोल्हापुरातील मुलीला भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना उपचारासाठी तत्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना फुप्फुसाचा आजार असल्याचे निदान झाले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारानंतर धुळ्याला परतले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. त्यांच्यात पश्चात पुत्र, आमदार कुणाल पाटील आणि विनय पाटील, मुलगी स्मिता पाटील असा परिवार आहे. कोल्हापुरातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पाटील यांचे ते सासरे होत.
आभाळ कोसळले!!
आमचे वडील आदरणीय दाजीसाहेब आज आपणा सर्वांना सोडून गेले.🥺 सातत्याने ५ दशके येथील माती आणि माणसे समृध्द व्हावी म्हणून मांडलेला लोकसेवेचा झंझावात आज शांत झाला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि धुळे जिल्ह्याला आकार प्राप्त व्हावा यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले.
आदरणीय… pic.twitter.com/6g3FU9sFvI
— Kunal Patil (@Kunal_R_Patil) September 27, 2024
हेही वाचा :
कोल्हापूर; प्रतिनिधी : एसटी बसमध्ये गळा आवळून जावयाचा खून केल्याची घटना कोल्हापुरात (Kolhapur Crime News) घडली. सासू, सासऱ्यानेच हा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची सूत्रे हलवत अवघ्या आठ तासांत संशयितांना बेड्या ठोकल्या. गडहिंग्लज-कोल्हापूर एसटी बसमध्ये ही घटना घडली. तेव्हा रात्रीच्या वेळी अवघे पाच प्रवाशी बसमध्ये होते. संदीप रामगोंडा शिरगावे (वय ३०, रा. चिंचवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. हणमंताप्पा यल्लाप्पा काळे (वय ४८), सावत्र सासू गौरवा हणमंताप्पा काळे (३०, दोघे रा. हुनिगनाळ, ता. गडहिंग्लज) अशी संशयितांची नावे आहेत. पँटच्या नाडीने हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
शाहूपुरी पोलिसांनी खुनाच्या तपासाची माहिती दिली. बुधवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एका युवकाचा मृतदेह आढळला. त्याच्या गळ्यावर व्रण होते. मृताच्या खिशात डायरी होती. त्यात मोबाईल नंबर होता. पोलिसांनी या नंबरवर संपर्क साधून मृताची ओळख पटवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक जोडपे मृतदेह एका दुकानाजवळ ठेवत असल्याचे दिसून आले. हेच दोघे गडहिंग्लज एसटी स्टँडवरील सीसीटीव्हीतही दिसून आले. शाहूपुरी पोलिसांनी गडहिंग्लज पोलिसांच्या सहकार्याने संदीप शिरगावेची पत्नी करुणाला दाखवले. ते दोघे आपले आईवडील असल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी हणमंताप्पा आणि गौरवाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघांनी खुनाची कबुली दिली.
संदीप शिरगावेचा दहा वर्षापूर्वी करुणाशी विवाह झाला होता. दोघांना पाच वर्षांचा मुलगा आहे. संदीप खासगी वाहनावर चालक होता. त्याला दारुचे व्यसन होते. तो पत्नीला सतत मारहाण करत असे. या त्रासाला कंटाळून ती माहेरी आली. तिने घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला आहे. दरम्यान, सोमवारी २३ सप्टेंबर रोजी संदीप गडहिंग्लजला आला. त्याने पुन्हा पत्नीशी वाद घातला. सासूसासऱ्यांनाही शिवीगाळ केली. पत्नी करुणाने संदीपला पैसे देत तू परत गावी जा, असे बजावले. त्यानंतर संदीप गडहिंग्लज बसस्थानकावर आला. गडहिंग्लज-कोल्हापूर विना वाहक बसने तो कोल्हापूरकडे निघाला. त्याच बसमधून हणमंताप्पा आणि गौरवा कोल्हापूरकडे प्रवास करत होते. आपल्या मुलीला त्रास देणाऱ्या जावयाचा काटा काढायचा निर्णय दोघांनी घेतला. संदीप दारुच्या नशेत झोपला होता. त्यांनी एका सीटवर संदीपला मध्ये बसवले. गौरव्वाने त्याचे तोंड दाबून धरले. त्यानंतर हणमंताप्पाने नाडीने गळा आवळून त्याचा खून केला. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात बस आल्यावर दोघांनी त्याचा मृतदेह बसमधून उतरवला आणि स्वच्छतागृहाजवळील एका बंद दुकानाजवळ ठेवून ते पळून गेले. खुनाची घटना कुणी पाहिली नाही, या अविर्भावात ते निर्धास्तपणे गावांकडे परतले. पण सीसीटीव्हीत हे दोघे कैद झाल्याने पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.
