Home » Blog » BCCI : …अन्यथा खेळाडूंना ‘आयपीएल’बंदी

BCCI : …अन्यथा खेळाडूंना ‘आयपीएल’बंदी

बीसीसीआयचे खेळाडूंसाठी कठोर नियम

by प्रतिनिधी
0 comments
BCCI

नवी दिल्ली : भारतीय संघाच्या लागोपाठच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंसाठी कठोर नियमांचा बडगा उगारला आहे. हे नियम न पाळल्यास खेळाडूंवर सक्त कारवाई करण्यात येणार असून प्रसंगी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदीही घालण्याचीही तरतूद आहे. (BCCI)

भारताला मागील वर्षी श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे मालिकेमध्ये ०-२ असा, तर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये ०-३ असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील १-३ अशी पराभवामुळे भारताला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीबरोबरच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थानही गमवावे लागले. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय ‘ॲक्शन मोड’मध्ये आली असून खेळाडूंच्या मनमानीला चाप लावण्याचा विडाच संघटनेने उचलला आहे. (BCCI)

ऑस्ट्रेलिया दौऱ्याहून परतल्यानंतर मुंबईमध्ये बीसीसीआयची आढावा बैठक पार पडली. यांमध्ये, निवड समितीप्रमुख अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्माही सहभागी झाले होते. या बैठकीदरम्यान खेळाडूंच्या वर्तणुकीचा मुद्दाही चर्चिण्यात आल्याचे समजते. त्यानुसार, खेळाडूंना शिस्त लावण्याकरिता बीसीसीआयने पुढील नियमांचा अवलंब करण्याचे ठरवले आहे. (BCCI)

  • नव्या नियमांनुसार खेळाडूंच्या पत्नी अथवा गर्लफ्रेंडला संघाच्या परदेश दौऱ्यांदरम्यान १४ दिवसांहून अधिक एकत्र वास्तव्य करता येणार नाही. यादरम्यान, राहण्याचा वगळता कुटुंबियांचा अन्य सर्व खर्च संबंधित खेळाडूंना करावा लागणार आहे.
  • खेळाडू हे दौऱ्यांसाठी, सामन्यांसाठी वा सराव शिबिरांसाठी स्वतंत्रपणे प्रवास करू शकणार नाहीत. खेळाडूंनी संघाच्या बसमधूनच प्रवास करणे यापुढे बंधनकारक असेल. काही कारणास्तव खेळाडूंना स्वतंत्रपणे प्रवास करणे आवश्यक असल्यास त्यासाठी मुख्य प्रशिक्षक किंवा निवड समितीप्रमुखांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे.
  • खेळाडूंना स्पर्धा व मालिकांदरम्यान खासगी कर्मचारी वर्ग बाळगता येणार नाही. यांमध्ये, खासगी व्यवस्थापक, शेफ, सहायक आणि सुरक्षारक्षक यांचा समावेश आहे. खेळाडूंनी स्पर्धेदरम्यान वैयक्तिक जाहिराती व कार्यक्रमांसाठी वेळ देऊ नये, असेही बीसीसीआयने बजावले आहे.
  • भारतीय संघामध्ये निवड होण्याकरिता देशांतर्गत क्रिकेट खेळणे हे सर्व खेळाडूंना बंधनकारक असेल.
  • खेळाडूंनी बीसीसीआयच्या नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. याअंतर्गत त्यांचा बीसीसीआय करार रद्द करण्याबरोबरच त्यांना आयपीएलमध्ये खेळण्यासही बंदी घालण्यात येऊ शकते.

भारतीय संघाची शनिवारी घोषणा

पुढील महिन्यात रंगणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा शनिवारी करण्यात येणार आहे. बीसीसीआयचे निवड समितीप्रमुख अजित आगरकर संघ जाहीर करतील. रोहित शर्माची कर्णधारपदी नियुक्ती निश्चित असून जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :
विमेन्स प्रीमियर लीग १४ फेब्रुवारीपासून

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00