हेही वाचा :
सतीश घाटगे
कोल्हापूर:
भाजपचे चाणक्य आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी, २५ सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी कमळाबरोबरच ज्या मतदार संघात मित्रपक्षांना जागा जाईल त्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले पाहिजे, असे बजावले. घड्याळ आणि धनुष्यबाणाला मतदान केले नाही तर आपले सरकार सत्तेवर येणार नाही, याची जाणीव ठेवली पाहिजे, या शब्दांत त्यांनी भाजपचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांसमोर भूमिका स्पष्ट केली. त्यांची ही भूमिका राज्यातील प्रमुख मित्रपक्ष शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांना आश्वस्त करणारी ठरली आहे.
भाजपचा पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्त्यांचा मेळावा कोल्हापुरात पार पडला. यावेळी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपने पश्चिम महाराष्ट्रात बाजी मारल्याचे मानले जात आहे. विधानसभा तोंडावर असताना आवाडेंच्या प्रवेशाने इचलकरंजीसह हातकणंगले मतदारसंघात भाजपचे बळ वाढणार आहे.
मेळाव्यात अमित शहा यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील नैराश्य घालवून त्यांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत भाजपचा ‘४०० पार’चा नारा होता. मात्र भाजपला २३८ जागा मिळाल्या. त्यामुळे काही प्रमाणात कार्यकर्ते नाराज होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा विक्रम केल्याचे कार्यकर्त्यांच्या मनावर ठसवून देण्याचा प्रयत्न शहा यांनी केला. गेल्या दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली जगात भारताचा दबदबा वाढला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांनी घटना बदलणार, आरक्षण जाणार, असा अपप्रचार केला. त्यामुळे आपल्या जागा घटल्या. पण विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला लोकोपयोगी योजनांतून विधानसभा निवडणुकीत उत्तर देण्याचे आवाहन शहा यांनी कार्यकर्त्यांना केले. गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये मिळून काँग्रेसला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मिळाल्या, याकडे शहा यांनी लक्ष वेधले. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप लढत नाही. भारताला महासत्ता बनवण्यासाठी, आत्मनिर्भर बनवण्यासाठी भाजप लढतो, याचा पुनरुच्चारही केला.
उद्धव ठाकरेंवर टीका टाळली
अमित शहा यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे टाळले. दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नेहमीप्रमाणे टीकास्त्र सोडले. शरद पवार यांना नेस्तानाबूत केल्यावरच राज्यात भाजपची विजयी मालिका सुरू होणार आहे, असे सांगताना विधानसभा निवडणुकीत शरद पवार हेच लक्ष्य असणार असा सूचक इशारा देण्यासही ते विसरले नाहीत. आगामी हिवाळी अधिवेशनात वफ्फ बोर्डासंबंधी विधेयक मंजूर करणारच. राहुल गांधी यांनी ते रोखून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले.
पवार, ठाकरे गटाचे कार्यकर्ते फोडा
राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नाराज कार्यकर्ते फोडा, असे जाहीर आवाहन शहा यांनी केले. विरोधी पक्षातील लोक आपल्या पक्षात आले तर भाजप कार्यकर्त्यांचे काय होणार, अशी भीती बाळगू नका. गेली दहा वर्षे आम्ही तुम्हाला काय देऊ शकलो नाही तर विरोधी पक्षातून आलेल्यांना काय देणार, असा प्रश्न त्यांनी केला. शहा यांनी हे वक्तव्य करण्यापूर्वीच आवाडे पितापुत्रांना पक्षात प्रवेश दिल्याने शहा यांचे वक्तव्य कोणासाठी, असा प्रश्नही कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला असावा. आवाडे पितापुत्रांना व्यासपीठावर आणण्याची जबाबदारी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर देऊन पक्षशिस्त, पक्षनिष्ठा कशी बाळगली जाते, असा उदो उदो सभागृहात केला जात असला तरी ही बाब कार्यकर्त्यांना चांगलीच खटकल्याचे बोलले जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला जादा जागा मिळतील, असा विश्वास अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. लोकसभेतील नॅरेटिव्ह कमी करुन दलित, आदीवासींसाठी विविध योजना राबवल्याने ते मतदार भाजपकडे वळतील. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मते भरभरुन मिळतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. त्याचवेळी महिला प्रामाणिक असतात तर पुरुष बेईमान असतात, असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य अंगलट येणार की मतदार ते खिलाडूवृत्तीने स्वीकारतील, ते पहावे लागेल.
एकंदरीतच शहा यांनी निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला असला तरी जागावाटप झाल्यानंतर तळागाळातील कार्यकर्ता पक्षाचा प्रचार कसा करणार, यावर भाजपचे यश अवलंबून राहणार आहे.
. . . . . .
सतीश घाटगे; कोल्हापूर : कोल्हापूरचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या (Keshavrao Bhosale Theatre) पुनर्उभारणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ कोटींचा निधी जाहीर केला. पण तो निधी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी महापालिकेच्या खात्यावर वर्ग करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाची कसोटी लागणार आहे. नाट्यगृह उभारणीचे काम वेगाने सुरू व्हावे, यासाठी कलाकार आणि जनतेचा रेटा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तांत्रिक बाबी पूर्ण करुन राज्य सरकारकडून निधी मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
आठ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री नाट्यगृहाला भीषण आग लागली. त्यात नाट्यगृह भस्मसात झाले. समस्त करवीरकर दु:खाच्या सागरात बुडून गेले. त्यानंतर नाट्यगृह उभारण्यासाठी दुसऱ्याच दिवशी लोकप्रतिनिधी, कलाकार, तंत्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी वज्रमूठ बांधली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोल्हापूरला तातडीने भेट दिली. नाट्यगृहाच्या पुनर्उभारणीसाठी २५ कोटी निधी देण्याची घोषणा केली. खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, जयंत आसगांवकर यांनी प्रत्येकी १ कोटी निधी देण्याची घोषणा केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एक कोटीचा निधी जाहीर केला. कोल्हापूरची अस्मिता असलेले केशवराव भोसले नाट्यगृह उभारणीसाठी निधी कमी पडू देणार नाही, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आश्वस्त केले.
राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधींकडून निधीची घोषणा झाली. मात्र महापालिका प्रशासनाकडून टेंडर नोटीस काढण्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. त्यासाठी महापालिकेची दमछाक होत आहे. दुसरीकडे नाट्यगृहाला (Keshavrao Bhosale Theatre) लागलेल्या आगीबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणे, स्ट्रक्चरल ऑडिट, शॉर्ट टेंडर नोटीस काढणे आदी बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. त्यासाठी विलंब होत असल्याने कलाकार आणि सामान्य जनतेकडूनही रेटा वाढत आहे. स्ट्रक्चरल ऑडिटचा प्राथमिक अहवाल आला आहे. मात्र नाट्यगृहातील मलबा हटवल्याशिवाय ऑडिट करता येणे शक्य नाही, असे स्ट्रक्चरल करणाऱ्या कंपनीने स्पष्ट केले आहे. मलबा हटवल्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट पुन्हा नव्याने करण्यात येणार असून त्यानंतर अंतिम अहवाल येणार आहे. सध्या मलबा हटवण्याचे काम सुरू झाले आहे.
दरम्यान, नाट्यगृह (Keshavrao Bhosale Theatre) उभारण्यासाठी आठ कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे. या कंपन्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी, आर्किटेक्ट, रंगकर्मींचे प्रतिनिधी यांच्यासमोर प्रेझेंटेशन केले आहे. त्यानंतर नाटगृह उभारणीसाठी एखाद्या कंपनीची निवड करावी लागणार आहे. त्यानंतर शॉर्ट टेंडर काढले जाणार आहे.
या तांत्रिक बाबी युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे. पण विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दहा ते पंधरा दिवसांत लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यापूर्वी सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करुन शॉर्ट टेंडर नोटीस प्रसिद्ध करावी लागेल. सांस्कृतिक विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. मंजुरीनंतर मंत्रिमंडळात निर्णय होऊन निधी महापालिकेच्या खात्यावर वर्ग होणार आहे. हा निधी लवकर वर्ग व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न होत आहेत. दुसरीकडे घाईगडबडीने प्रक्रिया झाली तर पारदर्शीपणे काम होणार नाही, अशी भीती तज्ज्ञांकडून होत आहे. कलावंत आणि कलारसिकही नाट्यगृह उभारणीचे काम लवकर सुरू करावे यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत. अशा कात्रीत सध्या महापालिका आणि जिल्हा प्रशासन आहे.
हेही वाचा :
कृष्णात व. चौगले; कोल्हापूर : केंद्र सरकारने आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्याने खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन आणि पाम तेलाच्या (Cooking Oil) किमतीत किलोमागे २५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे १५ किलो डब्याची किंमत अडीचशे ते तीनशे रुपयांनी वाढली आहे. साहजिकच याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच नवरात्र आणि विजयादशमीचा उत्साह असतो. महिन्याच्या शेवटी दिवाळी आहे. त्याआधीच खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे. केंद्र सरकारने आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाची आवक होऊन देशातही भाव कमी झाले होते. याचा फटका देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या सोयाबीनसह तेलबिया पिकांच्या दरावर झाला होता. त्यामुळे आयात शुल्कात वाढ करण्याची मागणी शेतकरी, प्रक्रियादार, रिफायनरीज करत होत्या. (Cooking Oil)
केंद्र सरकारने, कच्च्या तेलावरील मूलभूत आयात शुल्क २० टक्के वाढवली आहे. आतापर्यंत कच्च्या तेलाच्या आयातीवर कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. पण, आता ते २० टक्के करण्यात आले आहे. दुसरीकडे रिफाइंड तेलावरील मूळ आयात शुल्क १२.५ टक्क्यांवरून ३२.५ टक्के करण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणून तेलाचे दर वाढणार आहेत. कस्टम ड्युटी वाढली असल्याने आता खाद्यतेलाचे प्रभावी शुल्कही वाढणार आहे. क्रूड पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील प्रभावी शुल्क आतापर्यंत ५.५ टक्के होते. पण ते आता २७.५ टक्के करण्यात आले आहे. तसेच, शुद्ध सूर्यफूल तेल, शुद्ध पाम तेल आणि शुद्ध सोयाबीन तेलाची प्रभावी किंमत आधी १३.७५ टक्के होती ती आता ३५.७५ टक्के झाली आहे.
खाद्यतेलाचा किलोचा दर
- सरकी : १४६ ते १८०
- शेंगतेल : २०० ते २४०
- सोयाबीन : १४६ ते १८०
- सूर्यफूल : १२५ ते १५०
खाद्यतेलाचा भाव (१५ लिटरसाठी)
- सूर्यफूल : १७५०-२१०० (भाववाढ -३५० रुपये)
- सोयाबीन : १६९०-१९८० (भाववाढ – २९० रुपये)
गेल्यावर्षी तीन हजाराच्या पुढे गेलेल्या तेलाच्या डब्याचा दर १५०० ते १६०० पर्यंत खाली आला होता. मात्र, केंद्र सरकारने सोयाबीनला दर देताना खाद्यतेलाचे दर वाढवले आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल होणार आहे.
– अजित पोवार, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, (युवा आघाडी)
हेही वाचा :
कोल्हापूर; प्रतिनिधी : गणेशोत्सव संपला की पितृ पंधरवडा सुरू होतो. या पंधरा दिवसांत तिथीनुसार एक दिवस महालय असतो. बोली भाषेत त्याला महाळ, म्हाळ असेही म्हणतात. पितृ पंधरवड्यात आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून महाळ घातला जातो. महाळाच्या नैवेद्यात मोहराच्या भाजीला (Mohar Bhaji) मान असतो.
महाळाच्या नैवेद्य बनवताना भेंडी, काटे भेंडी, दोडका, मेथी, चवळीच्या शेंगा, आळू, रानकारली, गवारी या भाजांचा समावेश असतो. पण सर्वांत महत्त्वाची भाजी म्हणजे मोहर. मोहर ही पश्चिम घाटात उगवणारी जंगली भाजी. या भाजीचा वेल केवळ पावसाळ्यात उगवतो. पश्चिम महाराष्ट्रासह सह्याद्री घाटात गाबोळी, शेंडवेल, चाईचा मोहोर, मुळशीची भाजी, मांदा, येलरगंडू या नावानेही ती ओळखले जाते. Dioscorea pentaphylla असे तिचे शास्त्रीय नाव आहे. (Mohar Bhaji)
पावसाळ्यात मोहराच्या कंदाला कोंब फुटतात, पाने येतात. या कोवळ्या पानाला घोटवेल म्हणतात. या पानांचीही भाजी केली जाते. मोहोराचा वेल झाडाच्या आधारे पंधरा ते वीस फूट वाढतो. पावसाळ्यानंतर मोहराचा वेल कोमेजून जातो, पण त्याचे कोंब जमिनीवर तसेच राहतात. पावसाळा सुरू झाला की पुन्हा कोंब फुटतात. हे निसर्गचक्र वर्षोनवर्ष सुरू राहते. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्याच्या जंगलभागात ही भाजी उगवते. कोल्हापूर शहराजवळील कात्यायणी, हणबरवाडी, दऱ्याचे वडगाव या परिसरातही ही भाजी येते.
पितृपंधरवड्यात मोहरला मोठी मागणी
सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मोहराच्या वेलाला मोहरीसारखी बारीक गोल फळे धरतात. त्याचे झुपके आंब्याच्या मोहरासारखेच असतात. पितृपंधरवड्यात या भाजीला मोठी मागणी असते. या काळात भाजी विक्रेतेही ‘मोहर घ्या मोहर,’ अशी हाकाटी देत गल्लोगल्ली फिरत असतात. मंडईतही मोहराचे ढीग दिसतात. घरात आणलेली भाजी निवडून स्वच्छ केली जाते. त्यानंतर बारीक चिरुन गरम पाण्यात उकळून पिळून घेतली जाते. बारीक कांदा, लसूण, जिरे, मोहरीच्या तेलाची फोडणी देऊन मिरची किंवा तिखटाचा वापर केला जातो. तिची चव अप्रतिम असते. मोहोराची भाजी आयुर्वेदात गुणकारी मानली आहे. ती शक्तिवर्धक आहे. अंगाला सूज आली असेल मोहोराचा कंद गरम करुन बांधला जातो.
मोहराची भाजी आरोग्यदायी आहे. म्हाळाच्या नैवेद्यात पूर्वापार या भाजीला स्थान आहे. ती भाजी शक्तिवर्धक आहे.
– अनिल चौगुले, पर्यावरण अभ्यासक
हेही वाचा